-->
संपादकीय पान बुधवार दि. १८ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी अग्रलेख --
----------------------
कॉँग्रेसचे बुडते जहाज
----------------------
एकदा जहाज बुडायची काणकूण लागली की जहाजतले उंदीर सैरावैरा पळू लागतात अशी एक म्हण आहे. कॉँग्रेस पक्षाचेही बुडणार्‍या जहाजाप्रमाणे झाले आहे. गेल्या आठवड्यात चार राज्यातल्या विधानसभा निवडणूक निकालात कॉँग्रेसच्या पदरी केवळ घोर निराशा आली आणि त्यांचे जहाज बुडणार हे नक्की झाले. बुडत्याला काडीचा आधार असतो त्या म्हणीवर आधारीत कॉँग्रेसचा फक्त मिझोराममध्येच विजय झाला. परंतु मिझोराम हे राज्य ऐवढे छोटे आहे की त्याचा सकारात्मक प्रभाव देशाच्या राजकारणावर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे कॉँग्रेसचे एक-एक साथीदार आता त्यांना सोडून जाण्याच्या तयारीत लागले आहेत. काही करुन कॉँग्रेस सरकारला पुढील एप्रिल पर्यंत सरकार चालवायचे आहे. कारण आपला कालावधी आपण पूर्ण केला असे तरी मतदारांना त्यांना भासवायचे आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारी कॉँग्रेसचा एक साथीदार पक्ष द्रमुकने कॉँग्रेस विरोधी नाराजीचा सूर लावून पुढील निवडणुकीत कॉँग्रेससमवेत जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तामीळनाडूतील गेले दहा वर्षे त्यांच्या सोबत असलेला हा सहकारी आता कॉँग्रेसला सोडून जाणार हे नक्की झाले आहे. टू जी प्रकरणी आपल्या नेत्यांना कॉँग्रेसने जेलमध्ये टाकून आमची खूपच छळणूक केली आहे. अशा या पक्षाची साथ सोडलेलीच बरी असा साक्षात्कार द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांना आता झाला आहे. द्रमुकचे ए. राजा व कनिमोळी या दोघांना जेलची हवा बराच काळ खाली लागली होती हे खरेच आहे. मात्र खरे तर त्यांनी त्याचवेळी कॉँग्रेस पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला पाहिजे होता. परंतु त्याकाळी त्यांना सत्ता सोडवत नव्हती. आता कॉँग्रेसची सत्ता पुन्हा येणार नाही हे स्पष्ट होताच करणानिधी यांना हा साक्षात्कार व्हावा हे हास्यास्पद ठरते. भाजपाच्या दिशेने वारा फिरु लागल्यावर द्रमुकने भाजपाशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत. पंरतु भाजपाची साथ ही द्रमुकचे स्पर्धक असलेल्या जयललितांनी यापूर्वीच धरलेली आहे. त्यामुळे भाजपा आता द्रमुकची साथ धरणार की जयललीतांशी असलेला जुना घरोबा चालू ठेवणार हा प्रश्‍न आहे. तामीळनाडूतील हे दोघे पक्ष अलटून पलटून कॉँग्रेस किंवा भाजपाच्या कळपात वावरत असतात. तामीळनाडून भाजपा किंवा कॉँग्रेस यांची स्वबळावर निवडणूक लढविण्याची ताकद नाही. त्यामुळे त्यांनाही दरवेळी द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यांना बरोबर घ्यावून जावे लागते. तुझ्या शिवाय रमेना तुझ्या विना करमेना अशी त्यांची स्थिती असते. द्रमुकने आता आपली दिशा नक्की केल्याने भाजपा जसा सिग्नल देईल तसे जयललीता यांची पुढील राजकीय वाटचाल सुरु होईल. बहुदा जयललीता यांना कॉँग्रेस सोबत जाण्याशिवाय अन्य कोणता पर्याय राहाणार नाही असेच दिसते. कॉँग्रेसचे अशा प्रकारे एक एक साथीदार सोडून जाऊ लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी तृणमूल कॉँग्रेसने कॉँग्रेस आघाडीची साथ सोडली. परंतु समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या कुबड्या घेऊन कॉँग्रेसची ही आघाडी टिकली. कॉँग्रेसच्या आघाडीतील एक आणखी एक घटक असलेल्या राष्ट्रवादीवरही विश्‍वास ठेवता येत नाही. कारण शरद पवारांचा पाय प्रत्येक दगडावर असतो. अशा स्थितीत कॉँग्रेसला आता यावेळच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत आपले सर्व मित्र पक्ष टिकविणे अशक्य कोटीतली गोष्ट होणार आहे. मोदींशी काडीमोड झाल्यापासून नितिशकुमार यांच्या जे.डी.यु. या पक्षाशी चुंबाचुंबी करण्याची संधी कॉँग्रेसला चालून आली होती. निदान निवडणुकीत तरी समझोता होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु चार राज्यातल्या निवडणुकीच्या पराभवानंतर नितिश कुमार कशाला कॉँग्रेसच्या जवळ जातील अणि आपल्या पायावर पराभवाचे खापर फोडतील? पराजिताच्या मागे कुणी जात नाही हे वास्तव नितिशकुमारांना चांगले माहित आहे. कॉँग्रेसची दरवेळी भीस्त असते ती मुस्लीम मतांवर. परंतु अलीकडच्या चार राज्यात या भरवशाच्या मतदारांनीही कॉँग्रेसला झिडकारले आहे अशी आकडेवारी सांगते. तसेच कॉँग्रेसला थेट सबसिडी ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याच्या नव्या योजनेचा फायदा होईल असे वाटले होते. कारण अशा प्रकारे थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करणे म्हणजे एक प्रकारे रोख रक्कम खात्यात जमा करण्याची लाच देण्याचा प्रकार होता. पगरंतु या योजनेतूनही काही फायदा झालेला दिसला नाही. कारण ज्या १५४ विधानसभा मतदारसंघात ही योजना राबविण्यात आली त्यापैकी १३७ मतदारसंघात कॉँग्रेसला थेट पराभव पत्करावा लागला आहे. भाजपाला या मतदारसंघात सर्वाधिक यश म्हणजे १०७ ठिकाणी विजय मिळाला आहे. खरे तर भाजपाने या योजनेला विरोध दर्शविला होता. दिल्लीत शिला दिक्षित यांनी ही योजना आपल्या सर्वच मतदारसंघात युध्द पातळीवर राबविली होती. या योजनेच्या आधारावर त्यांनी १०३ कोटी रुपयांचे वाटप केले होते. परंतु याचा काडीचाही उपयोग कॉँग्रेसला झाला नाही. चार राज्यातल्या निवडणुका व आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन कॉँग्रेसने सहा महिन्यांपूर्वी घाईघाईने ही योजना आखली व त्याची अंमलबजावणी सुरु केली होती. परंतु सरकारने निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ही योजना आखल्याचे जनतेने ओळखले व मते दिली नाहीत. त्यामुळे कॉँग्रेसचे दीडशे वर्षांचे हे जहाज आता बुडायला सुरुवात झाली आहे.
------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel