-->
अजित क्रिकेटवीर!

अजित क्रिकेटवीर!

शुक्रवार दि. 17 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अजित क्रिकेटवीर!
भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे 77 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाल्याने आपण एक अव्वल दर्ज्याचा क्रिकेटपटू गमावला आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही भारतीय क्रिकेट संघ जिंकू शकतो हे प्रथम वाडेकरांच्या नेतृत्वाखालील टीमने देशातील क्रिकेटरसिकांना विश्‍वास मिळवून दिला. वाडेकर कर्णधार असताना भारताने 1971 साली वेस्ट इंडिजमध्ये आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकून एक नवा विक्रम केला. अर्थात त्यांचा हा विक्रम भारतीय क्रिकेकच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहला गेला आहे व तो कुणी फुसू देखील शकणार नाही. असा या क्रिकेटपटूची जीवनयात्रा भारताच्या स्वातंत्र्यदिनीच संपावी हा एक योगायोग. गॅरी सोबर्सच्या वेस्ट इंडीज संघाविरूद्ध विंडीजमध्ये जाऊन जिंकलेली 1971  मालिका आणि त्यानंतर ब्रिटिशांवर त्यांच्या देशात जाऊन त्याच सुमारास मिळविलेला विजय वाडेकरांच्या यशाचे आणि नेतृत्व कौशल्याचे प्रतीक होते. नावाप्रमाणेच अजित असलेला भारतीय क्रिकेटमधील नेतृत्वाच्या यशाचा एक अध्याय  बुधवारी संपला. भारतीय संघातीलच नव्हे तर प्रतिस्पर्ध्यांनाही आपल्या गोड आणि लाघवी स्वभावाने जिंकण्याची असलेली क्षमता हे त्यांच्या यशाचे रहस्य होते. स्टेट बँकेत नोकरी करणारे वाडेकर हे एका झपाट्याने मोठे क्रिकेटवीर झाले परंतु त्यांना अहंकार कधीच शिवला नाही. अजित वाडेकरांना 1971 च्या सुमारास भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाचा राजदंड स्वीकारला आणि भारतीय क्रिकेटला यशाची स्वप्ने पडायला लागली. भारतीय क्रिकेट खर्‍या अर्थाने त्यानंतरच वयात आले, असे म्हणता येईल. क्रिकेटपटूंच्या बिरादरीत उच्च शिक्षीत असलेल्या या क्रिकेटपटूने स्टेट बँकेत नोकरी करीत असताना बँकिंग क्षेत्रातही उच्च पदापर्यंत मजल मारली होती. यशस्वी कप्तान आणि त्यानंतर त्यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची साडेतीन वर्षांची कारकीर्दही यशस्वी होती. कुशाग्र बुद्धी समोरच्या व्यक्तीला जिंकण्याची कला मैदानावर क्रिकेटपटूंना हाताळण्याचे कसब यामुळे अजित हे आपले नाव त्यांनी सार्थ केले. 1 एप्रिल 1941 रोजी जन्मलेल्या अजित वाडेकरांनी 1958 मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 1966 साली वाडेकरांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केले. त्यांना 1967 साली अर्जुन पुरस्काराने आणि 1972 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मिनित केले गेले. अजित वाडेकर यांनी 37 सामने आणि 71 डावांमध्ये 31.07 च्या सरासरीने 2,113 धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वाडेकर यांनी 237 सामन्यांमध्ये 47.03 च्या सरासरीने 15,380 धावा केल्या होत्या. यामध्ये 36 शतके आणि 84 अर्धशतकांचा समावेश होता. 1958-59 मध्ये वाडेकर यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी त्यांची आठ वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी निवड झाली. भारतीय क्रिकेटमधल्या तिसर्‍या क्रमांकावर बॅटिंग करणार्‍या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक म्हणून वाडेकर यांचे नाव घेतले जाते. तसेच वाडेकर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातले स्लिपमधले सर्वोत्तम फिल्डर होते. टायगर पतौडी यांच्यानंतर जानेवारी 1971 मध्ये अजित वाडेकर यांच्याकडे भारतीय टीमचे कर्णधारपद आले. यानंतर 1972-73 मध्ये इंग्लंड भारताच्या दौर्‍यावर आल्यानंतरही वाडेकर यांच्या नेतृत्वात विजय झाला. पण 1974 सालच्या इंग्लंड दौर्‍यामध्ये मात्र वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताचा दारूण पराभव झाला. या मालिकेतील तीनही सामने भारत हारला. यातल्या लॉर्ड्सवर झालेल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघ 42 धावांवर बाद झाला. टेस्ट इतिहासातला भारताचा हा आजही सगळ्यात कमी स्कोअर आहे. इंग्लंडमधल्या या निराशाजनक कामगिरीनंतर अजित वाडेकर यांना भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळता आले नाही आणि तेथेच त्यांचे कसोटी क्रिकेटमधील करिअर संपले. डावखुर्‍या फलंदाजांची नैसर्गिक गुणवत्ता आणि नजाकत त्यांच्या फलंदाजीत होती. स्विपचा फटका हा त्यांचा मास्टर क्लास फटका होता. स्लिपमधील त्यांचे क्षेत्ररक्षण बँकेच्या लॉकर इतके सुरक्षित मानले जायचे. वाडेकरांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांना विविध क्षेत्रातील लोकांशी मैत्री करण्याची मोठी आवड होती. लोकांचा चांगला पाहुणचार करण्याची त्यांना हौसच होती. त्यातून त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला. मत्स्याहाराचे ते शौकीन होते. त्यांच्या घरातला अप्रतिम बार त्यांच्या अभिरुचीची आणि मनाच्या श्रीमंतीची कल्पना देणारा होता. निवृत्त झाल्यानंतरही खेळाशी त्यांची जुळलेली नाळ अखेरपर्यंत अतूट होती. मुंबई क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदापासून निवड राष्ट्रीय निवड समिती अध्यक्षपदापर्यंत आणि प्रशिक्षकपदापासून अपंग क्रिकेट संघटनेच्या संघटनेच्या अध्यक्षपदापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका त्यांनी वठविल्या. वाडेकर ज्यावेळी क्रिकेटमध्ये सक्रिय होते त्यावेळी हा खेल लोकप्रिय जरुर होता, परंतु त्याला आतासारखे ग्लॅमर प्राप्त नव्हते. त्यामुळे त्या काळी लोक क्रिकेटकडे एक खेळ म्हणून पाहत. वाडेकरांच्या काळात या खेळात सट्टा सुरु झाला नव्हता. क्रिक्रेट हा खेळाडूंसाठी धर्म होता आणि खेळाडू मनाने खेळून हा धर्म पाळीत असत. या खेळात फिक्सिंग करणे, सट्टा करणे हे त्यांच्या मनाला कधी शिवले देखील नाही. त्यात अजित वाडेकर एक बिनिचे शिलेदार होते. नावाप्रमाणे ते खेळात बहुतांश वेळा अजितच राहिले.
--------------------------------------------------------------

0 Response to "अजित क्रिकेटवीर!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel