-->
संपादकीय पान गुरुवार दि. १० जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
विंबल्डनचे विजेते आणि सानियाकडून अपेक्षा
------------------------------------
यंदाच्या विंबल्डन स्पर्धेत सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि चेक प्रजासत्ताकाची पेट्रा क्विटोवा हे विजेते ठरले. या दोघांसाठी हे यश फार मोठे आहे. पेट्राने २०११ मध्ये विंबल्डन जिंकून कारकिर्दीतील पहिलेवहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेत तिला दोन वेळाच उपांत्य फेरी गाठता आली होती. परंतु दोन्ही वेळा यशाने तिला हुलकावणी दिली होती. मागील वर्ष तर तिच्यासाठी फारसे उल्लेखनीय ठरले नव्हते. महिला टेनिसमध्ये सेरेना विल्यम्स आणि अलीकडे मारिया शारापोवा असे दोन अपवाद सोडल्यास इतर आघाडीच्या टेनिस खेळाडूंना सातत्य राखण्यात अपयशच आले आहे. पेट्राची गणना अशाच खेळाडूंमध्ये करण्यास तज्ज्ञांनी सुरवात केली होती. खरे तर पेट्रा, ऍना इव्हानोविच, ऍग्नीस्का रॅडवन्स्का यांच्या गुणवत्तेविषयी कुणालाच शंका नाही. पेट्राने कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते. यावेळच्या विजयामुळे एकदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेपुरते चमकलेले खेळाडू म्हणून तिची कुणीही गणना करणार नाही. पेट्राचा सामना पाहण्यासाठी मार्टिना नवरातिलोवा आणि माजी विजेती याना नोवोत्ना उपस्थित होत्या. यावरून पेट्राची क्षमता आणि गुणवत्ता किती आहे याची कल्पना येते. पुरुष एकेरीचा चँपियन नोव्हाक जोकोविच याच्यासाठी सुद्धा हे यश अनेक कारणांसाठी महत्त्वाचे ठरले आहे.. फेडरर आणि रॅफेल नदाल यांना त्याने क्रमवारीत मागे टाकले असले, तरी या मातब्बरांच्या तुलनेत त्याला आणखी बरीच मजल मारायची आहे. रॉजर फेडररला हरवून जोकोविचने ही कामगिरी केली. फेडररसाठी ग्रास कोर्ट हे जणू काही होम कोर्ट असते. फ्रेंच ओपनमध्ये नदाल जसे वर्चस्व राखतो, तसेच फेडररकडे विंबल्डन सम्राट म्हणून पाहिले जाते. फेडररवरील हा विजय जोकोविचच्या कारकिर्दीत म्हणूनच आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीत गणला जाईल. अगदी त्याच्यावर मात केल्यानंतरही फेडररविषयीची ती भावना कायम असल्याचे सांगताना नम्रता आणि खिलाडू वृत्ती या दोन्हीचा प्रत्यय जोकोविचने दिला. खरे तर विंबल्डन म्हटल्यावर संभाव्य विजेत्यांमध्ये दोन्ही गटांत पेट्रा आणि जोकोविच ही नावे होती, पण त्यांच्याआधी इतर नावे घेतली जात होती. सेरेना, शारापोवा, फेडरर अशी ही नावे होती. प्रत्यक्षात काही नवे चेहरे गाजले. महिला एकेरीत कॅनडाची युजेनी बुशार्ड, रुमानियाची सिमोना हालेप, चेक प्रजासत्ताकाची ल्यूसी सॅफारोवा, शारापोवाला हरविलेली जर्मनीची अँजेलीक र्केबर, सेरेनाला हरविलेली फ्रान्सची अलिझ कॉर्ने हे चमकले. पुरुष एकेरीत ग्रिगोर दिमीत्रोव, कॅनडाचा मिलॉस राओनीच, नदालला हरविलेला ऑस्ट्रेलियाचा नीक किर्गीऑस यांनी लक्षवेधी कामगिरी केली. यातील युजेनी, मिलॉस यांचे यश कॅनडासाठी प्रेरणादायी ठरले. यंदाची विंबल्डन स्पर्धाही अत्यंत संस्मरणीय ठरली. पुरुष एकेरी आणि महिला एकेरी अशा दोन्ही गटांत प्रत्येकी १२८ खेळाडूंचा सहभाग होता, त्यामुळे काही प्रमाणात अनपेक्षित निकालाचे धक्के बसणारच होते. प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धा लक्षात राहते ती विजेत्यांच्या यशामुळे. आपल्या देशाचा विचार करता विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर सानिया मिर्झाने दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी मजल मारली. आतापर्यंतच्या करिअरमधील तिचे हे सर्वोत्तम रॅकिंग आहे. २००३ मध्ये व्यावसायिक टेनिस खेळणार्‍या सानियाने झिम्बाब्वेची आपली सहकारी कारा ब्लॅकसोबत विम्बल्डनच्या दुसर्‍या फेरीपर्यंत मजल मारली होती. ती १३० पॉइंटनुसार ती पाचव्या स्थानी पोहोचली आहे.  सानियाच्या मनगटाला झालेल्या दुखापतीनंतर ती आता त्यातून बरीच सावरली आहे. सानियावर तीन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. मेहनतीच्या जोरावर मला हे स्थान मिळाले आहे, अशी तिची प्रतिक्रिया फारच बोलकी होती. टॉप ५ मध्ये सहभागी झाल्याने मी खूप आनंदी  आहे, अशी प्रतिक्रिया सानिया मिर्झाने दिली आहे. नजिकच्या काळात सानियाची क्रमवारी वर चढतच जाईल आणि एक दिवस ती विजेती ठरेल अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही.
--------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel