
मिस्त्रींना टाटा
30 मार्च 2021 साठी अग्रलेख
मिस्त्रींना टाटा
टाटा समूहात गेली चार वर्षे अध्यक्षपदावरुन जे वादळ घोंघावत होते त्याला आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने विराम मिळाला आहे. निलंबित अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना टाटा सन्समध्ये पुनर्नियुक्त करण्याबाबत कंपनी लवादाने दिलेला निर्णय रद्दबादल करीत सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावर पुन्हा नियुक्त करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सने या निकालाचे स्वागत केले आहे तर सायरस मिस्त्री यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे एक मोठा धक्का आहे. डिसेंबर 2019 मध्ये सायरस मिस्त्री यांना पुन्हा अध्यक्षपदी नियुक्त करावे, असा निकाल कंपनी लवादाने दिल्यावर टाटा समूहास मोठा धक्का बसला होता. परंतु या निर्णयाला टाटा समूहाने न्यायालयात आव्हान दिले होते. टाटा समूहातील होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये सायरस मिस्त्री यांच्या शापूरजी पालनजी यांचे 18.37 टक्के भांडवली वाटा आहे. त्यांचे भांडवल अल्पमतात असले तरीही त्यांच्या मताला किंमत आहे. टाटा समूहातील निवृत्तीच्या नियमानुसार रतन टाटा यांचे वय 75 झाल्यावर त्यांचा वारस शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यासाठी एक समिती देखील नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी रतन टाटा यांचे वारसदार म्हणून नोएल टाटा यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु अध्यक्षपदाच्या नियुक्तीत ते मागे पडले आणि अचानकपणे सायरस मिस्त्री यांचे नाव पुढे आले. त्यावेळी अशी चर्चा होती की, शापूरजी पालनजी समूहाने मिस्त्री यांची नियुक्ती टाटा समूहाच्या अध्यक्षपदी होण्यासाठी दबाव टाकला होता. मिस्त्री यांची नियुक्ती होणे याचे अनेकांना आश्चर्यही वाटले होते. टाटा नावाच्या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीची नियुक्ती होणे ही टाटा समूहातील पहिलीच घटना होती. मिस्त्री यांनी समूहाची सुत्रे हाती घेताच हा समूह ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पावले टाकण्य़ास सुरवात केली होती. त्यांचे अनेक निर्णय टाटासन्समधील संचालकांना खटकू लागले होते. टाटा समूहाचे वैशिष्ट असे आहे की, जो अध्यक्ष असतो त्याच्याकडे कंपन्यांतील समभाग वैयक्तिरित्या नसतात. त्यामुळे त्याची वैयक्तीक मालकी राहात नाही. त्यामुळे समूहाच्या वाढीत त्याचे वैयक्तीक हितसंबंध गुंतलेले नसतात. कंपनी व समूहातील एकही समभाग अध्यक्षाच्या नावावर नसल्याने सदर अध्यक्ष हा स्वतंत्रपणे कंपन्यांच्या समूहाच्या वाढीस हातभार लावतो. आजही रतन टाटांकडे कोणत्याही कंपनीचे समभाग नाहीत. टाटा समूहांचे सर्व समभाग हे ट्रस्टच्या मालकीचे आहेत. त्यामुळेच जागतिक श्रीमंतांच्या यादीत अंबानी, अदानी यांच्यासारख्यांच्या जोडीने टाटा समूहातील कोणी व्यक्ती कधीच येऊ शकत नाही. कारण त्यांच्याकडे वैयक्तीक मालकी नसते तर त्यांच्याकडे मालकी ही ट्रस्टची आहे. कोणत्याही कंपनीचा वा समूहाचा अध्यक्ष हा मालक म्हणून नाही तर नोकर म्हणून कर्यरत असतो. त्यांच्याकडे कंपनीची वैयक्तीक मालकी ठेवणे वर्ज्य आहे. परंतु आता मिस्त्री यांच्या नियुक्तीने हे चित्र पालटले होते. मिस्त्री यांच्या मालकीच्या समूहाकडे 18 टक्के समभाग होते. टाटा समूहासाठी एक मोठा सांस्कृतिक बदल होता. रतन टाटा यांची नियुक्ती ही जरी मानद अध्यक्ष अशी असली तरीही मिस्त्री यांनी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना रतन टाटांशी चर्चा करणे अपेक्षित होते. मिस्त्री यांनी अध्यक्षपदी असताना काही निर्णय आपल्या पालोनजी समूहाला फायदेशीर ठरणारे घेण्यास सुरवात केली होती. त्यातून टाटा समूह व पालोनजी समूह यांच्यात खटके उडण्यास सुरवात झाली होती. रतन टाटा यांनी यातील काही निर्णय आपल्या अधिकारात फिरविले देखील होते. त्यातून उभयतातील संघर्ष टोकाला गेला. शेवटी त्याची परिणती मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात झाली. मिस्त्री यांनी त्याला कंपनी लवादाकडे दाद मागितली. हा निकाल जरी मिस्त्री यांच्या बाजूने लागला असला तरीही सर्वोच्च न्यायालयात मात्र त्यांच्या विरोधात गेला आहे. आता त्यांच्याकडे अन्य कोणताही दाद मागण्याचा पर्याय खुला राहिलाला नाही. असे असले तरीही शापूरजी पालोनजी समूहापुढे काही प्रश्न आजही उभे आहेत. न्यायालयाने त्या प्रश्नांची सोडवणूक केलेली नाही. मध्यंतरी शापूरजी समूहाने आपले सर्व भांडवल विकण्याची तयारी दाखविली होती. आज शापूरजी समूहाच्या एकूण भांडवली वाट्याची किंमत सुमारे एक कोटी 82 लाख एवढी भरते. टाटा समूह ती खरेदी करण्यास फारसे उत्सुक दिसत नाही. मात्र टाटा समूहाने त्यांचे भांडवल खरेदी केल्यास एका झटक्यात हा प्रश्न सुटेल किंवा त्यांचे भांडवल कायम ठेऊन ते गहाण ठेवायचे असाही प्रस्ताव आहे. कारण शापूरजी समूहाच्या डोक्यवर सध्या बावीस हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे व ते कर्ज त्यांना फेडावयासाठी पैसे पाहिजे आहेत. त्यातील त्यांनी काही समभाग एक्सीस व आयडीबीआय बँकेकडे गहाण टाकून पाच हजार कोटी उभे केले आहेत. परंतु टाटांनी नंतर त्यांना आणखी समभाग गहाण टाकण्यास मनाई करावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. आता भविष्यात यावरुन कोर्टबाजी दोन्ही समूहात सुरु होईल. परंतु अध्यक्षपदाचा महत्वाचा निकाल लागल्याने टाटा समूह निर्धास्त झाला आहे. एक मोठा दिलासा या निकालाने टाटा समूहाला मिळाला आहे. प्रत्येक समूहाची एक संस्कृती असते. त्यातून त्यांच्या कार्यपध्दती प्रगट होत असतात. टाटा समूहाची अशीच एक कार्यपध्दतीची संस्कृती आहे. नुकसान झाले तरी चालेल परंतु टाटा समूह आपल्या काही मूलभूत तत्वांशी तडजोड करताना दिसत नाही. यातूनच त्यांनी आपले नाव, दर्ज्या कायम, लोकांचा विश्वास राखण्याचा प्रयत्न गेल्या शतकाहून जास्त काळ केला आहे. टाटांच्या एकूणच संस्कृतीत मिस्त्री काही बसू शकत नव्हते. त्यातूनच त्यांची हकालपट्टी झाली व आता तर त्यांना टाटाच करण्यात आला आहे.
0 Response to "मिस्त्रींना टाटा"
टिप्पणी पोस्ट करा