-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २० डिसेंबर २०१३च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
मोदी आणि राहूलही नको!
-----------------------------
पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर आता सर्वांचे डोळे येत्या चार महिन्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकांकडे लागले आहेत. जानेवारी महिन्यांत बहुदा कॉँग्रेस पक्ष आपल्या पंतप्रधानांचा उमेदवार म्हणून पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांची निवड करेल असे चिन्ह आहे. कॉँग्रेस पक्ष सहसा पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीअगोदर जाहीर करीत नाही. परंतु यावेळी भाजपाचे पंतप्रदानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे आपली जी हवा तयार केली आहे त्याचा धसरा घेऊन कॉँग्रेसलाही पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा लागणार आहे असेच दिसते. त्यामुळे कॉँग्रेसने राहूलच्या नावाची घोषणा केल्यास यावेळी राहूल विरुध्द मोदी अशी थेट लढत होईल. गेल्या काही दिवसात यासंबंधी जो अनेक चॅनेल्सनी पाहणी अहवाल प्रसिध्द केला आहे त्यानुसार सध्या तरी मोदी यांचा घोडा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. परंतु या अहवालावरच आधारित काही निकाल लागत नसतात. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना आपण सत्तेच्या जवळ पोहोचल्याची स्वप्ने पडत असली तरी त्यात काही तथ्य नाही. जगातील नामवंत आर्थिक शिक्षण देणारी संस्था लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधील भारतीय वंशांचे प्राध्यापक सुमांत्रा बोस यांच्या मते तर यावेळी राहूल व मोदी या दोघांनाही पंतप्रधान होण्याची संधी जनता देणार नाही. बोस हे भारताच्या राजकीय व आर्थिक घटनांचे एक आघाडीचे विश्‍लेषक म्हणून जगात ओळखले जातात. त्यांचे आजवरचे अनेक अंदाज खरे ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या या म्हणण्याला विशेष महत्व आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, २०१४ सालच्या निवडणुकांनंतर कॉँग्रेस पक्षावर असलेले गांधी-नेहरु परिवाराचे वर्चस्व कमी होत जाणार आहे. राहूल हे काही पंतप्रधान जसे होऊ शकणार नाहीत तसेच मोदींची हवा देखील हवेत विरणार आहे. त्यामुळे ते देखील पंतप्रधान होणार नाहीत. कॉँग्रेस पक्षावरील गांधी घराण्याचे प्रभूत्व कमी झाल्यास पक्षात सामुहिक नेतृत्व उदयास येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा फारसा प्रबाव पडणार नाही. ज्याप्रकारे जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया हे समाज नेते होते तसे मोदी काही होऊ शकणार नाहीत. मोदी हे ठराविक एका विभागाचे व कॉर्पोरेटचे नेते होऊ शकतील. परंतु त्यांना सर्व समाजघटकात आदराचे स्थान मिळणार नाही, बोस यांचे मत काही खोटे ठरेल असे वाटत नाही. कारण मोदी यांची जनमानसातली प्रतिमा ही काही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी नाही. त्यामुळे असा नेता देशाचे नेतृत्व करु शकत नाही. भाजपाचे सरकार सत्तेवर येऊन टिकले या मागचे महत्वाचे कारण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांची असलेली प्रतिमा. वाजपेयी यांच्या प्रतिमेच्या तुलनेत मोदी हे फारच फिके ठरतील असे आहेत. उलट गुजरात दंगलीचा ठप्पा मोदींवर बसल्यापासून त्यांची प्रतिमा मलिन झालेली आहे. त्याबरोबर भाजपा हा काही देशपातळीवर पोहोचलेला पक्ष नाही. संपूर्ण दक्षिण भारतात व ईशान्येकडील राज्यात भाजपाचे अस्तित्व नगण्यच आहे. दक्षिणेकडील कर्नाटकात त्यांना भ्रष्टाचारामुळे सत्ता गमवावी लागली आहे. त्यामुळे त्यांची दक्षिणेतील पत घसरली आहे. उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यात भाजपाला आपल्या जागा वाढवायच्या असतील तर गेल्या वेळी मिळालेली १५ टक्के मते दुपटीने वाढवावयास हवीत. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल व जनता दल युनायटेड यांच्यात जागा प्रामुख्याने वाटल्या जातील. त्यामुळे भाजपाच्या जागा घसरणार आहेत, हे बोस यांचे विश्‍लेषण योग्यच वाटते. आम आदमी पक्षाने दिल्लीत लक्षणीय कामगिरी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र बोस यांच्या सांगण्यानुसार, हा पक्ष दिल्लीच्या बाहेर फारसे काही करेल असे  नाही. त्यांचे दिल्ली मॉडेल अन्य राज्यात किंवा प्रमुख शहरात काही यशस्वी होणार नाही. दिल्लीत आम आदमीला जो पाठिंबा मिळाला त्यामागे अनेक कारणे आहेत आणि या कारणांची झेरॉक्स आवृत्ती अन्य शहरात होऊ शकत नाही. परंतु आम आदमी पक्ष ही अनेक प्रस्थापित पक्षांसाठी एक धोक्याची घंटा ठरावी. कारण लोक कॉँग्रेस- भाजपा या दोन्ही पक्षांना विटल्यामुळे ते आम आदमी कडे वळले आहेत. त्यामुळे लोकांना जिकडे दुसरा चांगला पर्याय मिळणार आहे तिकडे ते वळणार हे नक्की आहे. आम आदमी जिकडे नसेल तर तिकडे तिसर्‍या आघाडीला यातून चांगले दिवस येऊ शकतील. बोस यांच्यासारखे जाणकार समाजशास्त्रज्ञ व अर्थतज्ज्ञ आज जे विचार मांडत आहेत ते ललोकांच्या मनातील विचार आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. लोकांनी कॉँग्रेस असो किंवा भाजपा या दोन्ही पक्षांना आजवर पुरेपुर संधी दिलेली आहे. या संधीचे त्यांनी लोकांच्या भल्यासाठी कधीच वापर केलेला नाही. त्यामुळे जनता एका चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे. हा चांगला पर्याय तिसरी आघाडी देऊ शकते. गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या तिसर्‍या आघाडीच्या जातीयवाद विरोधी मेळाव्यातून एक महत्वाचे पाऊल पडले आहे. आता ही एकजूट मजबूत करुन एक समर्थ पर्याय उभा करण्याची गरज आहे. आम आदमी प७ाने हा पर्याय दिल्लीत दिला परंतु ते संपूर्ण देशात असा पर्याय देऊ सकत नाहीत. अशा वेळी तिसरी आघाडीच आपले स्थान लोकांमध्ये बळकट करु शकते.
---------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel