
चिनी घातपात
03 मार्चसाठी अग्रलेख
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व तिच्या परिसरातील वीज १२ ऑक्टोबर रोजी ग्रीड कोसळल्याने बंद पडली होती. त्यामागे नेमके कोण होते? कोणता तांत्रिक दोष होता? याची चौकशी सरकारने सुरु केली होती. त्यातून चीनने केलेल्या घातपातामुळे ही सर्व यंत्रणा कोसळली होती असे अनुमान काढण्यात आले आहेत. अर्थात चीनने हे सर्व अमान्य केले असून असे आमच्या हातून घडलेले नाही असे स्पष्ट केले आहे. चीन काही हे मान्य करणार नाही, हे आपण समजू शकतो. परंतु हा जर खरोखरीच हल्ला चीनने केला असेल तर ते धक्कादायक आहेच व देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर आहे हेच यावरुन स्पष्ट होते. मुंबईसारख्या महानगरातील वीज जवळपास तीन तासापेक्षा जास्त वेळ गायब होणे हे सर्वात धोकादायक होते. मुंबईत वीज यंत्रणा फारशी जात नाही. किंवा मुंबईतील वीज गेल्यास काही क्षणात परत येते असा आजवरचा अनुभव आहे. परंतु हा सायबर हल्ला झाल्यानेच सर्व यंत्रणा ठप्प झाली होती. आता युध्दे ही केवळ सीमेवर लढली जातात असे नव्हे तर सर्वच आधुनिक माध्यमाच्या मार्फत युध्द हे घराघरापर्यंत पोहोचले आहे. डिजीटल युगात आपण प्रवेश करते झालेले आहोत परंतु याचे जसे फायदे अनुभवतो त्यापेक्षा त्याचे विविध परिणामही धोकादायक आहेत हे विसरता कामा नये. चीन जर आपल्या देशात बसून भारतातील वीज यंत्रणेला आव्हान देत असेल व त्याची कल्पना आपल्याला तब्बल चार महिन्यांनी लागते, हे जर खरे असेल तर आपल्या देशाची सुरक्षितता अतिशय संवेदनाक्षम झालेली आहे असेच म्हणावे लागेल. चीनने हे काही नव्याने केलेले नाही. यापूर्वी भारत-चीन तणावाच्या काळात चीनने ४० हजार सायबर हल्ले केले आहेत असे आता उघड झाले आहे. एवढेच कशाला सीरम, भारत बायोटेक या दोन्ही कोरोनावरील लस बनविणाऱ्या कंपन्या देखील चीनच्या हल्याच्या लक्ष होते. सुदैवाने त्यांच्या यंत्रणांना काही धोका पोहोचला नाही. चीनी हॅकर एवढ्या सक्रीयपणे कार्यरत आहेत व त्याची कल्पना आपल्याला एवढ्या उशीरा म्हणजे तब्बल चार महिन्यांनी लागते हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फारच गंभीर प्रकरण आहे. या विषयीच्या एका कंपनीच्या अहवालावरुन न्यूर्यॉर्क टाईम्सने वृत्त प्रसिध्द केले आहे. त्यांच्या वृत्तानुसार चीनी हॅकर्सचा भारतातील संपूर्ण वीज यंत्रणा कोसळविण्याचा विचार होता. परंतु ते त्यांना काही शक्य झाले नाही. मागच्या वर्षी भारत-चीनचा गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. तेथे कोण जिंकले कोण हरले हे सांगणे कठीण असले तरी भारताने हा हल्ला यशस्वीरित्या परतवून लावला होता. मात्र सीमेवरील हे युध्द आपल्यादृष्टीने तेवढ्यापुरतेच मर्यादीत होते. परंतु चीनने आपले युध्द केवळ सीमेपुरते मर्यादीत न ठेवता सायबर युध्द खेळण्यासही प्रारंभ केला. चीनची ही मागच्या दरवाजाची खेळी आपल्याकडील कोणाच्याच लक्षात आली नसावी. अन्यथा चीनची ही खेळी परतवून लावण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली गेली असती. किंबहुना आपल्याकडे अशा प्रकारची खेळी परतवून लावण्यासाठी पर्यायी काही उपाययोजना आखल्या असत्या. आपल्याला अशा प्रकारच्या हल्याचीही बातमी आपल्या नव्हे तर अमेरिकेच्या गोटातून मिळते आहे. भविष्यात युद्द हे केवळ सीमेवर लढले जाणार नाही तर डिजिटल युगातील क्षेत्रात लढले जाईल असे म्हटले जाते. एकवेळ सीमेवरील हल्ला परवडला परंतु अशा प्रकारे डिजिटल हल्ले करुन देश खिळखिळा करण्याचे चीनचे मनसुबे धक्कादायक आहेत. अशा प्रकारे भारतीय पायाभूत सुविधांवर हल्ले करुन भारताला कमकुवत करण्याचा डाव खेळला जात होता हे आता उघड होत आहे. त्यासाठी चिनी हँकर अत्यंत अत्याधुनिक अशा यंत्रणांचा वापर करीत आहे. चीनचा प्रामुख्याने आपल्याकडील वीज पुरवठा खंडीत करुन आपल्या पायाभूत सुविधा किती खराब आहेत हे जागतिक गुंतवणूकदारांना दाखवायचे असावे. कारण त्याच वेळी अनेक जागतिक गुंतवणूकदार कोरोनामुळे चीनमधून आपली गुंतवणूक काढून घेऊन भारतात गुंतवणूक करण्याच्या मनस्थिती असल्याचे प्रसिध्द झाल होते. अशा पार्श्वभूमीवर चीनी हॅकर्सने वीज पुरवठा खंडीत करण्याचा कारस्थान रचले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑक्टोबर महिन्यातच चीनी हॅकर्सनी पॉवर ग्रीड, आय.टी. कंपन्या, बँकिंग कंपन्या विविध प्रकारे हल्ले केल्याचे उघड झाले आहे. चीनच्या दिशेने हे सर्व आरोप असल्याने व याची शक्यता फेटाळता येत नसल्याने आपण भविष्यात त्याची कशी खबरदारी घेणार आहोत ते पहावे लागेल. आपल्याला प्रत्येक क्षेत्रात सुरक्षितता घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर चीन जसे अशा प्रकारचे हल्ले करुन आपल्याला खळखिळा करु पहात असले तर आपणही चीनमध्ये सायबर हल्ला करुन त्यांनाही आपण काही कमी नसल्याचे दाखवून दिले पाहिजे. तंत्रज्ञानात आपण काही कमी नाही, हे आपण जगाला दाखवून देण्याची हीच वेळ आहे.
0 Response to "चिनी घातपात "
टिप्पणी पोस्ट करा