
पोलिस दलातील दलदल
19 मार्चसाठी अग्रलेख
पोलिस दलातील दलदल
पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यावर आता स्फोटके प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून पोलिस दलातील अनेक जण यात उघडे पडणार असे दिसू लागले आहे. राज्य सरकारने आवश्यकता नसताना सचिन वाझे यांना वाचविण्यासाठी त्यांना सुरुवातीला निलं
बित न करता बदली करणे पसंत केले होते. मात्र एन.आय.ए.ने त्यांना अटक केल्यावर शेवटी निलंबित करावेच लागले. खरे तर चकमकफेम म्हणून गाजलेल्या वाझे यांना तातडीने निलंबित केले असते तर सरकारची त्यावेळी अब्रु वाचली असती. परंतु आता झालेले नुकसान टाळण्यासाठी डॅमेज कंट्रोल सुरु झाले आहे. याचा एक भाग म्हणून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली व त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. आपल्याकडील पोलीस दल कार्यक्षम असल्याचा आपण अनेकदा दावा करीत आलो असलो तरीही पलीसांतील दलदल खूप आहे व यात अनेक जण रुतलेले आहेत. ही दलदल या स्फोटकांच्या प्रकरणातून आता बाहेर आली आहे. अर्थात ही दलदल काही एका वर्षात झालेली नाही तर वर्षानुवर्षे साचलेली आहे. आता फक्त ती उघड झाली आहे एवढेच. मुंबई पोलिसांनी स्फोटकांच्या चौकशीत अनेक गंभीर चुका केल्या आहेत. किंबहुना त्या चुका जाणूनबुजून केल्या असण्याची शक्यता आहे. एन.आय.ए.च्या चौकशीत पोलिस दलाची व राज्य सरकारची बदनामी मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलीस दलातील घडामोडी इत्थंभूत पोहोचत असल्याचे सरकारला दिसले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, पोलीस दलात भाजपाला खबरा पोहोचविणारे आहेत. हे सर्व घडत असताना पोलिस अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा काहीच दरारा नसल्याचे दिसत होते. त्यामुळेच परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. नगराळे यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेताच, काही पोलिसांमुळे सध्या मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. ती सुधारण्याचा माझा प्रयत्न असेल असे ते म्हणाले आहेत. पोलिसांची प्रतिमा आता खरोखरीच सुधारण्याची नितांत गरज आहे. कारण केवळ याच प्रकरणाने नव्हे तर गेल्या काही वर्षात मुंबईतील पोलीस दलाची अनेक बाबतीत बदनामीच जास्त झाली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या टी.आर.पी. घोटाळ्या प्रकरणी बँकफुटवर गेलेल्या भाजपाला आता राज्य सरकारला बदनाम करण्याची एक चांगली संधी स्फोटकांच्या प्रकरणाने गवसली आहे. त्यात सरकारपेक्षा शिवसेना चांगलीच अडचणीत आली. कारण सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात दाखल करण्याचा शिवसेनेचा निर्णय होता. पोलीस दलातून निलंबित केल्यावर वाझेंनी शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारुन पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु सत्ता येताच त्यांना कोरोनाचे निमित्त करुन पुन्हा दाखल करुन घेण्यात आले. सुशांतसिंग राजपूत खून की आत्महत्या या प्रकरणी भाजपाने आक्रमकपणा दाखवित राज्य सरकारला चांगलेच घेरले होते. परंतु ही आत्महत्याच असल्याचे उघड झाल्यावर भाजपाला आपली सर्व प्यादी मागे घ्यावी लागली होती. त्यापाठोपाठ अर्णब गोस्वामी प्रकरण आले. त्यात भाजपाने अर्णबची खुलेपणाने बाजू घेतली होती. परंतु यातही त्यांना फारसे यश आले नाही. उलट या प्रकरणी अनेक भाजपाचे केंद्राचे नेतेही बदनाम झाले. त्यावेळी प्रकाशित झालेल्या व्हॉटस अप चॅटमुळे भाजपाचेच अनेक नेते अडचणीत आले होते. परंतु हे प्रकरण तेथेच आटोपण्यात आले. अशा प्रकारे दोनवेळा बॅकफूटवर जाणाऱ्या भाजपाने आता सचिन वाझे प्रकरणात मात्र सरकारला नामोहरण करण्याचा चंग बांधला. यात भाजपा मात्र चांगलाच यशस्वी झाला आहे. कारण हे प्रकरण दिसते तेवढे काही सोपे नाही असेच म्हणावे लागेल. सचिन वाझे हे दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहात होते व तेथूनच त्यांचे सर्व कारभार चालीत. अर्थात हे सर्व राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे वाझे यांच्या पाठीमागे नेमके कोण आहेत ते उघड होणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षात अशा प्रकारचे चकमकफेम पोलिस अधिकारी झटपट लोकप्रिय झाले आहेत. वाझेंनी आजवर ६३ गुंडांना कंठस्थान घातले आहे. त्याचे अनेक जण समर्थन करतात परंतु अशा प्रवृत्ती पोलिसांमध्ये वाढल्यास त्याचे नुकसानच पहावयास मिळते. खरे तर कोणत्याही गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही न्यायालयाने द्यायची आहे. परंतु ही शिक्षा आपणच देण्याकडे पोलिसांचा कल वाढत चालला आहे. पोलिसांना आपणच या दुनियेतील सर्वेसर्वा असल्याचा भास यातून होतो. परिणामी यातून खंडणीखोरही वाढतात असा अनुभव आहे. वाझें किती कार्यक्षम असले तरीही त्यांच्यात जी मस्ती, बेफिकिरी वाढली होती त्याला याचीच सर्व पार्श्वभूमी आहे हे विसरता येणार नाही. पोलीस दलातील ही दलदल शोधून त्यातील काही जणांची हकालपट्टी करणे ही काही सोपी बाब नाही. कारण यातील अनेकांना काही जणांचे राजकीय आशिर्वाद असतात. त्यावर अनेक पोलीस आपले दुकान चालवित असतात. परंतु हे कुठेतरी थांबले पाहिजे. जनतेला पोलीस हा आपला मित्र व गुन्हेगारांना कर्दनकाळ वाटला पाहिजे. पोलीसांची ही प्रतिमा पुन्हा येणे मोठे अवघडच आहे.
0 Response to "पोलिस दलातील दलदल"
टिप्पणी पोस्ट करा