
बस्स करा राजकारण...
28 May 2020
अग्रलेख
बस्स करा राजकारण...
कोरोनाच्या भयाण साथीच्या काळात सध्या राज्यासह संपूर्ण देश संकटात असताना राजकारण करुन सरकार पाडण्याची तयारी करणाऱ्या भाजपा नेत्यांना आता बस्स करा राजकारण असे म्हणण्याची पाळी आली आहे. महविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेत्यांना प्रत्येक दिवस हा झोपेविना जात आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-कॉँग्रेस अशा भिन्न विचारांचे सरकार स्थापनच होऊ शकत नाही असा ठाम विश्वास भाजपाच्या नेत्यांना होता. मात्र अखेर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलेच. हे सरकार लवकरच पडेल व आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा विश्वास देवेंद्र फडणवीसांना होता. परंतु सहा महिने होत आले तरी सरकार पडण्याची काही चिन्हे दिसेनात, त्यामुळे शेवटी उध्दव ठाकरेंच्या आमदारकीतच खोडा घालण्याचे प्रकार राज्यपालांमार्फत करण्यात आले. परंतु ती देखील गणिते काही जुळेनात, शेवटी ठाकरे आमदार झालेच. त्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. त्यातच गेले दोन महिने कोरोनाने उग्र स्वरुप धारण केल्याने राज्य सरकार पूर्ण ताकदीनिशी यात उतरले. परंतु सध्याच्या कठीण काळात जनतेचे हित लक्षात घेऊन राजकारण न करण्याचे भानही या भाजपाच्या नेत्यांना राहिले नाही. गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा भाजपाच्या नेत्यांना सत्ताग्रहण करण्याची स्वप्ने जोरात पडू लागली व त्यांच्या राजभवनाच्या फेऱ्या वाढू लागल्या. महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर होत असल्याचे भाजपाशी इमान राखून असलेल्या माध्यमांनाही वाटू लागले व त्यादृष्टीने टी.व्ही. चॅनल्सवर बातम्या फिरु लागल्या. सध्याचे सरकार कोरोनाची लढाई लढण्यात अयशस्वी ठरले आहे, असे सांगत भाजपाची निदर्शने झाली. याला जनतेतून अल्प प्रितिसाद मिळाला, उलट भाजपाची सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात सरकारला मदत करण्याएवजी विरोधात भूमिका घेतल्याबद्दल सोशल मिडियात शी...थू पण झाली. निदर्शनाचा हा प्रयोग फसल्यावरही भाजपाच्या अस्वस्थ नेत्यांना सत्ता पुन्हा खूणवू लागली, त्यासाठी त्यांच्या राज्यपालांच्या भेटी सुरु झाल्या. सध्याचे राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्याच्या जोडीला भाजपाचे राजकीय नेतेही आहेत. त्यांनी हे पद ग्रहण केल्यापासून, आपल्याला निपक्षपणे वागले पाहिजे व घटनेचा आदर केला पाहिजे याचा विसर पडलेला दिसतो. राजभवनात आल्यापासून त्यांनी आपले राजकीय जोडे राजभवनाच्या दारात काही काढून ठेवलेले नाहीत. कदाचित त्यांना गृहमंत्र्यांनी तसे सांगितलेही असण्याचा दाट संशय आहे. त्यांना त्यांच्या घटनादत्त कामकाजाची जाणीव करुन देण्यासाठीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार राजभवनावर त्यांच्या भेटीस गेले असावेत. परंतु पवारसाहेब सांगतात म्हणजे ते शंभर टक्के खरे नव्हे अशी ठाम समजूत पत्रकारांची झाली आहे. त्यामुळे पवारांची राजभवन भेट ही काही नवीन समिकरणे करण्यासाठीच आहेत असे अनेकांचे मत पडले. त्यातच पवारांनी संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंची भेट घेऊन दीड तास चर्चा केली. अर्थातच यावेळी बाळासाहेबांच्या आठवणी व कोरोनाचा सामना कसा करावयाचा याविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पंरतु दोन महत्वाच्या राजकीय व्यक्ती भेटतात त्यावेळी राजकारणविषयी प्राधान्यानेच चर्चा होते हे नेहमीचे ठरलेले असते. त्यानुसार पवार-ठाकरे यांच्यात कोणती चर्चा झाली ते काळाच्या ओघात उघड होईलच. परंतु सध्याचे सरकार पाडून काही नवीन समिकरणे जुळविण्याच्या विचारात शरद पवार सध्या शंभर टक्के नाहीत कारण पवार हे जुणे व जाणते नेते आहेत, त्यांच्यात राजकीय परिपक्वता आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात भाजपासारखे अतिशहाणपणाचे राजकारण पवार करुच शकत नाहीत. पवारांच्या मनात काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही हे देखील जेवढे खरे तेवढेच पवार सध्या सरकार पाडण्याच्या मनस्थितीत आहेत हे देखील काही खरे नाही. पवार-कोश्यारी-ठाकरे या भेटीचा अर्थ चुकीचा लावला जात आहे हे मात्र निश्चित. सध्या काही तरी राजकीय होतेय याचा अपरिपक्व वेध घेत भाजपाचे नेते नारायण राणे यांनीही राजभवन गाठले व नंतर आल्यावर पत्रकारांशी बोलताना सध्याचे सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राणेंनी सध्याच्या काळात अनावश्यक बडबड करुन आपल्या पायी धोंडा मारुन घेतलाच. कारण राणेंच्या या वक्तव्यानंतर लगेचच भाजपाचे नेते मुनगुंटीवार यांनी हे राणेंचे वैयक्तीक मत असल्याचे सांगत राणेंना घरचा आहेर दिला. राणेंनी आता भाजपात सध्या गप्प बसावे, त्यांना त्यासाठीच दिल्लीत खासदार केले आहे. भाजपा आपल्याला मुख्यमंत्री करेल असे त्यांनी स्वप्न देखील पाहू नये. तिकडे देवेंद्ररावांनी पत्रकारपरिषद घेऊन केंद्राने राज्याला 27 हजार कोटींची मदत केल्याचे सांगितले. मात्र त्यांनी ही मदत नेमकी कोणती आहे ते काही सांगितले नाही. फडणवीस हे केंद्राचे प्रसिध्दी प्रमुख आहेत की राज्याचे नेते तेच यावरुन समजेनासे झाले आहे. त्यांचे महनिय नेते नरेंद्र मोदीसाहेबांनी ज्याप्रकारे 20 लाख कोटी रुपयांची हातचलाखी करुन पॅकेज जाहीर केले आहे, त्याच धर्तीवर फडणवीसांचे हे 27 हजार कोटी असतील असेच दिसते. सध्या भाजपाची मंडळी मोठे माठे आकडे जनतेच्या तोंडावर फेकण्यात निष्णात झाले आहेत. प्रत्यक्षात पाहिल्यास लोकांच्या हातात काहीच पडत नाही हे मोठे दुर्दैव आहे. सध्याचा काळ हा राज्यासाठी कसोटीचा काळ आहे. कोरोनाला संपविण्याची जबाबदारी ही केवळ सत्ताधाऱ्यांची नाही तर विरोधकांचीही आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा लढा द्यावयाचा आहे. सध्या राजकारण करण्याची वेळ निश्चितच नाही, भाजपाच्या नेत्यांना हेच सांगावेसे वाटते.
0 Response to "बस्स करा राजकारण..."
टिप्पणी पोस्ट करा