वाढती अस्वस्थता...
24 एप्रिल २०२० अग्रलेख
कोरोनामुळे सर्वांवर लादले गेलेले लॉकडाऊन कधी संपणार असा सवाल अनेकांना भेडसावित आहे. याचे उत्तर खरेच कुणालाच ठामपणाने सांगता येणार नाही. कारण परिस्थितीच अशी आहे की, काहीच सांगता येत नाही. सर्वच समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसे होणे स्वाभाविकच आहे. कोरोनानंतरचे जग हे फार बदललेले असेल, हे अनेक जण मान्य करतात. मात्र कोरोनाचे हे युध्द कधी संपणार व नियमीत कामाला कधी प्रारंभ होणार हे कुणालाच सांगता येत नाही. 3 मे नंतरही लॉकडाऊन संपेल असे सध्या तरी खात्रीने सांगता येत नाही. सध्या ज्या गतीने कोरोनाचा प्रसार मुंबई, पुणे व अन्य देशातील महानगरात सुरु आहे ते पाहता तेथे तरी लॉकडाऊन एवढ्यात संपणारे नाही असेच दिसते आहे. चीनमध्ये हुवान मधील कोरोनाची लागण प्रशासनाने 80 दिवसांनी संपुष्टात आणली. जवळजवळ सर्वच देशात किमान दोन महिन्यांचे लॉकडाऊन जाहीर झाले आहे. आपल्याकडे किती काळ असेल हे सांगता येत नसल्याने जनता हैराण आहे. कारण प्रत्येकाला घरुन काम करताच येते असे नव्हे. अनेकांचा रोजगार यात बुडाल्यात जमा झाला आहे. लॉकडाऊन नंतर सध्याची नोकरी टिकेल का, याची खात्री नाही. तसेच सध्याची नोकरी टिकल्यास पगार तेवढाच राहिल की त्यात कपात होईल अशी भीती अनेकांच्या मनात आहे. पंतप्रधान मोदींनी कितीही सांगितले तरीही काही प्रमाणात अनेकांचे रोजगार बुडणार आहेत व पगारही कही ठिकाणी कमी होतील. गृह कर्जापासून ते वाहन कर्जापर्यत घेतलेली कर्जे पुढील काळात कशी फेडायची ही चिंता मध्यमवर्गीयाला आहेत. शेतकरी हा नेहमीच संकटात असतो त्यामुळे त्याच्या प्रश्नात आणखी भर पडणार आहे. समाजातील प्रत्येक घटक बेचैन आहे. सरकारी नोकर वगळता अन्य कोणत्याही नोकरदाराला नोकरीची शास्वती राहिलेली नाही. नोकरदारांची ही स्थिती तर हातावर पोट असलेल्या व रोजंदारीवर असलेल्यांचे तर प्रश्न फारच गंभीर आहेत. त्यातून लाखो लोकांना त्यांच्या घरीही जाता आलेले नाही. त्यामुळे त्यांची तर इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती आहे. अनेकांना पुरेसे दोन वेळचे खाणेही मिळत नाही. सरकारने त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली आहे तसेच महाराष्ट्रात शिवभोजन थाळ्या वाढविल्या आहेत परंतु ते कितीसे पुरणार असा सवाल आहे. लघुउद्योजकांना त्यांचे थांबलेले चक्र कधी सुरु होणार याची चिंता भेडसावित आहे. अशा स्थितीत केवळ घरी राहून प्रत्येकाची कुठेतरी चिडचिड वाढते आहे. त्यातून काही नवीन समस्या आज व पुढील काळात निर्माण होणाऱ आहेत. पन्नाशीच्या खालच्या वयोगटातील लोकांना फारशी वाचनाची सवय राहिलेली नाही. त्यामुळे मोबाईलवर पोर्न साईटस् पाहाण्याकडे कल वाढला आहे. त्यातून घरातील लैगिंक अत्याचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. बिघडत्या समाजनाचे उमटणारे हे पडसाद आहेत. चिनमध्येही लॉकडाऊन नंतर घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारे विविध सामाजिक प्रश्नांना आपल्याला भविष्यात सामोरे जावे लागणार आहे. लॉकडाऊनच्या अनेक जशा काही नकारात्मक बाजू आहेत तशाच काही सकारात्मक बाजू आहेत. यातील महत्वाचे म्हणजे गेल्या महिन्याभरात पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी अनेकांचा अप्रत्यक्षरित्या हातभार लागला आहे. त्यामुळे प्रदूषणाचा मारा कमी झाला आहे. डिजिटलायझेशन व मोबाईल हेच भविष्य असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे. सध्या मोठ्या शहरात वृत्तपत्रांचे वितरण होत नाही. परंतु वाचक काही कमी झालेला नाही. छापील अंक वाचण्याएवजी लोक इंटरनेट आवृत्ती वाचत आहेत. त्यामुळे नेट आवृत्तीच्या हिटस वाढल्या आहेत. यातून काही लोकांची छापील वृत्तपत्र वाचण्यापेक्षा नेट आवृत्ती वाचण्याकडे कल वाढेल. असे झाल्यास छपाई उद्योगात आमुलाग्र बदल होईल. या उद्योगातील पुढील दहा वर्षात अपेक्षित असलेले बदल आत्ताच सुरु होतील असे दिसते. बँकांचे व्यवहार संगणकाच्या माध्यमातून करण्याकडे कल वाढला आहे. प्रत्यक्ष बँकेत जाण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहार करणे लोक पसंत करु लागले आहेत. लोकांना ही सवय जडल्यास बँकेच्या कामावरील ताण कमी होऊ शकतो. तसेच शाळा, महाविद्यालये सध्या बंद असल्याने काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिकवण्या सुरु केल्या आहेत. अर्थात आपल्याकडे त्याची काही प्रमाणात सुरुवात झाली होती. आता मात्र लॉडाऊनमुळे त्या प्रक्रियेला गती येईल. एकूणच ऑनलाईन कारभार वाढविण्यासाठी सरकारने कोरोना संपल्यावर विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागात विजेचा पुरवठा सतत ठेवला पाहिजे व नेटही सुधारले पाहिजे. अशाने ऑनलाईन कारभार वाढणार आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन फ्रॉड होणार नाहीत त्याकडे विशेष लक्ष पुरविले गेल्यास हे व्यवहार जोमाने वाढतील. याच काळात एक महत्वाची बातमी प्रसिद्द झाली आहे, त्याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. जगातील प्रसिध्द फेसबुकने भारतातील रिलायन्सच्या जिओच्या दहा टक्के भांडवली वाटा खरेदी करण्यासाठी तब्बल 45 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. ही बातमी म्हणजे भविष्यात डिजिटलायझेशन वाढण्याचे द्योतक आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील का, असा सवाल पडतो. ज्यावेळी संगणक आले त्यावेळीही नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त झाली होती. परंतु संगणकाने नोकऱ्या निर्माण केल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात काही जणांच्या नोकऱ्या जातीलही मात्र त्यातून काही नव्या नोकऱ्याही तयार होतात. जगात असेच बदल होतच असतात. या बदलाच्या प्रक्रियेत काही भरडले जातात तर काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तग धरतात. कोरोनानंतर आपल्याकडे आमुलाग्र बदल होण्याची एक नवीन संधी चालून आली आहे. एक नवीन डिजिटलायझेशनची क्रांती होऊ शकते.


0 Response to "वाढती अस्वस्थता..."
टिप्पणी पोस्ट करा