-->
गमावलेली संधी...

गमावलेली संधी...

23 एप्रिल २०२० अग्रलेख जगात ज्याला काळे सोने म्हटले जाते व ज्यावरुन औद्योगिकीकरणाची गुढी उभारली गेली त्या खनिज तेलाची किंमती दीड डॉलर प्रति बॅरल घसरली आहे. काही ठिकाणी तर खनिज तेलाची डिलिव्हरी घेतल्यास प्रति बॅरल खरेदीदीराला देण्याची पाळी उत्पादकांवर आली आहे. म्हणजे खनिज तेलाचा साठा मुबलक व खरेदीदार नाही अशी भीषण स्थिती या उद्योगावर आली आहे. बरे उत्पादन सुरुच असून या खनिज तेलाचे करायचे काय, असा सवाल उत्पादक देशांपुढे आहे. याचा अर्थकारणात निगेटिव्ह प्राईझिंग असा उल्लेख केला जातो. कारण जगातील उत्पादन सर्वच ठिकाणी ठप्प झाले आहे. अशा स्थितीत ग्राहक नाही, निर्माण होणारे दररोजचे उत्पादन ठेवायचे कुठे असा सवाल निर्माण झाला आहे. आज भारताकडेही सर्व साठवणुकीची क्षमता संपली आहे. खनिज तेलाची नव्याने खरेदी करण्याचे भारताने थांबविले आहे. जगातील एक मोठा खरेदीदार असल्याने भारताकडूनही साठा करुन ठेवण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे घसरलेल्या किंमतीची फायदा आपण उठवू शकत नाही. त्यामुळे घसरत्या किंमतीचा आपण फायदा उठवू शकत नाही अशी स्थिती आहे. आपण सध्याच्या काळातील एक मोठी संधी गमावली आहे. ज्या आखाती देशांनी साठीनंतरच्या दशकात याच खनिज तेलाच्या जोरावर आपले भव्यतेचे इमले बांधले, आता त्यांना खनिज तेलाचे हे कोसळलेले दर रसातळाला नेणार आहेत. आखाती देशांची खनिज तेलातील क्षेत्रातली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी अमेरिकेने जंगजंग पछाडले, अगदी त्यासाठी युध्द करुन त्यांनी इराक संपविला, तेथील कट्टर अमेरिका विरोधक सत्ताधीश सद्दाम हुसेन याला लोकशाहीचा घोष करीत संपविला. परंतु खनिज तेलावर ताबा मिळविण्यात अमेरिकेला काही यश मिळत नव्हते. मात्र अलिकडेच दोन-तीन वर्षापूर्वी अमेरिका यशस्वी ठरली. कारण आता अमेरिका हा जगातील सर्वात मोठा खनिज तेल उत्पादक देश झाला आहे. परंतु याचा त्यांना फार मोठा काही लाभ मिळेल असे नाही. कारण अमेरिकेने सर्वात मोठा खनिज तेल उत्पादक देश हा मानाचा मुगुट घातल्यापासून या काळ्या सोन्याच्या किंमती रसातळाला जात आहेत. आता कोरोनामुळे सर्व जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना खनिज तेलाने किंमतीचा विक्रमी निचांक गाठला आहे. कारण खनिज तेल उपसण्यास जो खर्च येतो तो देखील सध्याच्या किंमतीत निघू शकत नाही. चालू वर्षांच्या प्रारंभी म्हणजे तीन महिन्यांपूर्वी प्रति बॅरल 65 डॉलर असलेल्या या किंमती 70 डॉलरवर पोहोचल्या होत्या. परंतु या खनिज तेलाच्या चढत्या किंमतीला आळा घातला तो कोरोना विषाणूच्या प्रसाराने. नवीन वर्षांच्या प्रारंभी कोणासही सांगितले असते की, खनिज तेलाच्या किंमती तीन महिन्यात विक्रमी पातळीवर कोसळतील तर विश्वास वाटला नसता. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत याच खनिज तेलाच्या किंमती 60 डॉलरवर आल्या होत्या. परंतु त्यानंतर कोरोना जगात पसरु लागल्यावर खनिज तेलाच्या किंमती ज्या गतीने कोसळू लागल्या की त्याला कुणी आवर घालू शकले नाही. या किंमती उतरण्यामागे त्याच्या जोडीला जागतिक राजकारणही होते. रशिया व सौदी अरेबियांने 2016 साली अघोषित करार केला होता की, खनिज तेलाच्या किंमती 70 डॉलरच्या खाली जाऊ द्यायच्या नाहीत. परंतु हा करार उभयतांनीच मोडला होता आणि त्यामुळे किंमती धडाधड कोसळू लागल्या. अमेरिकेतील उद्योगांना संपुष्टात आणण्यासाठी ही या दोन देशांनी खेळी केली असल्याचा अनेकांचे मत होते. अमेरिकेने गेल्या वर्षी रशियावर व्यापारासंबंधी निर्बंध घातले होते आणि त्यानंतर रशियाची अर्थव्यवस्था पुन्हा कोलमडू लागली होती. रशियन रुबलची मोठी घसरण झाली होती. सोदी अरेबिया देखील त्यांचा सर्वात मोठा खनिज तेलाचा उत्पादक देश असा मान हिरावून घेतल्यानंतर अमेरिकेवर रुसलेला होता. परंतु अमेरिका व सौदीचे संबंध बाहेरुन चांगले दिसले तरी ताणले गेलेले होते. असा स्थितीत सौदी व रशिया या दोघांनाही खनिज तेलाचे दर ठरवून कोसळवले, त्यात अमेरिकेतील खनिज तेल उद्योग संकटात आला तर तो पाहिजेच होता. अशाच स्थितीत कोरोनाचे संकट जागतिक पातळीवर पोहोचले आणि जगात लॉकडाऊन सुरु झाले. या लॉकडाऊनमुळे खनिज तेलाची मागणीच संपुष्टात आली. कारण देशाचा सर्वच कारभार, व्यवहार संपूर्णपणे थंडावले. देशातील विमाने, रेल्वे, ट्रक, बस, प्रमुख उद्योगधंदे सर्वच बंद आहेत. त्यांना लागणाऱ्या डिझेलची मागणीच राहिली नाही. भारताकडे असलेला खनिज तेलाचा राखीव साठा पूर्ण भरलेला आहे व नवीन मागणीच नोंदविली जात नाही. असे केवळ भारतातेच नाही तर जगातले चित्र आहे गोल्डमॅन सॅच या संस्थेच्या सांगण्यानुसार, एकीकडे मागणी वाढत नाही तर दुसरीकडे उत्पादन वाढविले जात आहे. त्यामुळे खनिज तेलाचा दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. भारतात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून इंधनाची मागणी 50 टक्क्याने घसरली आहे. आता 21 दिवसांचे लॉकडाऊन संपल्यावर आणखी दोन आठवड्याने वाढले आहे. त्यानंतरही अजून काही काळ लॉकडाऊन वाढवावे लागेल असेच दिसते. भविष्यात कोरोनाचे संकट टळल्यावर थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरु होण्यासाठी किमान तीन-चार महिने लागतील. सध्याची ही स्थिती युद्दाच्या काळापेक्षाही वाईट आहे. युद्दात उलट खनिज तेलाची मागणी वाढते, आता तर नेमकी उलटी परिस्थिती आहे. सर्वच अर्थकारण थांबल्यासारखे झाले आहे. यातून केवळ भारत नव्हे तर जगाला सावरायला प्रदीर्घ काळ लागेल असेच दिसते.

Related Posts

0 Response to "गमावलेली संधी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel