-->
संपादकीय पान मंगळवार दि. २० जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------------
गोड गोड बोला, पण...!
पोलादपूर तालुक्यातील एव्हरेस्टवीर राहुल येंगले याला वाळीत टाकल्याची बातमी ज्यावेळी प्रसिध्द झाली त्यावेळी संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. रायगड जिल्ह्यात वाळीत प्रकरणांची वाळवी मोठ्या प्रमाणात लागल्याने याची झळ एव्हरेस्टवीरासारख्या तरुणावरही बसू शकते हे भयाण वास्तव सर्वांपुढे आले होते. यामुळे जिल्ह्याची बदनामी तर होतेश शिवाय शिवरायांच्या पदस्पर्शने पावन झालेल्या या भूमीला झाले आहे तरी काय असे म्हणावेसे वाटायचे. गेली सहा दशकाहून जास्त काळ पुरोगामी राजकारण या जिल्ह्याने पाहिले व आजही शेकापच्या माध्यमातून हेेच पुरोगामी राजकारण घरोघरी पेरले जात असतानाही वाळीत प्रकरणे उद्भवावात याचे आश्‍चर्य वाटणे स्वाभाविकच होते. मात्र या घटनांमुळे काहीसे नैराश्य वाटत असताना एक समाधानाची घटना पोलादपूर येथे घडली. पोलादपूर तालुक्यातील भोगाव येलंगेवाडी दत्तवाडीतील ग्रामस्थ आणि एव्हरेस्टवीर राहुल येलंगे यांच्यातील कथित वाळीत प्रकरण जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे अखेर मिटले. रायगड जिल्ह्यात वाळीत प्रकरणांच्या मालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेला खडबडून जागे केले होते. पोलादपूर तालुका वाळीत प्रकरण समन्वय समितीच्या बैठकीत एव्हरेस्टवीर राहुल येलंगे याने मांडलेल्या कैफियतीनंतर सर्वप्रसार माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले होते. यामुळे तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनानेही या प्रकरणी तातडीने लक्ष घालून रविवारी येलंगेवाडी दत्तवाडीतील श्रीदत्तमंदिर हनुमानमंदिराच्या सभागृहामध्ये उपस्थित राहून ग्रामस्थ आणि राहुल येलंगे आणि त्याच्या पत्नीचे म्हणणे ऐकून सामंजस्य निर्माण केले. रायगडचे जिल्हाधिकारी सुमन भांगे यांनी दोन्ही गटांची पार्श्वभूमी ऐकून घेण्याची मानसिकता दर्शविली असता दोन्ही गटांना वितुष्टाबाबत बोलण्याची इच्छा नसल्याचे दिसले. मात्र, एक-दोन हरकतीचे मुद्दे प्रशासनाच्या पातळीवर तांत्रिक बाबींची पूर्तता सोडविण्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुमन भांगे यांनी देताच दोन्ही बाजूला सामंजस्याचे वातावरण निर्माण होऊन शिंदे आडनावाच्या वयोज्येष्ठांनी येलंगे ही एकाच आईची लेकरं असून राहुलच्या पाठिशी राहून साथ देऊ अशी भूमिका घेत वडीलधार्‍यांची भूमिका मांडली. यातून अचानक कटूता संपुष्टात येण्याची लक्षणं दिसू लागली. अमित येलंगे यांनी होळी पेटविताना राहुलच्या गुरांचा वाडा जवळच असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी होळी न लावण्याची भूमिका सामंजस्यातून घेतली. मात्र, परंपरा असल्यास जागा बदला, अशी भूमिका मांडून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महावरकर यांनी पोलादपूर तहसिलदार आणि पोलीस निरिक्षक यांना याबाबत दक्षता घेण्यास सांगितले. एकूणच आता या प्रकरणावर पडदा पडला आहे याचे स्वागत केले पाहिजे. मात्र यामुळे समाधान न मानता जिल्ह्यातील प्रत्येक प्रकरणाचा नेमका अभ्यास करुन वाळीत टाकण्याची प्रकरणे सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचबरोबर ही प्रकरणे भविष्यात होणार नाहीत यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे. वाळीत प्रकरणांवर कटाक्ष टाकल्यास आपल्याला एक बाब प्रकर्षाने जाणवते की, यामागे जातीची पाळेमुळे जशी घट्ट रोवली गेली आहेत तसेच वैयक्तीक पातळीवरील व्देषची प्रकरणे देखील आहेत. मध्यंतरी अंधश्रध्दा निमूर्लन समितीच्या मुक्ती दाभोळकर यांनी जात पंचायत संपुष्टात आल्यास वाळीत प्रश्‍न सुटण्यास मदत होईल असे म्हटले होते. त्यांचे हे विधान शंभर टक्केच खरे आहे. कारण आपल्या समाजावर आता जातींचा एवढा जबरदस्त पगडा आहे की त्यातून बाहेर आल्याशिवाय आपण आपली प्रगती साधू शकणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जात संपविण्याचे आवाहन केले होते ते खरेच होते. स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरण सुरु झाल्यावर जातींचा पगडा कमी होईल अशी अपेक्षा होती. आज शहरांमध्ये ते वास्तव दिसत आहे. मात्र ग्रामीण भागात आजही जातींचे वर्चस्व आहे आणि त्यामुळे समाजाचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षात प्रामुख्याने राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून जातियवादी शक्तींनी उचल खाल्ली आहे. अशा स्थितीत अशा प्रकारची प्रकरणे आणखी गंभीर होत जाणार आहेत. पोलादपूरमधील हे वाळीत प्रकरण प्रशासनाने मिटविले असले तरी प्रत्येक बाबतीत गोड गोड बोलून ही प्रकरणे मिटवता येणार नाहीत. त्यासाठी आपल्या समाजाची मानसिकता बदलली गेली पाहिजे. यातील पहिले पाऊल म्हणजे जात व धर्म हे प्रत्येकाच्या घरापुरतेच मर्यादीत राहिले पाहिजे. हे रस्त्यावर येता कामा नये. प्रत्येकाला त्याचा धर्म व जात पाळण्याचा जरुर अधिकार आहे मात्र त्याच फुकाचा अभिमान बाळगणे व त्यातून दुसर्‍याला कमी लेखणे चुकीचे आहे. जर असे कोण करीत नसेल त्याला कायद्याचा बडगा दाखविण्याची तयारी प्रशासनाने ठेवली पाहिजे. वाळीत प्रकरणे ही बाब गंभीर आहे. त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा मुकाबला गेला पाहिजे अन्यथा वाळवीसारखी आपल्या समाजाला ही प्रकरणे पोखरु शकतात. ही लढाई जशी प्रशानाच्या पातळीवर लढविली जात आहे तसेच राजकीय पक्षांनीही हा अजेंडा आपल्याकडे प्राधान्यतेने हाताळला पाहिजे. एकवेळ मते नाही मिळाली तरी चालतील परंतु जाती-धर्माच्या नावाखाली समाजात दुळळी होणार नाही याची दक्षता राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे. पोलादपूरच्या घटनेचे स्वागत करीत अशताना भविष्यात जी मोठी आव्हाने वाळीत प्रकरणांनी जिल्ह्यात उभी केली आहेत त्याचा मुकाबला करण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग यात असणे गरजेचे ठरणार आहे. तरच वाळीच प्रकणांचा आपण योग्यरित्या मुकाबला करु शकतो.
----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel