-->
अखेर कोडेे उलगडले

अखेर कोडेे उलगडले

संपादकीय पान शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अखेर कोडेे उलगडले
जागतिक पातळीवरील माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक यांची भारतातील कंपनी स्टार इंडिया लि.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एकेकाळी असलेले पीटर मुखर्जी यांच्या हायप्रोफाईल पत्नीने खून केल्याची बाबतमी ज्यावेळी धडकली त्यावेळी सर्वांना आश्‍चर्याचा धक्काच बसला होता. पीटर मुखर्जी यांच्या पत्नी इंद्राणी मुखर्जी या देखील स्टार इंडियामध्येच मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख होत्या. त्यानंतर त्यांनी पीटर यांच्याशी लग्न केले आणि कालांतराने पीटर हे कंपनीतून बाहेर पड्यावर नाईन एक्स ही कंपनी उभयतांनी स्थापन केली व बाजारातून ७०० कोटी रुपये उभे केले होते. अशा या हायप्रोफाईल म्हणून मुंबईच्या कॉर्पोरेट जगतात ओळखल्या गेलेल्या इंद्राणी यांनी आपल्या बहिणीचा शिनाचा खून केल्याची बातमी आली. नंतर उलगडा झाला की, शिना ही त्यांची बहिण नव्हती तर मुलगी होती. एक आई आपल्या पोटच्या पोरीचा जीव घेऊ शकते ही सहनही करता येणारी कल्पना या मातेच्या हातून घडली होती. एकूणच संपूर्ण देश या घटनेनंतर हादरला होता. या खूनात रायगड कनेक्शन होतेे. इंद्राणीने पहिला पती आणि तिच्याकडे काम करणार्‍या चालकाच्या मदतीनं केलेला खून सलग तीन वर्षे दडपून ठेवला. इंद्राणीचं आयुष्य पुरेपूर खोटेपणानं भरलेलं होतं. इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना तसंच चालकानं शिनाचे तुकडे तुकडे केले. इंद्राणी कारमध्येच बसून होती. रायगड जिल्ह्यात हे तुकडे टाकून त्यावर पेट्रोल ओतून ते जाळून टाकण्यात आले. २४ एप्रिल २०१२ रोजी हा खून करण्यात आला होता. शिनाचा खून केल्यानंतर आतापर्यंत ती परदेशात शिकायला आहे, असं इंद्राणी सांगत राहिली. ङ्गेसबुकवर खोटे ङ्गोटो अपलोड करत राहिली. इंद्राणीला अटक केल्यानंतर एक एक गौप्यस्ङ्गोट व्हायला लागला. वयाच्या तिसाव्या वर्षी इंद्राणीचं तिसरं लग्न झालं. पीटर यांनाही पहिल्या पत्नीपासून झालेली २२ आणि १८ वर्षांची दोन मुलं हयात आहेत. पहिल्या दोन पतींपासून आपल्याला तीन अपत्यं आहेत, हे तिसर्‍या पतीला कळलं, तर हा विवाहही टिकणार नाही, असं तिला वाटत असावं. त्यामुळे पहिला पती सिद्धार्थपासून झालेली शिना आणि मिखाईल या दोन्ही मुलांची खरी ओळख पटू नये, याची ती पुरेपूर दक्षता घेत होती. शिना आणि मिखाईल हे आपले बहीण आणि भाऊ असल्याचं इंद्राणी समाजात सांगत राहिली. शिनाच्या हत्येचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. पीटरचा मुलगा राहुल आणि शिनाचे प्रेमसंबंध होते, असं आता सांगितलं जात आहे. इंद्राणी आणि पीटर हे पती-पत्नी असल्यामुळं राहुल आणि शिना हे भाऊ-बहीण लागतात; मात्र हे नातं ङ्गक्त इंद्राणीलाच माहीत होतं. इंद्राणीचा सिद्धार्थ यांच्यासोबतचा विवाह पीटरलाही माहीत नव्हता. संजीवला शिनाची माहिती नव्हती असं म्हटलं तर आपल्यापासून विभक्त होऊन पीटरबरोबर राहणार्‍या इंद्राणीशी संगनमत करून त्यानं शिनाचा खून करण्यात सहभाग का घेतला, हा प्रश्‍न उरतोच. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या पीटर मुखर्जी यांच्याकडे रुपर्ट मर्डोक यांनी भारतातील माध्यमांची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी ब्रॉडकास्ट बिझनेस भारतात बाळसं धरत होता. भारतातील ब्रॉडकास्ट माध्यमांचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा प्रयत्न पीटर करत होते. इंद्राणीशी बहरलेलं प्रकरण मर्डोक यांच्या कानावर गेलं. त्यांनी त्याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. शेवटी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तो चर्चेचा विषय झाला होता. आयएनएक्स नेटवर्क्सचा पाया त्यांनी घातला. इंद्राणी या संस्थेची प्रमुख झाली. ही चॅनेल्स देखील बर्‍यापैकी यशस्वी झाली होती. आता खून प्रकरणामुळं इंद्राणी, संजीव खन्ना आणि पीटर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या सर्व प्रकरणात रायगड पोलिसही संशायाच्या फेर्‍यात आहेत. कदाचित हे प्रकरण दाबण्यासाठी रायगड पोलिसांनीच मदत केली असल्याचा संशय बळावतो आहे. एकूणच या प्रकरणामुळे देशातील कॉर्पोरेट इंडियाचा एक वास्तवातला चेहरा उघड झाला आहे. उच्चभ्रूंच्या वस्तीतील हे धंदे पाहिल्यावर सर्वसामान्य माणसास आश्‍चर्य वाटेल. परंतु माणूस व त्याची प्रतिमा ही केवळ त्याच्या आर्थिक निकषावर ठरत नाही तर तो कसा घडला आहे व त्याच्याकडे कोणता विचार आहे यावरुन ठरते. आपल्याकडे पैसा-सत्ता आली की त्या माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळते. परंतु या दोन बाबी आत्मसाद केल्या म्हणजे माणूस काही परिपूर्ण होत नाही. एक चांगला माणूस म्हणून घडण्यासाठी त्याच्याकडे पैसा असण्याची गरज आहे असे नाही. इंद्राणीसारख्या बायका या केवळ पैसा आणि त्याच्या भोवती फिरणार्‍या सत्तेच्या राजकारणात अग्रेसर असतात. यातून मग हे साध्य करण्यासाठी काही वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. इंद्राणी खून खटला आपल्याला यातून हाच धडा शिकवितो.
-----------------------------------------------------------------------------------------

0 Response to "अखेर कोडेे उलगडले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel