-->
बुरखा फाडला

बुरखा फाडला

28 May 2020अग्रलेख बुरखा फाडला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत केंद्र सरकारने 27 हजार कोटी रुपये राज्याला दिल्याचे मोठ्या दिमाखात सांगितले होते. मात्र चोवीस तासाच्या आत त्यांचा बुरखा महाविकास आघाडीच्या तीन मंत्र्यांनी पत्रकारपरिषद घेऊन टराटरा फाडला. भाजपा हा केवळ गप्पा करतो, खोटे आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकून कशी दिशाभूल करतो हे जनतेच्या लक्षात यानिमित्ताने पुन्हा एकदा पुढे आले. संसदीय कामकाजमंत्री अनिल परब, जलसंपदामंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेली आकडेवारी व वास्तव काय आहे हे सर्व खुलासेवार सांगितले. हे सर्व पाहता भाजपाचे नेते हे राज्याच्या हितासाठी खरोखरीच काम करतात की काय याची शंका यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जनतेला दिले, व ते किती बनावट आहे हे सिध्द झाले. त्याधर्तीवर फडणवीसांनी सादर केलेले हे आकडे होते. केंद्र दरवर्षी विविध योजनेअंतर्गत राज्यांना पैसा देते. अर्थात हे पैसे देणे म्हणजे काही केंद्र सरकार राज्यांवर काही उपकार करीत नाहीत. सरकारचे ते कामच आहे. दरवर्षी दिले जाणारे हे पैसे काही कोरोनासाठीचे नाहीत. परंतु विविध योजनेचे दरवर्षी दिले जाणारे आकडे हे फडणवीसांनी दाखविले व आपला आकडा फुगविला. त्याचबरोबर राज्याने जादा कर्ज काढण्याचा फुकाचा सल्ला दिला. म्हणजे राज्य कर्जाच्या गर्तेत गेले तरी चालेल ही त्यांची मानसिकता. खरे तर गेल्या पाच वर्षात राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेऊन या माजी मुख्यमंत्र्यांनी राज्याला कर्जाच्या गर्तेत टाकले आहे. आता आणखीन कर्ज काढण्याचा ते सल्ला देत आहेत. केंद्राकडून राज्याच्या हक्काचे सुमारे 20 हजार कोटी रुपये यायचे आहेत. त्यावर फडणवीसांसह भाजपाच्या सर्व नेत्यांनी मौन पाळले आहे. विरोधी पक्षांची सरकार असलेल्या राज्यात मुद्दामहून त्यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांची मदत थकवते आहे. मात्र हे पैसे मिळवून देण्यासाठी फडणवीस काही बोलत नाहीत. फडणवीस केंद्राची जर वकिली करतात तर त्यांनी आपले वजन वापरुन हे पैसे राज्याला मिळवून द्यावेत. त्या पैशाचा वापर कोरोना रुग्णांसाठीच होऊ शकतो, हे ते जाणूनबूजून विसरत आहेत. केंद्राने मुंबईतील आर्थिक केंद्र गुजरातमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला व देशाची आर्थिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या मुंबईवर घाला घातला. त्याविषयी फडणवीसांसह भाजपाचे सर्वच नेते मौन बाळगत आहेत. त्यांचे यावरुन महाराष्ट्र व्देषच प्रगट होते. त्यामुळे फडणवीसांनी राज्यातील जनता मूर्ख नाही हे लक्षात घ्यावे. कितीही खोटी आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकली तरी ती खरी किंवा खोटी हे समजण्याएवढी राज्यातील जनता दुधखुळी नाही. कोरोनाच्या प्रश्नावरुन राज्य सरकारची निष्कीयता कशी आहे हे सांगताना महाराष्ट्रापेक्षा भयाण स्थिती असलेल्या गुजरातकडे भाजपाने लक्ष द्यावे. तेथील परिस्थितीवर अहमदाबाद उच्च न्यायालयानेच ताशेरे ओढले आहेत. फडणवीसांची आकडेवारी कशी दिशाभूल करणारी आहे ते राज्यातील तीन पक्षांच्या मंत्र्यांनी एकत्रित येऊन सांगितली हे बरेच झाले. कारण हे सरकार पडणार अशा सतत उकळ्या त्यांना फुटत असतात. त्यात राहूल गांधी यांनी राज्यात कॉँग्रेसचा पाठिंबा आहे मात्र निर्णय प्रक्रियेत आम्ही नाही, असे विधान केल्याने आघाडीत बिघाडी असल्याचे भाजपाधार्जिण्या पत्रकारांनी बातम्या लावल्या. मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी राहूल गांधींशी फोनवर संभाषण करुन सुसंवाद साधल्याने सध्यातरी सरकारला कोणताही धोका नाही. खरे तर हे विधान करताना राहूल गांधी आमचा या सरकारला पाठिंबा आहे असेच म्हणाले होते, परंतु त्यांचे हे अगोदरचे विधान फारसे चर्चेत न येता पुढील वाक्य गाजवले गेले. राज्यातील सरकार ते तीन पक्षांचे आहे व बहुतांशी निर्णय हे तिन्ही पक्षांना विचारात घेऊन घेतले जात आहेत, असे सध्या तरी चित्र आहे. त्याचा समतोल उध्दव ठाकरे चांगल्या प्रकारे साधत आहेत. मात्र कॉँग्रेसच असूनही गलितगात्र झालेल्या अवस्थेत आहे. त्यांचे मंत्री म्हणावे तसे जोमाने कामाला लागलेले नाहीत, हे दुर्दैव आहे. त्यापेक्षा शिवसेना व राष्ट्रवादीचे मंत्री जोशात कामाला लागले आहेत. आज कॉँग्रेसकडे राज्यात धडाडीचे नेतृत्व नाही. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सज्जन आहेत, प्रामाणिक आहेत परंतु पक्षाची संघटना वाढविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नाही. 2019 च्या निवडणुकीत जेमतेम 16 टक्के मते मिळवून कॉँग्रेसचे 44 आमदार निवडून आले. निकालापूर्वी तर कॉँग्रेस 20 जागांवरच राहिले असे चित्र होते. परंतु त्यांनी 44ची मर्यादा ओलांडली हेच मोठे आहे. तसेच शरद पवारांनी जुळवून आलेल्या महाविकास आघाडीच्या गणितात कॉँग्रेसचे चांगभले झाले आहे. परंतु या चालून आलेल्या संधीचा फायदा घेऊन पुन्हा पक्षाचा गेलेला सुवर्णकाळ मिळवून देण्याची धमक अजूनही राज्याच्या नेतृत्वात नाही. त्यातच पक्षात मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेले काही नेते विरोधात बोलतच असतात. मिलिंद देवरा, संजय निरुपम या लोकसभेच्या पडेल उमेदवारांना पक्षाचे हित कशात आहे तेच समजत नाही. त्यामुळे ते सतत सरकार विरोधी बोलून भाजपाचेच हात बळकट करीत असतात. फडणवीसांची आक्रमक खोटे बोलण्याची चाल पाहता, ते आगामी काळात पुन्हा सरकार विरोधी गरळ ओकणार आहेत. त्याविरोधात महाविकास आघाडीने मोहीम उघडण्याची आवश्यकता आहे.

Related Posts

0 Response to "बुरखा फाडला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel