-->
मी टू चे वादळ

मी टू चे वादळ

रविवार दि. 14 ऑक्टोबर 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
मी टू चे वादळ
---------------------------------------
या लेखाला मी टू चे वादळ हे शिर्षक देण्यामागे तसे खासच प्रयोजन आहे. कारण आपल्याकडे अशी वादळे अनेकदा येत असतात. कधी आत्महत्येचे वादळ, कधी घटस्फोटांचे वादळ, कधी सेलिब्रेटींच्या लग्नाचे वादळ... अशी अनेक वादळे आपण झेलत, पाहत, अनुभवत असतो. त्यातलेच हे मी टू चे वादळ... असे म्हणता येईल. अभिनेत्री तनुश्री दत्ताने तिच्यावर दहा वर्षापूर्वी झालेला अत्याचार कथन केला आणि या वादळाची सुरुवात झाली. नाना पाटेकरांसारख्या एका ज्येष्ठ कलाकारावर झालेले हे आरोप पाहता अनेकांचा आश्‍चर्याचा धक्काच बसला. अनेकांनी तर असे शक्य नाही असे जाहीर केले. नानांच्या बाजूने व तनुश्रीच्या बाजूने तर कोणतीच भूमिका न घेता स्वस्थ बसणारे यात फिल्म इंडस्ट्री विभागली गेली. सुरुवातीला हा तनुश्रीचा पब्लिसीटी स्टंट वाटला, परंतु हे वादळ बरेच घोंघावत गेले. तनुश्रीला बिग बॉसमध्ये प्रवेश करावयाचा असल्याने तीने हा आरोप केल्याचे बोलले गेले. काहींच्या मते तनुश्रीला फक्त सोशल मिडियात प्रसिध्दी मिळविण्यापर्यंत व आपले अशा प्रकारचे अनुभव कथन करण्यापर्यंत त्याची सिमा राहिलेली नाही. कारण निदान तनुश्री दत्ताने तरी पोलिसात रितसर तक्रार दाखल केल्याने आता हे प्रकरण गंभीर वळण घेणार असेच दिसते. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक स्त्रीया सोशल मिडियावर बोलत्या झाल्या, काही महिला पत्रकार आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत जाहीरपणाने सोशल मिडियावर बोलल्या, काही महाविद्यालयीन युवती आपल्यावर प्राध्यापकांनी कसे अत्याचार केले त्याविषयी बोलल्या. एकूणच सध्या हे वादळ घोंघावत कुठवर थांबेल याचा पत्ता लागत नाही. महिला, तरुणी, विद्यार्थींनी, सेलिब्रेटी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी बोलू लागल्या, त्यांच्या मनात जे आजवर दडलेले होते ते शब्द रुपाने त्या बाहेर फेकू लागल्या. त्या व्यक्त होऊ लागल्या ही बाब निश्‍चितच स्वागतार्ह आहे. परंतु ते व्यक्त होताना केवळ सोशल मिडियापुरतेच हे आरोप राहाणार असतील त्याला केवळ पब्लिसीटी स्टंटच म्हणावा लागेल. जर हा स्टंट असेल तर ते चुकीचे आहे. कारण अशा प्रकारे फुकटची प्रसिध्दी मिळविण्यासाठी तुम्ही एखाद्या पुरुषाला बदनाम करीत असाल तर ते चुकीचे आहे. यातून काही जणी तर संपूर्ण पुरुष जमात कशी वाईट आहेत, हे दाखवू लागल्या आहेत. अशा प्रकार प्रत्येक पुरुषाकडे संशयीत नजरेने पाहणेही योग्य ठरणार नाही. खरोखरीच एकाद्या महिलेवर असा प्रकारे अत्याचार, अन्याय झाला असेल तर ते चुकीचेच आहे व त्यातील गुन्हेगाराला मग तो कुणीही असो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, यात कुणाचे दुमत असणार नाही. एखाद्या महिलेने एवढ्या कालावधीनंतर अशा प्रकारे तक्रार करणे हे कितपत योग्य आहे, असा मुद्दा देखील पुढे आला आहे. मात्र तिने तक्रार किती कालाने करावी हा मुद्दा गौण ठरतो. तिच्यावर झालेल्या अत्याचाराला ती केव्हांही वाचा फोडू शकते. मात्र जेवढा आरोप जुना तेवढी तिची बाजू लंगडी होते, हे लक्षात घेतले पाहिजे. अशा संबंधातील आरोप करताना पूर्ण विचारांती करावा लागतो. कारण अशा प्रकारचे अत्याचार हे बंद दरवाजात म्हणजे चार भिंतींच्या आड होतात. अशा स्थितीत पुरावा उपलब्ध नसतो. त्यामुळे निकाल देताना न्यायमूर्ती कोणती भूमिका घेतात याला विशेष महत्व ठरते. एखादी आरोप करणारी महिला (किंवा कोणीही) न्यायालयात शपथ घेऊन जरी खरे बोलणार असल्याचे मान्य करीत असली तरी तिच्यावर विश्‍वास ठेवण्यास अनेकदा मर्यादा येतात. त्यामुळे समोर आरोप झालेली व्यक्ती कोण आहे, तिचा आजवरचा इतिहास, समाजातील मते याचा पूर्ण विचार करुन न्यायाधीशांनी यासंबंधी निकाल द्यावा लागतो. बरे हा निकाल देताना कोणावर अन्याय होणार नाही हे देखील पहावे लागते. अनेकदा पुरुष-स्त्री संबंधात सुरुवातीला स्त्री ची संमंती असते, मात्र संबंध बिघडल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली जाते. अनेकदा संबंधीत पुरुषाशी संबंध ठेवण्यामागे त्या महिलेचा हेतू असतो, त्यातून तिला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ होत असतो. अशा वेळी बलात्कार झाल्याची तक्रार किती ग्राह्य समजायची असे पेच न्यायमूर्तींसमोर उभे राहातात. यातून सर्वंकष विचार करुनच सद्विवेकबुध्दीला स्मरुन न्यायमूर्ती निकाल दिला जातो. अशा प्रकारच्या खटल्यातून नुकतीच दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची मुक्तता झाली होती. या बलात्कार खटल्यातील निकाल हा यातील एक उत्तम उदाहरण ठरावा. प्रिती झिंटा व नेस वाडिया या प्रकरणी देखील नेस वाडिया यांच्या बाजूने निकाल लागला आहे. त्यामुळे एखाद्या महिलेने केवळ आरोप केले तर ते सिध्द होतीलच असे नाही. परंतु एक महत्वाचा मुद्दा हा देखील आहे की, याचा अर्थ तिचे तिच्यावर होणारा अन्याय, अत्याचार सहन करावयाचा असे नाही. तिने त्याविरुध्द आवाज हा उठविलाच पाहिजे. परंतु त्यातील तिचा हेतू साफ असला पाहिजे. अनेकदा महिलांच्या बाजुने असणार्‍या कायद्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो हे चुकीचे आहे. सध्या मी टू हे जे काही वादळ आले आहे, त्यातील अनेकांचे हेतू साफ आहेत असे सध्या तरी सकृतदर्शनी दिसत नाही. ज्यांना खरोखरीच आपल्यावरील अन्यायाची दाद मागावयाची असेल त्यांनी केवळ सोशल मिडियात न बोंबलता रितसर पोलिसात तक्रार करावी व त्यासाठी पुढे यावे. आरोपी मग कोणीही असो, कितीही मोठा सेलिब्रेटी असो, आरोपीचे समर्थन करण्यास लोक धजावणार नाहीत. सोशल मिडियाचा वापर करीत जर असे कुणावरही आरोप केल्यास त्यातील गांभीर्य निघून जाईल व खरोखरीच जर कुणावर आत्याचार झाले तर त्या महिलेला देखील सारख्याच पारड्यात मोजले जाईल, याची दक्षता महिलांनीच घेण्याची आवश्यकता आहे. मी टूच्या निमित्ताने महिलांच्या शोषणाचे प्रश्‍न आज जनतेपुढे आले आहेत. ही बाब चांगली आहे, परंतु त्याला थिल्लरपणा येता कामा नये, ही इच्छा.
---------------------------------------------------------

0 Response to "मी टू चे वादळ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel