-->
संपादकीय पान सोमवार दि. ३० डिसेंबर २०१३च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
किवीपासून वाईनचा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्याला फायदा
----------------------------------
किवी किंवा चायनीस रुसबेरी या फळापासून वाईन तयार करण्याच्या बाजारपेठेत आपण आता प्रवेश करणार आहोत. भारतात हा प्रयोग पहिल्यांदाच राबविला जात आहे. यासाठी अरुणाचलप्रदेश हॉट्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग अँड प्रोसेसिंग बोर्डाच्या वतीने यासाठी पुण्यातील हिलक्रेस्ट फडस् प्रा. लि. या कंपनीशी सहकार्य करार करण्यात आला आहे. सुरुवातीला वाईन बनविण्याचा हा प्रयत्न प्रायोगिक तत्वावर केला जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर व्यापक स्वरुपात किवीपासून वाईन तयार केली जाईल. किवापासून तयार केल्या जाणार्‍या वाईनला जगात मोठी मागणी असते. न्यूझीलंडहून आपल्याकडे या वाईनची आयात होते. हा जर प्रयोग यशस्वी झाला तर आपण किवीच्या वाईनची निर्यात करणारा देश ठरु. सध्या आपल्याकडे द्राक्षाच्या जोडीला स्ट्रॉब्रेरी व अननसापासून वाईन तयार केली जाते. आता त्यात किवीची भर पडेल. अरुणाचलप्रदेशात सर्वात प्रथम १९९२ साली किवीची लागवड करण्यात आली. ही लागवड यशस्वी झाल्याने आता तेथे शेकडो एकरमध्ये किवीची लागवड केली जात आहे. सुमारे ७०० कुटुंबे या पिकावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. आता किवीची लागवड कशी चांगल्या प्रकारे करुन आणखी चांगले उच्पादन कसे करता येईल याचे प्रयोग आता अरुणाचलमध्ये सुरु आहेत. सध्या या राज्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर साडे चार हजार टन उत्पादन होते. शेतकर्‍यांना सरासरी ५५ रुपये प्रति किलो असा दर या फळांना मिळतो. आता जर या फळाचा वाईन निर्मितीत उपयोग झाला तर शेतकर्‍यांना आणखी चांगला दर मिळेल. पूर्वेकडील हिमालयाच्या रांगेत वसलेल्या अरुणाचलप्रदेशात किवीचे उत्पादन चांगले येते. प्रत्येक फळाचे वजन हे सरासरी ५० ग्रॅम भरते. तसे पाहता हे फळ मुळचे चीन मधील आहे. वीसाव्या शतकात न्यूझीलंडमध्ये याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरु झाले आणि या फळाची जगाला ओळख झाली. त्यानंतर या फळाने युरोपात प्रवेश केला. इटली, ग्रीस, चीली या देशांच्याबरोबरीने भारतात हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नागालँड, मेघालय, मणिपूर, आसाम या राज्यात याचे व्यापारी उत्पादन सुरु झाले. या फळात व्हिटॅमिन सी असल्याने तसेच चांगले खनिज पदार्थ असल्याने पौष्टीक फळ म्हणून जगात ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून हजार ते १६०० मीटर्स उंचीवर हे फळ तयार होते. याला थंड हवामान हे प्रामुख्याने लागते. याची झाडे अतिशय नाजूक असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वारा आल्यास याचे नुकसान होऊ शकेत. या फळांना फार जपावे लागते. आता मात्र यापासून वाईन तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास अरुणाचलप्रदेशच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळू शकते. वाईन उद्योगाने नाशिकचे अर्थकारण पार बदलून गेले आहे. नाशिक हे जागतिक वाईन उद्योगाच्या टप्प्यात आले. यामुळे अनेक स्थानिक उद्योग उभे राहिले व कृषी उत्पन्नातून कशा प्रकारे उद्योग उभे राहू शकतात व त्यातून रोजगार निर्मिती कशी होते हे नाशिकने दाखवून दिले आहे. नाशिकला ज्यावेळी वाईन उद्योग उभा राहात होता त्यावेळी अनेकांनी त्यांना मुर्खात काढले होते. यात उद्योजक शामराव चौघुले यांनी केलेले प्रयोग महत्वाचे ठरले. वाईन उद्योगात नाशिकचे वान जगात पोहोचण्यात या उद्योजकाचा मोठा वाटा आहे. यामुळे देशाला जसे विदेशी चलन मिळाले तसे द्राक्ष उत्पादकांना चांगले दरही मिळाले व अनेक रोजगार उपलब्ध झाले. किवीपासून वाईन निर्मिती झाल्यास अरुणाचलप्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना असाच लाभ होईल.
-----------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel