-->
शरदरावांचा भूलभूलय्या

शरदरावांचा भूलभूलय्या

31 मार्चसाठी अग्रलेख शरदरावांचा भूलभूलय्या ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांचा भूलभूलय्या हा काही औरच असतो. गेल्या सहा दशकात त्यांनी आपली पुरोगामी विचारसारणीशी असलेली बांधिलकी जपत असताना त्यांची ज्या सहजतेने डाव्या विचारसारणीच्या लोकांमध्ये उठबस आहे, त्याच तत्परतेने ते उजव्या विचारांच्या लोकांमध्येही सहज मिसळतात. त्यांची उठबस जेवढी देशातील आघाडीच्या उद्योगपतींमध्ये आहे, तेवढी कोणत्याच राजकारणी व्यक्तीची नसेल. मात्र तेवढ्याच सहजतेने ते कामगार नेत्यांमध्येही वावरतात. त्याशिवाय साहित्यिकांपासून ते समाजातील प्रत्येक समाज घटकांमध्ये त्यांनी मित्रमंडळी जोपासली आहेत. सर्वसामान्य जनतेला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेवढ्याच तत्मयतेने ते भेटत असतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यातील प्रत्येकांना पवारसाहेब आपलेच वाटतात (आणि तसे पाहिले तर ते कोणाचेही नसतात). पत्रकारांमध्ये तर पवारसाहेबांना मोठा चाहता वर्ग आहे. एवढे प्रेम पत्रकारांनी कोणत्याच राजकीय नेत्यावर मनापासून केले नसेल. असे हे शरद पवार कधी कोणाला राजकारणात चकवा देतील आणि बाजी मारुन जातील हे सांगता येत नाही. आपल्या भोवती भूलभूलय्या निर्माण करणे यात त्यांची खासिय़त आहे. नुकताच त्यांनी एक भूलभूलय्या निर्माण केला आणि त्यांच्या सर्व देशातील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर बातम्या झळकल्या. एका गुजराती दैनिकाने पवार व शहा भेटीची सनसनाटी बातमी प्रसिध्द केली आणि त्याचे पडसाद सर्वत्र घुमू लागले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने याचा इन्कार केला व अशी काही भेट झालीच नाही असे म्हटले. तर खुद्द अमित शहा यांनी सर्वच काही खुलेपणाने सांगता येत नाही, असे बगल देणारे उत्तर दिल्याने या भेटीतील गूढ वाढले. सर्वात महत्वाचे हे सर्व घडल्यावर खुद्द पवार साहेब रुग्णालयात दाखल झाले व त्यांच्यावर आता छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने पुढील दहा-पंधरा दिवस तरी ते पत्रकारांना भेटतीलच असे काही दिसत नाही. आता त्यांचे आजारपण एवढ्याचत उदभवणे हा एक योगायोग समजावा लागेल. किंवा हा देखील याच भूलभूलय्याचा अध्याय असावा. पवार साहेबांच्या बाबतीत काहीही शक्य आहे. एका गुजराती वृत्तपत्राच्या दाखल्यानुसार ही भेट अहमदाबाद येथील एका उद्योगपतीच्या घरी झाली. अर्थात हा उद्योगपती कोण, हे काही नाव लपणार नाही. कारण सध्या भाजपाशी जवळ असलेले व पवारांशीही तेवढीच मैत्री असलेले अदानी यांच्या घरी ही भेट झाली हे सांगण्यासाठी कोणी मोठ्या ज्योतिषाची गरज नाही. गेले काही दिवस प्रामुख्याने वाजे प्रकरणानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस खूपच बदनाम झाली आहे. त्यातच भाजपाच्या नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी लावून धरली आहे. राज्यपाल देखील आपला अहवाल पाठविणार अशी चर्चा जोरात होती. या पार्श्वभूमीवर पवारांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणे स्वाभाविकच आहे. मात्र याचा शरदरावांना काही नवीन समिकरणे जुळवायची आहेत (म्हणजे भाजपा व राष्ट्रवादीचे सरकार आणणे) असा अनेकांनी अर्थ काढला. परंतु सध्या पवार भाकरी परततील, अशी स्थिती नाही. कारण सध्याच्या स्थितीत पवार ज्या गतीने मोदी व भाजपाचे टिकाकार झाले आहेत ते पाहता एवढ्या झपाट्याने आपली भूमिका १८० डिग्रीत बदलतील असे काही वाटत नाही. सद्याचे राज्य सरकार टिकवणे व भावी लोकसभेच्या निवडणुकीला सर्व विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उभे राहणे ही पवारांची मनिषा आहे. त्यादृष्टीने त्यांच्या सर्व हालचाली सुरु आहेत. अशा स्थितीत भाजपाशी महाराष्ट्रात संग केल्यास त्यांच्या या इच्छांना मुरड घालावी लागेल. महाराष्टात महाविकास आघाडीच्या सरकारला राज्यपाल व भाजपाचे नेते उठसूठ त्रास देत आहेत. परंतु भाजपाच्या अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या कुंडल्या पवारांकडे आहेत. अगदी न्य़ा. लोया प्रकरणही मध्येच डोकावत असते. अशा वेळी राज्यातील सरकार वाचविण्यासाठी विरोधकांच्या काही प्रकरणांवर पाघरुण घालण्याचे लेन-देन प्रकार होऊ शकतात. अर्थात या गोष्टी काही उघडपणे राजकारणात होत नसतात. या गोष्टी या कानाच्या त्या कानाला लागतही नाही आणि सहजतेने घडतात. यालाच राजकारण म्हणतात. पवार खरे तर सध्या ममतादीदीच्या प्रचाराला जाणार होते परंतु आजारपणामुळे त्याचे जाणे थांबले. एकूणच काय पवारांची शहांची झालेली भेट, त्यानंतर आलेले आजारपण, ममतादीदींचा प्रचाराला न जाणे हे सर्व एका क्रमात झाले आहे. हा कोणी घडवून आणलेला योगायोग समजू नये. पवारांनी शहांची भेट घेऊन शिवसेना व कॉँग्रेसलाही एक प्रकारे धक्का दिला आहे. वाझे प्रकरणाने शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला राजकीय फटका जास्त बसला. पण शिवसेनेने जास्त माज करु नये. कारण सत्तेची समीकरणे पवार बदलू शकतात, असे शिवसेनेला त्यांनी वेगळ्या भाषेत बजावले आहे. कॉँग्रेसच्या टेकूवर हे सरकार आहे असे बजावणाऱ्या कॉँग्रेसलाही तुमची वेळ पडल्यास गरज भासणार नाही असे वेगळ्या भाषेत सांगितले आहे. कॉँग्रेसने कितीही गमजा केल्या तरी त्यांनाही सत्तेची ओढ आहेच. आज सत्ता नसली तर राज्यातील कॉँग्रेस पुन्हा कोमात जाऊ शकते. पवारांच्या या कथीत भेटीने अनेकांना त्यांनी गारद केले आहे. शेवटी राजकारणात कोणीच शत्रू नसतो हे पवारसाहेबांचे आवडते सूत्र आहे. या सुत्राचा विचार केल्यास काहीही होऊ शकते. शेवटी पवारसाहेबांच्या भूलभूलय्यात फसल्यास डोके भणभणेल आणि हाताला काहीच लागणार नाही. खरे काय पुढे होणार आहे हे काळच ठरविल.

Related Posts

0 Response to "शरदरावांचा भूलभूलय्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel