-->
संपादकीय पान गुरुवार दि. १९ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
भारताचे अमेरिकेस जशास तसे उत्तर
-----------------------
अमेरिकेच्या मुजोरपणाला भारताने जशास तसे उत्तर दिल्याने सरकारने उचललेल्या या धाडसी पावलाचे स्वागत करावयास हवे. अमेरिकेतील भारतीय दुतावासातील एक महिला अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी त्यांच्या घरातील मोलकरणीस कमी पगार दिल्याचे निमित्त करुन तेथील अमेरिकन अधिकार्‍यांनी खोब्रागडे यांना भर रस्त्यात अटक केली व बेड्या ठोकल्या. त्यानंतर खोब्रागडे यांची सखोल तपासणी करण्यात आली. दुदैवाची बाब म्हणजे देवयानी यांना अटक करण्याचे आदेश एका भारतीय वंशांच्या व्यक्तीनेच काढली होती. देवयानी खोब्रागडे यांनी जो गुन्हा केला आहे तो काही गंभीर स्वरुपाचा नाही. मात्र याव्दारे वर्णद्धेशचाच भाग जास्त दिसतो. त्यामुळेच त्यांच्या अटकेचे आदेश देताना भारतीय वंसांच्या त्या अधिकार्‍याने तरी याचा विचार करावयास हवा होता. मात्र तसे काही झाले नाही आणि भारतीय वकिलातीतील एक ज्येष्ठ महिला अधिकार्‍याला अशी वागणूक मिळते तर तेथील भारतीयांना कशी वागणूक मिळत असेल असा प्रश्‍न उपस्थित होतो. अमेरिकेचा हा मुजोरपणा अर्थातच काही नवीन नाही. आपण जगाचे रक्षणकर्ते आहोत अशा थाटात वागायचे आणि विकसनशील व अविकसीत देशांतील लोकांना तसेच वर्णाच्या आधारावर कमी लेखण्याची ही अमेरिकेची काही नवीन नाही. यापूर्वी माजी राष्ट्रपती अब्दु कलामांपासून ते अभिनेते शाहरुख खान यांना अशा प्रकारची वाईट वागणूक विमानतळावर मिळाली होती. अमेरिकेतील व्टीन टॉवर अतिरेक्यांनी पाडल्यापासून तेथील अधिकारी मुस्लिम नाव दिसले की सावध होतात आणि त्यांच्याकडे संशयीत नजरेने पाहिले जाते. त्यामुळेच आपल्याकडील अधिकारी असोत किंवा सेलिब्रेटी यांना वाईट वागणूक देण्याचे निमित्त केले जाते. खोब्रागडे यांना अशी वाईट वागणूक मिळताच भारताने तत्परतेने पाऊल उचलून भारतातील अनेक दुतावासातील कर्मचार्‍यांना मिळणार्‍या सवलती व प्राधान्यता थांबविल्या आहेत. तसेच भारत भेटीवर आलेल्या एका अमेरिकन शिष्टमंडळास भेटण्यास लोकसभाध्यक्ष मीरा कुमार, राहूल गांधी व नरेंद्र मोदी यांनी नकार दिला आहे. अशा प्रकारे कधी नव्हे तेवढा आक्रमकता भारत सरकारने दाखविली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. अमेरिकेतील वृत्तत्रांनी मात्र भारतविरोधी भूमिका घेतली असून त्यांच्याकडून तशीच अपेक्षा होती. राजनैतिक अधिकार्‍यांना व्हिएन्ना करारानुसार विशेषाधिकार प्राप्त झालेले आहेत. याची अंमलबजावणी जगातील सर्व देशांना करावी लागते. परंतु अमेरिकेने या कायद्याचा भंग केला आहे. आपण मात्र या कराराचे प्रामाणिकपणे पालन करीत आलो आहोत. मध्यंतरी एकदा अमेरिकन राजनैतिक अधिकार्‍याने आपल्या समलिंगी सोबत्याला भारताचा व्हिसा मिळावा म्हणून आग्रह धरला होता. आपल्या देशातील कायदा पाहता त्या अधिकार्‍याला अटक व्हायला पाहिजे होती. परंतु भारताने तसे करणे टाळले. आपण जसा या राजनैतिक अधिकार्‍याबाबत विशाल दृष्टीकोन ठेवला तशी भूमिका अमेरिकेने देवयानी यांच्याबाबत काही घेतली नाही. अमेरिकेचे खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे अशी तर्‍हा आहे. स्नोडेनने उघड केलेल्या माहितीनुसार अमेरिका आपल्या मित्र म्हणून ओळखलेल्या देशांत देखील किती मोठ्या प्रमाणावर हेरगिरी करते किंवा दखल घेते हे स्पष्ट झाले आहे. त्यावरुन अमेरिकेचा खरा कुणीच दोस्त नाही. तसेच अमेरिका कोणत्याच देशावर विश्‍वास ठेवत नाही हे सिध्द होते. आशिया खंडात देखील पाकिस्तानला सर्वतोपरी मदत करुन भारत कसा दुर्बळ राहिल हे अमेरिका नेहमी पाहात आली आहे. एकीकडे अतिरेक्यांविषयी आपण लढतो आहोत असे दाखवायचे आणि अतिरेक्यांचे माहेरघर असलेल्या पाकिस्तानला दुसर्‍या हाताने सढळ मदत करावयाची असे दुपट्टी राजकारण अमेरिका करीत आली आहे. यात त्यांना पाकिस्तानचा पुळका नाही, फक्त भारताला सतत दबावाखाली ठेवायचे असते. अमेरिका आपल्या देशात पारदर्शकता असल्याचा व गुन्हेगारांना शिक्षा करीत असल्याचा मोठा आव आणते. परंतु भोपाळ वायू कांडातील मुख्य गुन्हेगार वॉरर्न अँन्डरसन असो किंवा हेडली यांना भारताच्या हवाली करण्यास अमेरिकेने नेहमीच असमर्थता दाखविली आहे. जर अमेरिका खरोखरीच गुन्हेगारांना पाठीशी घालत नसती तर त्यांनी भारताचे हे गुन्हेगार आपल्या हवाली केले असते. अशा प्रकारे एकीकडे गुन्हेगारांना संरक्षण द्यायचे व दुसरीकेड भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांना मात्र किरकोळ गुन्ह्यांवरुन भर रस्त्यात अटक करावयाची, हे अमेरिकाच करु शकते.
--------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel