-->
महानगरातील कोरोना

महानगरातील कोरोना

27 May 2020 अग्रलेख महानगरातील कोरोना देशातील कोरोनाचा प्रसार लक्षात घेता सर्वाधिक बाधा ही महानगरातील नागरिकांनाच झाली आहे. देशातील मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद यासह जवळपास दहा मोठ्या शहरात कोरोना जास्त वेगाने फैलावला आहे. महाराष्ट्रातील चार मोठी शहरे या तडाख्यात सापडली आहेत. मुंबईसारखे मोठे महानगर तर सर्वात जास्त त्रस्त आहे. दररोज शेकडो रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे या रुग्णांसाठी बेड कुठून उपलब्ध करणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ज्यांच्या घरात स्वतंत्र खोलीची व्यवस्था आहे त्यांना घरातच क्वॉरंटाईन केले जात आहे. राज्य सरकारने तातडीने सात हजार बेड आता उपलब्ध केले आहेत. परंतु ते देखील कमी पडतील अशी भीती आहे. यातील बी.के.सी.मधील एक हजार बेडचे क्वॉरंटाईन रुग्णालय पंधरा दिवसात उभे केले. त्यामुळे राज्य सरकार हातावर हात ठेऊन बसलेले नाही, मात्र मुंबईतील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचा विषय आहे. राज्यातील एकूण बाधितांच्या संख्येपैकी 60 टक्क्याहून जास्त रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. मुंबईतील दाट वस्ती, त्यातूनच 70 टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहाणारी असल्यामुळे तेथील सार्वजनिक संडास ही सर्वाधिक प्रदुर्भावाची केंद्रे ठरली आहेत. धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी, त्यामुळे कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. सरकारने बेड उपलब्ध करण्य़ासाठी खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आपल्या ताब्यात घेतले आहेत. हे स्वागतार्ह असले तरी अन्य रोग्यांवर उपचार होण्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण मुंबईत कोरोनाव्यतिरिक्त रोगावर उपचार होऊ न शकल्याने काही रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्याशिवाय सरकारने क्वॉरंटाईन करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सभागृह, मोकळे हॉल, स्टेडियम यांचा वापर तात्पुरती रुग्णालये स्थापन करुन सुरु केला आहे. एकूण रुग्णांपैकी 15 टक्के रुग्ण हे गंभीर असतात त्यामुळे त्यांच्यासाठी सुसज्ज रुग्णालय लागते. मुंबईत 76 दिवासंपूर्वी पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता मुबंईतील आता मृतांची संख्या एक हजारांवर गेली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 50 हजारांवर गेली आहे. मार्चमध्ये मुंबईत ही साथ सुरु झाल्यावर मृतांची संख्या सात होती. आता मात्र त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. 40 ते 60 वयोगटातील कोरोना रुग्णांपैकी मृतांचा आकडा जेमतेम 4 टक्के आहे. तर 40 वयाखालील व्यक्तींचा मृत्यू हा एकच टक्के आहे. साठीच्या पुढील व्यक्तींना कोरोना झालेल्यांपैकी 47 टक्के जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यापैकी 32 टक्के जणांना डायबिटीस किंवा बी.पी.चा त्रास होता. मुंबईसारख्या महानगरात हे दोन्ही रोगांचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे जास्त धोका आहे. एवढे सर्व असले तरीही आपल्याकडे अजूनही साथ नियंत्रणात आहे, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात अशीच मोठ्या प्रमाणात साथ फैलावली आहे. तेथे क्वॉरंटाईन केलेल्या रुग्णांना चांगली सुविधा देत नसल्याने काही रुग्णांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावेळी अहमदाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. अहमदाबादसारख्या शहरात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे पूर्णपणे दिवाळे वाजले आहे. गुजरात मॉडेल म्हणून विकासाचा दिंडोऱ्या पिटल्या जाणाऱ्या शहरातील ही स्थीती आहे, तर गुजरातच्या ग्रामीण भागात काय दुरावस्था असेल त्याचा विचारच करावयास नको. त्यातुलनेत मुंबईतील स्थीती अजूनही समाधानकारक व नियंत्रणात आहे, असे म्हणता येईल. न्यूयॉर्कसारख्या अमेरिकेतील महानगरात कोरोनाची साथ झपाट्याने फैलावली आहे. दर दहा लाखामागे तिकडे पंधरा हजार कोरोनाग्रस्त आहेत, तर मुंबईत दर दहा लाखामागे दोन हजार कोरोनाग्रस्त आहेत. अर्थात आपल्याकडे कोरोनाची चाचणी संशय आलेल्या व्यक्तींचीच केली जाते. त्यामुळे ही संख्या कमी दिसत असावी. अनेकदा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, त्यापैकी अनेकांना कोरोना झाला असावा व तो बराही झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अनेक लोक आपल्याकडे आढळतील. येत्या चार आठवड्यात मुंबईत सुमारे दोन लाख कोरोनाग्रस्त रुग्ण आढळतील असा अंदाज आहे. तसे झाल्यास मोठी यंत्रणा कामाला लागणार आहे. क्वोविड योध्दा ही संकल्पना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मांडली होती व त्यासाठी वैद्यकीय सेवेशी, लष्करी सेवेशी निगडीत लोकांनी पुढे यावे असे आवाहन केले होते. त्याला सुमारे वीस हजार लोकांनी प्रतिसाद दिला होता. भविष्यात त्यांची गरज सरकारला लागणार आहे. आज मुंबईत सरकारी दहा हजार, खासगी 25 हजार व अन्य क्लिनिक्सचे 12 हजार असे बेड आहेत. मुंबईची लोकंसख्या पाहता ही संख्या काही समाधानकारक नाही. आपल्याला कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य सेवेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आता आली आहे. आज मुंबईत अत्याधुनिक रुग्ण सेवा आहे, परंतु ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. सध्या कोरोनासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाल्यास पंधरा दिवसांच्या क्वॉरंटाईनसाठी आठ लाख रुपये आकारले जात आहेत, ही चाललेली लूट अजूनही राज्य सरकार थोपवू शकलेली नाही. त्यामुळे खासगी रुग्णालये जरुर असावीत, परंतु राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुसज्ज करण्याचीही आवश्यकता आहे. शहरातील ही स्थिती आहे तर ग्रामीण भागातील दुरावस्था तर पहायलाच नको. कोरोनानंतर जे अनेक विषय सरकारच्या सुधारणा यादीत असतील त्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुसज्ज करणे हे एक महत्वाचे कलम असले पाहिजे.

Related Posts

0 Response to "महानगरातील कोरोना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel