
भाजपविरोधकांची जूट
27 मार्चसाठी अग्रलेख
भाजपविरोधकांची जूट
केंद्रात व बहुतांशी राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाच्या विरोधात असलेल्या राष्ट्रीय व प्रदेशिक पक्षांची एकजूट बांधण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने पावले पडत आहेत. खरे तर कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील यु.पी.ए.ची आघाडी ही त्यासाठीच प्रामुख्याने होती. परंतु गेल्या दोन मध्यवर्ती निवडणुका हरल्यावर त्यातून नव्याने सावरुन एक समर्थ पर्याय देण्यासाठी कॉँग्रेस असमर्थ ठरला आहे. सध्याच्या स्थितीत तर कॉँग्रेसला अध्यक्षच नाही. सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व होते, परंतु त्यांनी ते आपले पुत्र राहूल यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र गेल्या निवडणुकात पक्षाचा पराभव झाल्यावर राहूल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि अनेकांनी आग्रह करुनही अध्यक्षपद स्वीकारलेले नाही. सोनिया गांधी यांना त्यांची प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारले होते. अर्थात असे फार काळ चालू शकत नाही. कॉँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. प्रामुख्याने सत्ताधारी भाजपा आक्रमकरित्या वाटचाल करीत असताना त्यांच्या प्रत्येक चालीविरोधात पावले उचलण्यासाठी कॉँग्रेस पक्षाला एक तरुण, खंबीर व सबळ नेतृत्वाची गरज आहे. गांधी घराण्यातून जर तसे नेतृत्व मिळणार नसेल तर गांधी घराण्यानेच बाहेरच्या नेतृत्वाला मार्ग मोकळा करुन दिला पाहिजे. हे जसे पक्षाच्या बाबतीत झाले तसेच यु.पी.ए.चे नेतृत्व देखील सध्या सोनिया गांधांकडेच आहे त्याचा देखील त्यांनी पुर्नविचार केला पाहिजे. सोनिया गांधी या थकल्यामुळे जसे पक्षाचे नेतृत्व करु शकत नाहीत तसेच त्यांनी यु.पी.ए.च्या नेतृत्वाची धुरा सोडल्यास नवे नेतृत्व त्याजागी उभे राहू शकते. आज भाजपाविरोधी लढताना अनेक पक्षांना एक सक्रिय देशव्यापी राजकीय व्यासपीठाची गरज वाटते आहे. यु.पी.ए.चे अस्तित्व सध्या केवळ कागदावर राहिल्यासारखे आहे. त्यामुळे यु.पी.ए.चे पुनरुजीवन करण्याची गज आहे. जर सोनिया यु.पी.ए.चे अध्यक्षपद सोडावयास तयार नसतील तर काही तरी दुसरा पर्याय उभारावा लागणार आहे. २०२४ च्या निवडणुकांसाठी ही तयारी असली तरी त्याची बांधणी आत्तापासून करावी लागणार आहे. शरद पवार यांनी यापूर्वीही यु.पी.ए.चे नेतृत्व करण्याची आपली मनिषा काही लपविलेली नाही. शरद पवारांना यु.पी.ए.च्या अध्यक्षपदासाठी कॉँग्रेसचा विरोध असला तरीही आज कॉँग्रसेची स्थिती नाजूक आहे. पक्ष योग्य नेतृत्व देऊ शकत नाही. अशा स्थितीत भाजपाविरोधी व्यासपीठाचे नेतृत्व काय देणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे जर कॉँग्रेस यु.पी.ए.चे नेतृत्व सोडणार नसेल तर एक नवे राजकीय व्यापीठ करावे लागणार आहे. किंवा यु.पी.ए.च्या सल्लागारपदी सोनिया गांधींना नियुक्त करुन नवे नेतृत्व निर्माण करावे लागेल. अर्थात सध्याच्या पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यावरच या हालचालींना वेग येईल. यु.पी.ए.चा दुसरा अवतार जन्माला घालणे ही आता काळाची गरज ठरली आहे. भविष्यात यु.पी.ए.चे नेतृत्व जरी कॉँग्रेसकडे नसले तरी त्यात त्यांचा सहभाग आवश्यकच ठरणार आहे. कारण त्यातील कॉँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष आहे. अनेक नवीन सहकारी पक्षही यु.पी.ए.ला त्यातून मिळण्याची शक्यता आहे. शिनसेना, तृममूल कॉँग्रेस, अकाली दल, बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, तेलगू देसम, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी अशा लहान मोठ्या पक्षांना यात सहभागी होता येईल. या सर्वांची मोट यशस्वीरित्या बांधण्यास शरद पवारांसारखे दुसरे नेतृत्व आज देशात नाही. काही ना काही कारणांनी कॉँग्रेसशी चार हात दूर आहेत, परंतु जे पक्ष भाजपाविरोधात आहेत अशा पक्षांना शरद पवार जवळ करु शकतात. त्यामुळे यातून भाजपाविरोधी पक्षांची एकजूट बांधता येऊ शकते. २०२४ सालची निवडणूक जर भाजपा आघाडी विरुध्द यु.पी.ए.ची नवी आघाडी अशी थेट झाल्यास भाजपाला मोठा फटका सहन करावा लागेल. कारण आता भाजपाच्या कारभाराच्या विरोधात जनतेत नाराजी दिसू लागली आहे. जनतेला दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने केली नाही. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडल्याने महागाई वाढली आहे. सर्वसामान्यांचे जीवन फार कठीण झाले आहे. त्यातच कोरोनाच्या महामारीच्या काळात सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी फक्त घोषणाच केल्या. प्रत्यक्षात काहीच हातात पडलेले नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे अगोदरच बेकारीचा असलेला उच्चांक आता नव्या स्तरावर गेला आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपाने गेल्या सात वर्षातही दोन कोटी रोजगार दिलेले नाहीत. संघटीत व असंघटीत कामगार, शेतकरी, नोकरी करणारा वर्ग, बँकिंग व वीमा क्षेत्रातील कर्मचारी, व्यापारी अशा प्रत्येक घटकांची सरकारविरोधात नाराजी आहे. सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला तर सर्वांचाचा विरोध आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या असंतोषाला जागा करुन देण्यासाठी एक व्यापक देशव्यापी राजकीय व्यासपीठ आवश्यक आहे. यु.पी.ए.च्या रुपाने जर शरद पवारांकडे नेतृत्व आल्यास ते शक्य दिसते. कारण आता कॉँग्रेसकडे एक सबळ नेतृत्व म्हणून कोणी पाहत नाही. अशा वेळी भाजपेत्तर विरोधी पक्षांची मोट बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.
0 Response to "भाजपविरोधकांची जूट"
टिप्पणी पोस्ट करा