-->
संपादकीय पान बुधवार दि. १८ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात का जातात?
---------------------------
गेल्या दोन दशकात आपल्याकडे उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात जाण्याकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढला आहे. पूर्वी विदेशात शिक्षण घ्यायला जाणे म्हणजे मोठे वाटायचे. आता विद्यार्थ्यांची विदेशात जाऊन शिकण्यासाठी संख्या वाटल्याने त्याविषयी फार मोठे आकर्षण वाटत नाही. पुढील दहा वर्षांनी तर या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढणार आहे असे एका अहवालात म्हटले आहे. पुढील काळात विदेशात उच्च शिक्षण घ्यायला जाणार्‍या प्रत्येेक तीन विद्यार्थ्यामागे एक हा भारतीय किंवा चीनी असेल. जागतिक पातळीवरील विचार करता २०११ साली ३० लाख विद्यार्थी विदेशात शिकत होते. ही संख्या पुढील दहा वर्षात ४० लाखांच्या घरात पोहोचेल. या वाढीत भारत व चीन या दोन देशांचा वाटा सुमारे ३५ टक्के असेल. आणखी दहा वर्षांनी सुमारे साडे आठ लाख चीनी मुले विदेशात शिकत असतील. तर त्यावेळी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे चार लाखांच्या घरात गेलेली असेल. चीन, भारत यांच्या खालोखाल जर्मन विद्यार्था विदेशात जाऊन शिकतील. जर्मनी यात दक्षिण कोरियाला मागे टाकेल. खुद्द जर्मनीत सुमारे दोन लाख विदेशी विद्यार्थी शिकत असतील. ही मुले केवळ अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश घेतील असे नाही तर ते ब्रिटनमध्ये शिकण्यास मोठ्या संख्येने जातील अशी अपेक्षा आहे. विदेशात शिकण्यासाठी जायला मुलांचा जास्त ओढा हा अमेरिकेतील विद्यापीठात असतो. मात्र हा कल देखील येत्या काही वर्षात बदलेल. सध्या विकसीत देशातील अस्थिर आर्थिक परिस्थीती, व्यापारातजागतिक पातळीवर झालेली घट, घसरत जाणारे उत्पन्न यामुळे एकूणच परिस्थिती बदलत गेली आहे. विकसीत देशातील केवळ आर्थिक वाढ खुंटली आहे तर दुसरीकडे विकसनशील देशातील विकासाची प्रक्रिया वेग घेत आहे. असा स्थितीत भारत व चीन या दोन देशात शैक्षणिक महत्व वाढले आहे. २००९ ते २०११ या काळात चीन व भारत या देशांनी शैक्षणिक क्षेत्रातल्या वाढीवर लक्ष केंद्रीत केले होते. यात उच्च शिक्षणासाठी एक कोटीहून जास्त मुलांनी शिक्षण घेतले. भारत व चीन वगळता इंडोनेशिया, ब्राझील, नायजेरिया, इथियोपिया, पाकिस्तान, मेस्किको, फिलिपाईन्स व कोलंबिया या देशात उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्याकडे मध्यमवर्गीयांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने उच्च शिक्षण घेण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. आपल्याकडे शिक्षणाचे महत्व सर्वांना पटले आहे. असे असले तरीही आपल्याकडे जागतिक दर्जाचे एकही विद्यापीठ उभे राहू शकलेले नाही ही दुदैवाची बाब म्हटली पाहिजे. जागतिक पातळीवरील आघाडीच्या १०० विद्यापीठात आपल्या एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. अगदी आय.आय.टी.चा क्रमांक देखील पहिल्या ५०० विद्यापीठात जेमतेम लागतो. अशा स्थितीत आपल्याकडील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशातील प्रामुख्याने अमेरिका व इंग्लंडमधील विद्यापीठांचा आसरा घेतात. हे शिक्षण गेतल्यावर पुन्हा भारतात येऊन नोकरी अथवा उद्योग व्यवसाय करमार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळे विदेशी शिकणार्‍यांपैकी मोठ्या संख्येने विदेशात स्थायिक होतात. हे जर थांबवायचे असेल तर आपल्याकडील शिक्षण आन्तरराष्ट्रीय दर्जाचे व्हायला पाहिजे. तसेच भारतात हे विद्यार्थी आल्यावर त्यांना उच्च पगाराच्या नोकर्‍या अथवा उद्योगधंदे करण्यासाठी सोयी सवलती मिळाल्या पाहिजेत. आता आपण विदेशातील विद्यापीठांना भारतात संकूल स्थापण्यास परवानगी दिली आहे. अजूनही चांगल्या विदेशी विद्यापीठांनी त्याला अनुकूल प्रतिसाद दिलेला नाही. परंतु नजिकच्या काळात जर चांगली विद्यापीठे भारतात आली तर आपल्याकडेच उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध होऊ शकेल. तसेच अनेक विकसीत देशातील विद्यार्थी आपल्याकडे येऊन शिकल्यास आपल्याला परकीय चलनाचा लाभही होऊ शकतो. परंतु त्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.
--------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel