-->
कोरोनानंतरचा चीन... ज्या चीनमधून कोरोनाची जगाला लागण झाली तो चीन आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे असा दावा चीनच्या सरकारने केला आहे. हुवान या हुबेई प्रांतातील भागात चीनमध्ये नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कोरोनाची लागण झाली. परंतु हा साथीचा ताप येणारा रोग नेमका कोणता आहे हे ओळखण्यातच बराच वेळ गेला. सुरुवातीला एका चीनी डॉक्टरने या रोगाची लक्षणे पाहून एक वेगळाच झपाट्याने पसरणारा साथीचा रोग आहे असे म्हटले होते. मात्र त्याला चीनी सरकारकडून खोटे ठरविण्यात आले. मात्र नंतर त्याचे म्हणणे खरे झाले. मात्र डिसेंबर अखेरीस एकदा का या रोगाची लक्षणे व नेमके कारण स्पष्ट झाल्यावर चीनने या रोगाला हद्दपार करण्याचा विडाच उचलला. या रोगावर औषध तर नाही त्यामुळे लोकांना फिरु न देणे व प्रत्येकाला वेगळे ठेवणे हाच उपाय आहे हे समजल्यावर त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. एक हजार बेडचे अत्याधुनिक रुग्णालय केवळ आठ दिवसात उभे करण्यात आले. हुबेई प्रांतातील सुमारे सहा कोटी लोकांना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय झाला व त्याची अंमलबजावणी सुरु झाली. एवढेच नव्हे तर या प्रांतातून हा रोग बाहेर पसरु नये यासाठी याच्या सीमा बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर खबरदारीचे उपाय म्हणून देशातील जवळपास अर्धी जनता म्हणजे 76 कोटी लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. देश संपूर्ण ठप्प झाला, सर्व घडामोडी थांबल्या. परंतु त्याची पर्वा करण्यात आली नाही. जनतेवर वेळ पडल्यास सक्ती करुन कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली. 25 जानेवारीला चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला होता. त्यापूर्वीच सरकारने लॉकडाऊन सुरु केले होते. परंतु त्याचे दृश्य परिणाम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दिसू लागले. 16 मार्च रोजी फार झपाट्याने 81 हजार कोरोनाग्रस्तांचा आकडा गाठला गेला होता. हा आकडा सर्वोच्च ठरला व त्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या व वेग घसरण्यास सुरवात झाली. प्रवासावर बंदी होती, लोकांच्या हालचालीवर बंदी होती, सर्व कारखाने व कार्यालये शंभर टक्के बंद होती. कोणाला घरातून बाहेर पडण्याची मुभा नव्हती. सर्वांना घरपोच जेवण दिले जात होते. अशा प्रकारे शंभर टक्के बंदीवासात लोकांना ठेवण्यात आले. चीनच्या या उपक्रमाचे नंतर जागतिक आरोग्य संघटनेने कौतूकही केले. 10 मार्चला राष्ट्रध्यक्ष झी झेपींग यांनी हुवान शहराला भेट दिली. त्यानंतर पुढील काही काळातच येथील कोरोना संपुष्टात येतोय याची चिन्हे दिसू लागली. चीन सरकारच्या कडक कारवायांना फळ आले. अन्य प्रांतात हा पसरु नये यासाठी केलेले उपायही यशस्वी ठरले. चीन सरकारचा हा अनुभव लक्षात घेऊन सिंगापूर सरकारने याच घर्तीवर उपाययोजना केल्या व त्यात त्यांनाही यश आले. चीनमधील जीवनमान आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला आहे. हुवान शहर जे एका मोठ्या संकटातून गेले तेथील लोक व एकूणच सर्व चीनमधील लोक अजूनही भेदारलेल्या अवस्थेत आहेत. त्यांच्या मनात कोरोनाविषयी भीती कायम राहीलेली आहे. चीनी सरकारने आपल्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेत भविष्यातील योजना तयार केल्या आहेत. त्यातील सर्वात प्रथम त्यांनी जीवन पूर्वपदावर कसे येईल याला प्राधान्य दिले आहे. चीनमधील आता जवळजवळ सर्वच ठिकाणी कामकाज सुरु झाले आहे, परंतु एका जबरदस्त दडपणाखाली लोक आहेत. प्रत्येकाच्या तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे आहे. अगदी कामावर तुम्ही असलात तरीही मास्क बांधणे सक्तीचे आहे. प्रत्येक जण मात्र भीतीपोटी सरकारच्या नियमांचे पालन करीत आहे. अलिबाबा या सर्वात मोठ्या ऑनलाईन कंपनीने एक अप विकसीत केले आहे. त्यात प्रत्येकाच्या प्रवासाच्या इतिहासानुसार विभागणी करण्यात आली आहे. 200 मोठ्या शहराचा डाटा जमा करुन त्यांनी लोकांना तीन विभागात म्हणजे हिरवा, पिवळा व लाल अशा रंगात विभागले आहे. त्यांच्या नित्कषानुसार जे लाल रंगात आहेत त्यांना सक्तीने 14 दिवस क्वॉरंटाईल करण्यात आले आहे. आता चीनने प्रत्येक कारखाना कसा सुरु होईल व त्याचे उत्पादन पुन्हा पूर्वीप्रमाणे किती झपाट्याने सुरु होईल याची आखणी केली आहे. त्याअगोदर प्रतेयक कारखान्याचे पूर्णपणे निर्जंतूतीकरण करण्यात येते. आता हळूहळू चीन आर्थिक व्यवहार तसेच निर्यात पुन्हा कशी पूरपदावर येईल हे पाहात आहे. कोरोनानंतरच्या चीनमध्ये काही सामाजिक व कौटुंबिक प्रश्न निर्माण होत आहेत. यातील एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, घटस्फोटांचे वाढलेले जबरदस्त प्रमाण. घरात एकत्र बसून कौटुंबिक कलह वाढले आहेत, ही एक मोठी चिंतेची बाब चीनच्या सरकारसाठी ठरली आहे. भारतात गेल्या आठवड्यात एक छोटीशी परंतु महत्वाची बातमी आली होती. बँक ऑफ चायना या चीनमधील सर्वात मोठया बँकेने भारतातील एच.डी.एफ.सी. या गृहवित्त क्षेत्रातील कंपनीत आपला भांडवली वाटा वाढवून आता एक टक्क्यांवर नेला आहे. पूर्वीपासून बँक ऑफ चायनाचा या कंपनीत नगण्य भांडवली वाटा होता. मात्र त्यांनी सध्या शेअर बाजारात दर कोसळले असताना मोठ्या प्रमाणात खरेदी करुन आपला वाटा एक टक्क्यांवर नेला आहे. त्यावरुन चीनने आता विदेशातही गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर इटली, स्पेन, पोर्तुगाल या सर्वात जास्त कोरोनाने त्रस्त झालेल्या देशातील अनेक कंपन्या आपल्या ताब्यात घेण्याची तयारी दाखविली आहे. किंबहूना त्यांनी युरोपातील त्या देशातील कंपन्या ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. असे बोलले जाते की, या कंपन्या सध्याच्या परिस्थीतीत चीन अतिशय स्वस्तात खरेदी करु इच्छितो. मात्र इटलीच्या सरकारने याला विरोध केला आहे. विदेशातील कोणत्याही कंपन्यांनी इटालीयन कंपन्यात गुंतवणूक करताना सरकारची परवानगी घेणे आवश्यक ठरविले आहे. त्यामुळे कोणत्या देशातून गुंतवणूक येते आहे, त्यांचा कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न हे का, हे सर्व तपासून इटालीयन सरकार निर्णय घेईल. एकूणच पाहता पुन्हा एकदा आता चीन व्यापार, उद्योगात नियोजनबद्द पद्धतीने जोमाने कामाला लागला आहे. पुढील काही महिन्यात चीनमधीन त्यासंबंधी अनेक बातम्या जगात येणार आहेत. काही धक्कादायक असतील तर काही समाधानकारक, मात्र चीनची पावले एक जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने पडत आहेत हे मात्र नक्की. अशा स्थितीत आपल्या देशाचे काय असा सवाल उपस्थित होतो. आपल्याकडे असे धोरण आखून आपण कधी वाटचाल करणार? की केवळ भावनिक आवाहने करणार?

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel