-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २० डिसेंबर २०१३च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
भारतीयांच्या दातृत्वाचा जगात पहिला क्रमांक
-----------------------
समाजउपयोगी कामांसाठी दातृत्व करण्याची आपल्याकडे पूर्वीपासून पध्दत आहे. प्रत्येक जण आपल्या आर्थिक कुवतीनुसार विविध संस्थांना देणग्या, कामासाठी वेळ देत असतो. मात्र गेल्या काही वर्षात प्रामुख्याने आर्थिक उदारीकरण सुरु झाल्यापासून आपल्याकडे लोक आपला स्वत:चाच विचार जास्त करु लागले आहेत, असे दिसू लागले होते. मात्र यात काही तथ्य नाही. कारण वर्ल्ड गिव्हिंग इन्डेक्स म्हणजे दातृत्व करणार्‍यांच्या निर्देशांकात भारताने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. २०१३ सालच्या या अहवालानुसार, गेल्या वर्षी २४.४ कोटी भारतीयांनी समाजउपयोगी कामांसाठी लहान-मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या. जगातील एकाद्या देशातून ऐवढ्या मोठ्या संख्येने देणग्या देणार्‍यांची असलेली ही सर्वात मोठी संख्या आहे. त्याखालोखाल अमेरिकेतील १५.८ कोटी लोकांनी तर चीनमधील ११.३ कोटी लोकांनी दातृत्व केले. यात एक बाब लक्षात घेतली पाहिजे की आपली अवाढव्य लोकसंख्या असल्याने आपल्याकडील संख्या मोठी आहे. मात्र लोकसंख्येचा विचार करता ही संख्या तशी कमी आहे. त्याउलट अउमेरिकेची लोकसंख्या ३५ कोटी आहे तर त्यांच्या देणगीदारांची संख्या १५ कोटींवर आहे. एकू़ण निधीचा विचार करता अमेरिकेतून झालेल्या देणग्यांचा आकडा जगात सर्वाधिक आहे. एकूण जगभरात झालेल्या देणग्यांमध्ये अमेरिकेचा वाटा ६१ टक्के एवढा आहे. अमेरिकेतील सर्वसामान्य माणूस असो किंवा मोठा उद्योगपती तो आपल्या कमाविलेल्या पैशातील काही प्रमाणात वाटा समाजउपयोगी कामांसाठी देत असतो. त्याखालोखाल कॅनडा, मॅनमार व न्यूझीलंड यांचा क्रमांक लागतो. यांच्या एकूण देणगीतील वाटा ५८ टक्के आहे. जागतिक पातळीवर अनेक देणग्या या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होत असतात. परंतु आता स्वयंसेवी संस्थांही बोगस निघाल्यापासून अनेकदा देणगीदारांचा कल हा थेट लाभार्थींना देण्याकडे असतो. भारतात अनेकदा विविध समाजउपयोगी कामे करताना एखाद्या समुदायांना लाभ व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात. काही जण संस्थांना ऑनलाईन आर्थिक मदत करतात. त्यासाठी गीव्ह इंडिया या सारख्या संस्था कार्यरत आहेत. या ऑनलाईन व्यासपीठावर अनेक संस्था व त्यांचे कार्य नोंदविलेले असते. मग देणगीदार त्यातून संस्था निवडून आपली देणगी त्यांना ऑनलाईन देतो. या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. या ऑनलाईन व्यासपीठामुळे जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात तुम्ही समाजउपयोगी संस्थांना आर्थिक मदत देऊ शकता. गीव्ह इंडियाने केलेल्या या पहाणीत या ऑनलाईन व्यासपीठामुळे देणग्या देण्याचे प्रमाणही वाढले आहे. २०१३ या वर्षात गेल्या १३ वर्षात प्रथमच ३० कोटी रुपयांच्या देणग्या केवळ गीव्ह इंडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या देणग्यांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली. आजवर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या जात होत्या. परंतु आता आपल्याकडेही विविध सामाजिक कार्यासाठी देणग्या देण्याकडे कल वाढत आहे. आपल्याकडे नामवंत उद्योगपती किती देणग्या देतात हा संशोधनाचा विषय ठरेल. मात्र पहिल्या पिढीतील तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपती नारायणमूर्ती, अझीम प्रेमजी, शिव नाडर यांनी मोठ्या प्रमाणावर देणग्या देऊन बिल गेटस, वॉरन बफे यांचा आदर्श आपल्यापुढे घालून दिला आहे. आपण ज्या समाजात जन्मलो, त्या समाजातील गरजवंतांना आपल्याकडून फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करणे ही आपली जबाबदारी ठरते. ही जबाबदारी आपण प्रत्येकाने उचलली तर या जगातील दु:खे कमी होण्यास मदत होणार आहे, याची जाणीव आता आपल्याकडे लोकांना होत आहे. त्यामुळे ापल्याकडे दातृत्व करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. ही एक सकारात्मक बाब म्हटली पाहिजे.
-----------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel