
भाजपला चपराक
26 May 2020 अग्रलेख
भाजपला चपराक
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी साधलेल्या संवादात विरोधी पक्ष भाजपाला निशाणा साधत चांगलीच चपराक लगावली आहे. मुख्यमंत्री कोरोनासंबंधी वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत असतात. यावेळचे त्यांचे भाषण हे पूर्णपणे राजकीय संदेश देणारे होते. या भाषणातून सध्याच्या कठीण प्रसंगी सरकारचे मत, जनतेकडून असलेल्या अपेक्षा व जनतेत विरोधकांकडून निर्माण होणारे मनभेद दूर करण्यासाठी फार उपयोग होत असतो. तसे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही जनतेशी संवाद साधत असतात, परंतु त्यांचा जनतेशी संवाद नसतो तर ते एक एकतर्फी एकावयाचे किर्तनच असते. आपल्या पंतप्रधानांना सर्व काही माहिती आहे व त्याचा लाभ ते जनतेला देत असतात असा भास त्यांच्या किर्तनातून होत असतो. त्याउलट मुख्यमंत्री ठाकरे हे कोणावर मत लादत आहेत किंवा मला जास्त माहिती आहे, तुम्ही माझे एका असा सूर नसतो. उलट लोकांना समजवत सांगत खऱ्या अर्थाने साधलेला तो संवाद जाणवतो. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे लॉकडाऊन कधी संपणार याचे संकेत दिले आहेत. ज्या प्रकारे टप्प्याटपप्याने लॉकडाऊन सुरु झाले त्या प्रकारे टप्प्याटप्प्याने आता लॉकडाऊन उघडले जाणार आहे, हे त्यांचे सुतोवाच फार महत्वाचे आहे. फारफार तर आता लॉकडाऊन हा शब्द तुम्ही वापरु नकात असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पुढील काळात लॉकडाऊन सुरुच राहील मात्र सवलतींचा लाभ घेऊन नियम तोडल्यास मात्र पुन्हा नियम कडक केले जाणार आहेत. हे सर्व सांगत असताना मुख्यमंत्र्यांनी भाजपाला चांगलीच चपराक लगावली आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे राज्यातील नेते फडणवीस व त्यांच्या साथीदारांनी राज्य सरकार कोरोना हाताळण्यास अयशस्वी ठरले आहे, असा दावा करीत काळे झेंडे दाखवित आंगणात आंदोलन केले होते. अर्थात त्याला जनतेतून फारसा पाठिंबा मिळाला नाही, उलट सोशल मिडियावर बरीच टीका झाली होती. मुख्यमंत्र्यांनी भाजपाकडे दुर्लक्ष न करता चांगलेच उत्तर दिले हे उत्तमच झाले. केंद्राने राज्याला येणारा हक्काचा परतावा थकवलेला आहे, आम्ही त्याविषयी बोलतो का? पंतप्रधान निधीतून किती मदत केली? परप्रांतिय मजूरांची त्यांच्या गावी जाण्यासाठी आम्ही तिकिटे दिली, थोडीथोडकी नाही तर 75 कोटी रुपये त्यासाठी खर्च केले, आम्ही त्याविषयी काही बोललो का? आम्ही गप्प बसतोय, सध्या कोणतेही राजकारण करीत नाही. अशा स्थितीत विरोधकांनीही राजकारण थांबवावे, असे बोलून त्यांनी भाजपाचे खरे रुप उघडे केले. त्याचबरोबर पॅकेज जाहीर करा अशी मागणी भाजपाने केली होती, त्याचाही त्यांनी सभ्य भाषेत समाचार घेतला. गेले दोन महिने दररोज सुमारे सात लाख मजुरांना राज्यात तीन वेळचे मोफत जेवण दिले जात होते. त्याशिवाय शिवभोजन थाळी पाच रुपयात सुमारे सव्वा लाख लोकांना दिली जात आहे. गावी जाऊ इच्छिणाऱ्या परराज्यातील मजुरांना रेल्वेची तिकिटे किंवा एस.टी.चा प्रवास मोफत करुन दिला, केंद्राने अजूनही त्याचा एक पैसा दिलेला नाही. पण आम्ही खर्च केले, हे पॅकेज नाही का? राज्यातील 100 टक्के जनतेला महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना सुरु करणे हे काही पॅकेज नाही का? असा सवाल त्यांनी विरोधक भाजपाला केला. आम्ही गाजावाजा न करता किंवा जाहीरातबाजी न करता कामे केली आहेत, असे सणसणीत उत्तर देऊन ठाकरेंनी सिक्सरच मारली आहे. मुख्यमंत्र्याचे हे भाषण खरे तर पूर्णपणे राजकीयच होते. त्यांना लोकांना कोरोनाविषयी वस्तुस्थिती सांगत सत्तेसाठी अधीर झालेल्या विरोधकांनाही पालथे पाडायचे होते. आजच्या भाषणाने ते साध्य झाले आहे, असे म्हणता येईल. त्याचबरोबर त्यांनी ईदच्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांना देताना आम्ही सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जात आहोत हे देखील दाखवले. शिवसेनेचे हिंदुत्व हे कसे आहे? ते एकाच धार्मियांची सत्ता स्थापणारे नाही तर सर्व धर्मीयांना सोबत घेऊन जाणारे आहे हेच त्यांना दाखवायचे होते. हा देश केवळ हिंदूंचा नाही तर सर्व धर्मियांचा आहे, असा संदेश त्यांनी भाजपाला यातून दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या भाषणात कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलाविलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीचाही आवर्जुन उल्लेख केला. यातून ठाकरे यांनी आपली भविष्यातील दिशा पक्की केली. त्यांच्या या बैठकीतील उपस्थितीमुळे शिवसेना आता पुन्हा भाजपा आघाडीत जाणार नाही हे नक्की झाले आहे. आता बहुदा शिवसेना कॉँग्रेस प्रणित देशव्यापी यु.पी.ए.चा घटक पक्ष म्हणून लवकरच सामिल झाल्यास काही आश्चर्य वाटणार नाही. त्यादृष्टीने पाहता मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण हे भाजपाला राजकीय चपराक देणारे तसेच आपली व राज्याची भविष्यातील दिशा सांगणारेच होते. उध्दव ठाकरे हे विचारांती शांतपणे निर्णय घेणारे नेते आहेत हे त्यांनी गेल्या सहा महिन्यात दाखवून दिले आहे. त्यांना भिन्न विचारांच्या पक्षांना सोबत घेऊन जाणे हा केवळ प्रयोग नाही, तर सहा महिन्यात महाविकास आघाडी मजबूत झाली आहे, असेच दिसते. सुरुवातीला शिवसेनेबाबत सावध असलेली कॉँग्रेसही आता उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूष झालेली दिसते. कॉँग्रेसच्या नेतृत्वानेही शिवसेनेशी मैत्री पक्की करण्याचे ठरविलेले दिसते. आमदार झाल्यावर उध्दव ठाकरे यांनी आपली दिशाही निश्चित केली आहे असेच हे भाषण सांगते. भाजपाचा पुन्हा सत्तेत येण्याचा डाव सध्या तरी उधळलेला दिसतो.
0 Response to "भाजपला चपराक"
टिप्पणी पोस्ट करा