-->
पितामह

पितामह

शनिवार दि. 18 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पितामह
देशाचे माजी पंतप्रधान, संसदपटू, कवी मनाचा माणूस असूनही अनेक कठोर निर्णय घेणारे अटलबिहारी वाजपेयी आज आपल्यात नाहीत. गेले दोन महिने ते रुग्णालयात दाखल होते. मात्र त्यांची अखेर प्राणज्योत मालवली. एका शिक्षकाचा मुलगा ते देशाचे पंतप्रधानपद हा त्यांचा प्रवास अर्थातच कोणालाही प्रेरमादायी वाटेल असाच आहे. जवळपास गेली दहा वर्षे ते सक्रिय राजकारणात नाहीत. मात्र या काळात अशी एकही घटना झाली नाही की, ज्याच्याशी त्यांची तुलना झाली नाही. राजकारणातली कोणतीही बरी-वाईट घटना असो, वाजपेयी असते तर असे झाले नसते किंवा वाजपेयींनी असे केले असते, अशी चर्चा ही होणारच. यातून त्यांचे पितामहत्व वेळोवेळी जाणवते. त्यांची ग्वाल्हेरी ओघवती शुध्द हिंदी भाषा आजही कानात गुंजते आहे. 1924 साली जन्मलेल्या वाजपेयींनी स्वातंत्र्यापूर्वीचे व स्वातंत्र्यानंतरचे अनेक टप्पे पाहिले, विरोधात राहून अनेक वर्षे काम केले, सत्तेचा सर्वोेच्च मुकुटही त्यांना मिळाला, मात्र वाजपेयीजी काही बदललेले कुणालाच दिसले नाहीत. अहंकार कधी त्यांना शिवला नाही. उलट त्यांच्यातील कोमल हृदयाचा कवी नेहमीच अनेकांना त्यांच्या जवळ नेई, त्यातूनच त्यांच्याभोवती विरोधी पक्षातील लोकही उभे राहिले. त्यांचे 13 दिवसांचे सरकार कोसळले तरी त्यांनी हार मानली नाही. दोन वर्षातच त्यांना पुन्हा पंतप्रधानपद मिळाले. भाजपाच्या त्यावेळच्या या सरकारला पाठिंबा द्यायला त्यावेळी अनेक त्यांचे विरोधक पुढे आले. वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत हे माहिती असूनही अनेकांनी त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. याचे कारण होते त्यांचा मवाळ चेहरा. वाजयेपी संघाचे असले तरीही हिंदुत्ववाद्यांच्या आहारी जाऊन अतिरेकी निर्णय ते घेणार नाहीत, याचा विश्‍वासही विरोधकांना वाटत होता. बाबरी मशिद पाडण्यात आली त्यावेळी देखील वाजपेयी त्या घटनेतील सहभागी नव्हते, उलट त्यांनी या घटनेबाबत नेहमीच निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी भाजपातील आडवाणींचा चेहरा हा आक्रमक होता, हिंदुत्ववाद्यांना पाठिंबा देण्यात ते आघाडीवर होते. आडवाणींच्या या आक्रमक चेहर्‍यामुळे त्यांना सत्तेच्या सर्वोच्च ठिकाणी जाता आले नाही. त्याउलट वाजपेयींनी हा मुकुट सहजरित्या मिळविला व पेलला. आपल्या साडेचार वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी घटनेच्या चौकटीतच राहून व आघाडीच्या राजकारणाचा धर्म मान्य करीत पंतप्रधानपद सांभाळले व त्या पदाचा योग्य तो मान राखला. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असताना वाजपेयींनीच त्यांना गुजरात दंगलीच्या वेळी राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. वाजपेयी जरी हे संघाचा मवाळ चेहरा म्हणून वावरत असले तरीही त्यांनी अनेक निर्णय हे कणखरपणाने घेतले. त्यातील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे, पोखरणची अणूचाचणी. त्याचा हा निर्णय म्हणजे, जगाला हादरा देणारा व भारताच्या आजवरच्या शांततामय अणूचाचणीच्या धोरणाला सुरुंग लावणारे होता. त्यापाठोपाठ पाकिस्तानेही अणू चाचण्या केल्या. त्यामुळे भारतीय महाव्दीपात अणू युध्दाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. परंतु वाजपेयींनी कधीच कोणत्या गोष्टीचा अतिरेक केला नाही. या नंतर अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीयन महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रात निर्बंध लादले खरे परंतु भारताचा अणू कार्यक्रम हा शांततेसाठीच असल्याचे समजल्यावर काळाच्या ओघात या बंदी उठल्याही. मात्र देशाची अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण असल्याने आपल्याला या बंदीचा फारसा फरकही पडला नाही. भारत-पाकिस्तान संबंध ही प्रत्येक पंतप्रधानांची आपल्याकडे कसोटीच ठरते. वाजपेयींनी युध्दाच्या नव्हे तर मैत्री व प्रेमाच्या आधारावर आपल्या शत्रू असलेल्या शेजार्‍यावर मात करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी लाहोर-दिल्ली बससेवा सुरु केली. चर्चेच्या फेर्‍याही झाल्या. परंतु पाकिस्तानने यातून धडा न घेता घुसखोरी करण्यास सुरुवात करताच कारगिल युध्द पेटले. यात वाजपेयींनी खमकी भूमिका घेतली व या युध्दातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला. एवढेच कशाला या युध्दाच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी वाजपेयींना आमंत्रण देताच ते त्यांनी धुडकावू लावण्याचे धाडस दाखविले. अशा प्रकारे अमेरिकेसारख्या महासत्तेपुढेही त्यांनी न झुकता त्यांनी शिमला करारानुसार व्दिपक्ष चर्चेचा आग्रह धरला. तालिबान अतिरेक्यांनी विमानाचे केलेले अपहरण व संसदेवरी हल्ला या दोन घटनांनी वाजपेयी व्यथित जरुर झाले मात्र त्यांनी हार न मानता आपली अतिरेकी शक्तींच्या विरोधी लढाई अधिक व्यापक केली. संघाच्या मुशीतून तयार झालेले वाजपेयी हे कधी पंतप्रधान होतील असे कुणालाच वाटले नव्हते. मात्र ते खासदार म्हणून निवडून आपल्यावर त्यांच्या भाषणाची चुणूक पाहताच नेहरुंनी त्यांच्या पंतप्रधानपदाची भविष्यवाणी केली होती. स्वातंत्र्यनंतर कॉग्रेसचे असलेले वर्चस्व, आणीबाणीनंतर जरी कॉग्रेसची सत्ता गेली तरी दोन वर्षाच्या आत पुन्हा सत्तेत आल्यावर भाजपाचा कोणी पंतप्रधान या देशाला लाभेल अशी शक्यताही वाटत नव्हती. परंतु वाजपेयींच्या मवाळ चेहर्‍यामुळे व त्यांच्या वैयक्तिक जिव्हाळ्यामुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार सत्तते आले. त्यावेळी भाजपाने शायनिंग इंडियाचा बोभाटा करुनही वाजपेयी काही पुन्हा सत्तेत आले नाहीत. त्यानंतर वाजपेयींना प्रकृती साथ देत नसल्याने त्यांचे राजकीय करिअरही हळूहळू अस्ताला जात होते. भाजपात जसे  वाजपेयींसारखे नेतृत्व झाले नाही तसेच नेहरु, इंदिरा यांच्या तोडीचे देशाला लाभलेले ते एक महान पंतप्रधान होते. खर्‍या अर्थाने ते देशाचे पितामह होते.
---------------------------------------------- 

0 Response to "पितामह"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel