
डिजिटल क्रांतीच्या दिशेने
25 एप्रिल २०२०
अग्रलेख
डिजिटल क्रांतीच्या दिशेने
देशातील सर्वात मोठा खासगी उद्योग समूह असलेल्या रिलायन्सची टेलिकॉम उद्योगातील कंपनी जियो प्लॅटफॉर्ममध्ये सोशल मिडिया क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी फेसबुकने भांडवली वाटा खरेदी करुन एक मोठे पाऊल उचलले आहे. जिओमधील सुमारे दहा टक्के भांडवल खरेदी करण्यासाठी फेसबुकने तब्बल 44 हजार कोटी रुपये मोजले आहेत. जगात व भारतात कोरोनाने सर्व उद्योगधंदे व अर्थकारण ठप्प केलेले असताना झालेला हा एक महत्वाचा उभय कंपन्यातील सहकार्य करार ठरावा. या कराराव्दारे भारताच्या डिजिटल क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. कोरोनानंतर जग व भारतात अनेक बदल होऊ घातले आहेत, त्या होऊ घातलेल्या नव्या काळातील क्रांतीच्या दृष्टीकोनातून पडलेले हे एक महत्वाचे पाऊल ठरावे. रिलायन्सने जियो ब्रँडच्या नावाखाली टेलिकॉम क्षेत्रात आक्रमकरित्या प्रवेश केला होता. सुरुवातीला लोकांना मोफत कॉल्स तसेच डाटा देत नंतर काळाच्या ओघात त्यांच्याकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. लवकरच जियो ही देशातील टेलिकॉम उद्योगातील सर्वात मोठी कंपनी ठरली. देशातील टेलिकॉम उद्योग संकटात असताना व बहुतांश कंपन्यांना तोटा झालेला असताना जिओ मात्र नफ्यात आहे. जिओने आक्रमकेतेने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला व बहुराष्ट्रीय कंपन्यांसह देशी कंपन्याना शह देत आपले स्थान टेलिकॉम उद्योगात बळकट केले. जिओचा हा प्रवास खरोखरीच उल्लेखनीयच म्हटला पाहिजे. सध्या जिओकडे 3.88 कोटी ग्राहक आहेत. तर फेसबुकचे 2.41 कोटी व व्हॉटस्अपचे 4 कोटी वापरकर्ते आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांची एकत्रित सध्याची ग्राहकसंख्या पाहिल्यास दहा कोटींच्यावर जाते. त्यामुळे त्यांच्याकडे एक मोठा ग्राहकवर्ग आत्ताच तयार झाला आहे. जिओ व फेसबुक यांच्यात झालेला हा करार दोन्ही कंपन्यांसाठी मोठा लाभदायक ठरणार आहे. रिलायन्सला या सहकार्य कारारामुळे त्यांच्यावर सध्या असलेला तीन लाख कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा कमी करण्यास हातभार लागणार आहे. रिलायन्सने आपल्यावरील हा अवाढव्य कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी विविध उद्योगातील भांडवल विक्रीचा सपाटा लावला आहे. नुकतेच त्यांनी पेट्रोलियम क्षेत्रातील जगातील आघाडीची सौदीची कंपनी अँमरोकोला आपले 25 टक्के भांडवल विकण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी फेसबुकला टेलिकॉम कंपनीतील भांडवली वाटा विकला आहे. तसेच टेलिकॉम टॉवर्सच्या कंपनीतील भांडवली वाटा काही प्रमाणात विकण्याची त्यांनी तयारी केली आहे. कंपनीच्या गेल्या सर्वसाधारण सभेत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी मार्च 2021 पर्यंत कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी ज्या प्रकारे भांडवली वाटा जगातील नामवंत कंपन्यांना विकण्यास सुरुवात केली आहे ते पाहता रिलायन्स ठरविल्यानुसार 2021 पर्यंत कर्जमुक्त होऊ शकेल असे दिसते. जिओशी सहकार्य करार करण्यात फेसबुकला विशेष उत्सुकता होती याचे कारण म्हणजे आजवर त्यांनी भारतीय टेलिकॉम उद्योगात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांना फारसे यश मिळाले नव्हते. भारतात काही ठिकाणी मोफत इंटरनेट देऊन आपला प्रसार करण्याचाही त्यांचा प्रयत्न काही फारसा यशस्वी झाला नव्हता. आता या सहकार्य कारारामुळे त्यांना जिओचे एक मोठे व्यासपीठ उद्योगधंद्यासाठी उपलब्ध झाले आहे. यातून त्यांना फेसबुक तसेच व्हॉटस्अपचा विस्तार करता येईलच शिवाय नवनीवन उद्योगधंदे सुरु करता येतील. जिओकडे असलेली फ्रिक्वेसी त्यांना वापरता येईल. अन्यथा त्याच्या खरेदीसाठी त्यांना करोडो रुपये खर्च करावे लागले असते, तसेच सर्व यंत्रणा उभारणीसाठी वेळही गेला असता. त्यादृष्टीने पाहता फेसबुकचा यात मोठा फायदा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या दोन कंपन्या एकत्रितरित्या मोठे व्यवसायाचे जाळे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारणार आहे. यात रिलायन्सच्या रिटेल उद्योगाला डिजिटलच्या मार्फत जोड देण्याची मोठी योजना आहे. यानुसार देशातील तीन कोटी किराणा दुकानदारांना रिलायन्स आपल्या विक्री व्यवसायात सहभागी करुन घेणार आहे. सध्या असलेल्या या छोट्या किराणा व्यापाऱ्यांना आपल्यात सहभागी करुन एक मोठे विक्रीचे जाळे रिलायन्सला उभारावयाचे आहे. तसेच अनेक लघुउद्योजकांनाही यात सहभागी करण्याची रिलायन्सची योजना आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या वस्तू घरपोच काही वेळातच उपलब्ध होतील. तसेच सध्या असलेला किराणा दुकानदार रिलायन्सच्या कह्यात येईल. छोट्या किराणा दुकानदारांकडे मॉलमुळे जो ग्राहक गेला होता तो त्यांना पुन्हा मिळविता येईल. रिलायन्स मार्ट या योजनेखाली ही योजना येऊ घातली आहे. जगातील आघाडीच्या रिटेल उद्योगातील कंपन्या फ्लिपकार्ट, अलिबाबा, अमेझॉन यांच्या धर्तीवर रिलायन्सला आपली देशात सर्वात मोठी चेन उघडून त्यांच्याशी स्पर्धा करावयाची आहे. रिलायन्सने केवळ मोबाईल फोनच नव्हे तर डी.टी.एच. पासून सर्व डिजिटल क्षेत्रातील करमणुकीचे व्यासपीठ लोकांना उपलब्ध करुन दिले आहे. आता त्यांना लोकांनी घरीच बसून पाहिजे तो चित्रपट आपल्या मागणीनुसार पाहाण्याचीही सोय उपलब्ध करुन देण्याचे ठरविले आहे. आगामी काळात डिजिटलायझेशनमुळे देशाचे चित्रच पालटण्याच्या स्थितीत आले आहे. रिलायन्स यात अग्रभागी असेल हे आता फेसबुकशी झालेल्या कारारावरुन स्पष्ट दिसले आहे. रिलायन्स व फेसबुकचे हे संयुक्त प्रकल्प यशस्वी होतीलही. मात्र सरकारने कोणत्याही कंपनीची मक्तेदारी एकाच क्षेत्रात होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा ग्राहकहित धोक्यात येऊ शकते. केवळ एकाच कंपनीला मुक्तव्दार असणे हे नेहमीच धोक्याचे ठरते. त्यामुळे रिलायन्सप्रणित डिजिटल क्रांतीचे स्वागत करीत असताना त्यातील धोकेही समजावून घेतले पाहिजेत.
0 Response to "डिजिटल क्रांतीच्या दिशेने"
टिप्पणी पोस्ट करा