-->
पाच वर्षानंतर...

पाच वर्षानंतर...

सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
पाच वर्षानंतर...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज बरोबर पाच वर्षे पूर्ण होत आहेत. आज याच दिवशी सकाळी मॉर्निग वॉकला गेले असताना डॉ. दाभोलकर यांच्यावर पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. गेले पाच वर्षे अंधश्रध्दा निर्मुलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने निदर्शन, आंदोलने करुन सरकारवर डॉ. दाभोलकरांचे आरोपी पकडण्याबाबत दबाव सुरु होता. त्यापाठओपाठ लगेचच पाच महिन्यांनंतर कम्युनिस्ट विचारवंत गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात याच धर्तीवर हत्या झाली होती. त्यामुळे या दोघांवरील हल्लेखोर हे एकच असावेत व एकाच विचारधारेचे असावेत हे नक्की होते. कारण दोघांच्याही हत्येत बर्‍यापैकी साध्यर्म होते. शेवटी आता पाच वर्षानंतर डॉ. दाभोलकरांचे मारेकरी पकडण्यात पोलिसांना व ए.टी.एस.ला यश लाभले आहे. गेली पाच वर्षे दाभोलकर व पानसरे कुटुंबियांचा न्यायालयीन लढाही जोरात सुरु होता. न्यायालयाने तर यासंबंधी तपास यंत्रणेला आजवर अनेकदा चांगलेच धारेवर धरले होते. परंतु अनेकदा सरकारचे या मारेकर्‍यांना अभय असल्याचे दिसत असल्याने अनेकदा तपास यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसत होते. मात्र न्यायालयाने जो दबाब तपास यंत्रणेवर टाकला व त्याजोडीने रस्त्यावर येऊन अंधश्रध्दा निर्मुलनचे कार्यकर्ते हा लढा देत होते त्याला अखेर यश आले व नुकतेच दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकरांची हत्या ही राजकीय व वैचारिक विरोधातून झालेली आहे, हे त्यातून उघड झाले आहे. कारण गेल्या आठवड्यात पोलिस व ए.टी.एस.ने नालासोपारा येथे धाडी टाकून वैभव राऊत या सनातनच्या साधकाला अटक केली होती. त्याच्या घरी बॉम्ब बनविण्याची सर्व साधने व बंदुकांसह काही स्फोटके जप्त करण्यात आली होती. ए.टी.एस.ने आजवर केलेली ही मोठी कारवाही समजली जाते. सनातन या कडव्या हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मराठा मोर्चात काही घातपात करुन आंदोलकांना बदनाम करण्याचा कटही यातून उघड झाला आहे. वैभव राऊतला अट झाल्यावर त्याच्याकडून झालेल्या चौकशीत अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात हीच मंडळी डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्येला जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरच पोलिसांनी औरंगाबाद येथे धाड टाकून सचिन अंदुरे या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी काही किरकोळ अटक केल्या होत्या, परंतु त्यांच्याकडे काही ठोस पुरावे सापडले नव्हते. आता मात्र यावेळी ज्या अटक झाल्या आहेत तेच थेट मारेकरी आहेत, असे उघड झाले आहे. अटक झालेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपार्‍यात मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. अर्थात यातून तो काही निर्दोष आहे हे सिध्द होऊ शकत नाही. याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला जमलेले हजारो लोक व वैभव राऊतच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चातील लोक यांच्यात फरक करता येणार नाही. कारण दोघांची वैचारिक बांधिलकी अतिरेकी विचारांचीच आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आज वैभव राऊतला अटक झाली. त्याचे साथीदार अजूनही पकडले जातील. नंतर त्यांना अटक होऊन शिक्षा होतीलही, परंतु त्यांनी समाजात जे वीष पेरले आहे, ते जाणे कठीण आहे. नालासोपार्‍यातून सापडलेल्या कागदपत्रात राज्यातील अनेक लोक त्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यातून या हिंदुत्ववादी अतिरेक्यांचे मनोधैर्य किती उंचावले होते ते दिसते. विचारांची लढाई ही विचारानेच केली पाहिजे, त्यात शस्त्राच्या वापराची गरजच काय, असा सवाल होतो. परंतु एकदा एखादा माणूस अतिरेकी विचाराने मग तो हिंदुत्वाचा असो किंवा पाकधार्जीण्या मुस्लिम अतिरेक्यांचा विचाराने तो झपाटला की, त्याच्यापुढे आपले विरोधक शून्य वाटतात. आपल्याला विरोध करणारा हा या जगातच राहाता कामा नये, अशी त्यांची धारणा होते. मुस्लिम अतिरेक्यांना ज्या प्रकारे ब्रेन वॉश करुन त्यांच्यातील माणूस संपवून अतिरेकी जागा केला जातो तसेच तंत्र हिंदुत्ववाद्यांनी सुरु केले आहे. फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सर्व घडते आहे, ते पाहून वाईट वाटते. कारण या राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे, तिथे बॉम्बच्या फॅक्टरी बनविण्याचे काम सुरु झाले आहे, हे फार दुर्दैवी म्हटले पाहिजे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांच्या झालेल्या हत्या व हत्यार्‍यांकडे अशी हिट लिस्ट सापडणे या सर्व बाबी महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवणार याची कल्पना येते. राज्यात वाढत चाललेला हा अतिरेकी विचार आता आपल्याला संपविला पाहिजे. आज अनेक तरुणांच्या डोक्यात हे विष भिनविण्यास या शक्ती यशस्वी झाल्या आहेत. वैभवच्या समर्थनार्थ निघालेला मोर्चा हा देशात भविष्यातील मोठा धोका ठरणारा आहे. स्वातंत्र्यानंतर सात दशकांनंतर देशाला झालेला हा बदल सर्वात चिंतनीय आहे. याचा सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी व राज्यकर्त्यांनी गाभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. हा अतिरेकी विचार संपविणे हीच डॉ. दाभोलकरांना खरी श्रध्दांजली ठरेल.
------------------------------------------------------------------------

0 Response to "पाच वर्षानंतर..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel