
29 April 2020
साथीचे रोग येणे हे काही जगात पहिल्यांदा घडते आहे असे नव्हे. कोरोनापूर्वी अनेक देशात साथींचे रोग आलेले आहेत. तसेच या रोगांने हजारो लोक मरण पावल्याचीही काही कमी उदाहरणे नाहीत. परंतु आता सक्रिय झालेला सोशल मिडिया, विविध प्रकारची सतत बातम्या आदळणारी न्यूज चॅनल्स तसेच जगभरात लॉकडाऊन करण्याची आलेली वेळ यामुळे कोरोनाची साथ ही सर्वात जास्त चर्चिली गेली आहे. मानवजातीने आजवर अशा प्रकारच्या कमी-जास्त प्रभावी असणाऱ्या साथींचा सामना करीतच आजपर्यंतची वाटचाल केली आहे. त्या साथींनंतर त्यावर लस शोधून काढून शास्त्रज्ञांनी मानवजातीला जीवनदान दिले आहे. जगाचे हे रहाटगाडे अशाच प्रकारे चालू आहे. मात्र 220 पैकी 185 देशात जागतिक पातळीवर पोहोचलेली साथ ही पहिलीच ठरावी. जागतिक आरोग्य संघटनेने गेल्याच वर्षी अशा प्रकारे जगात जर एखादी संसर्गाने होणारी साथ आली तर सर्व देश त्याचा मुकाबला करायला सज्ज आहेत का, याची विचारणा करणारे एक पत्र सर्व राष्ट्रप्रमुखांना पाठविले होते. परंतु फारसे त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. विकसीत देश आपल्याकडे असलेली आरोग्य सेवा ही सुसज्ज असल्याच्या गुर्मीत होते तर विकसनशील देशांना आपली आरोग्य सेवा सुधारावयाची असली तरीही त्यांच्याकडे निधीची मोठी चणचण आहे. गरीब देशांचे तर सोडूनच द्या. जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलेल्या या शंकेनंतर केवळ एका वर्षातच कोरोनाची साथ आली हा एक निव्वळ योगायोग समजावा की त्यांना खरोखरीच अशा प्रकारची चाहूल लागली होती, हे आता सांगणे कठीण आहे. कोरोनाने मात्र एक केले, सर्व मानव जातीला एका पातळीवर आणून ठेवले. कोरोनाने जात, धर्म, उच्च-नीच, श्रीमंत, गरीब असे भेदभाव काही पाहिले नाहीत व मानवजात ही समान आहे, मानवाने तयार केलेले हे भेदभाव आहेत हे दाखवून दिले. बरोबर शंभर वर्षापूर्वी आलेल्या तापाच्या साथीत जगातले सुमारे पाच कोटी व भारतातले दीड कोटी लोक मरण पावले होते. जगभरातील माणसाच्या मृत्यूचा दर पाहिला तर एक सेकंदाला किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी, कुणीतरी मरत असतोच. जन्म, मृत्यू या दोन्ही बाबी अटळ आहेत. प्रसिध्द पॉप गायक माईक जॅक्सन याला दीडशे वर्षे जगण्याची इच्छा होती. त्यासाठी आपल्यासोबत तो नेहमी डॉक्टरांचा फौजफाटा ठेवत होता. ते सर्व करण्याची आर्थिक ताकद त्याची होती. मात्र असे असले तरी त्याचे 58व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे मृत्यू कधी येणार हे आपण ठरवू शकत नाही. अगदी विकसीततेचा टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेतही काही महिन्यांपूर्वी एन्फ्लुएंजाने सुमारे 25 हजार लोक मरण पावले होते. गेल्या वर्षी इटलीतही 60 हजार लोक साथीच्या आजाराने मरण पावले होते. दरवर्षी विविध देशात साथीच्या रोगाने किंवा व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरण पावत असतात. टी.बी.सारख्या रोगाने दरवर्षी 15 लाख लोक अजूनही मरत पावतात. आजच्या घडीला भारतातही टी.बी.चे 27 लाख लोक रुग्ण आहेत. आता टी.बी. हा केवळ गरीबांनाच होतो असे नाही तर श्रीमंतांमध्येही अलिकडच्या काळात प्रमाण वाढल्याचे दिसते. गेल्या वर्षी भारतात 67 हजार लोकांना डेंग्यूची लागण झाली होती. स्वातंत्र्यानंतर आपण गोवर, कांजिण्या, पोलियो, देवी या रोगांवर बऱ्यापैकी मात केली आहे. लोकांनाही लशीकरणाचे महत्व पटले आहे. त्यातून हे रोग कमी झाले आहेत. स्वातंत्र्यानंतरची आरोग्य क्षेत्रातली ही सर्वात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. आपल्याकडील लोकसंख्या व आपण खर्च करीत असलेली आरोग्यावरील रक्कम पाहता आपली गेल्या 70 वर्षातील कामगिरी लक्षणीयच म्हणावी लागेल. सध्या कोरोनाची सर्वत्र हवा आहे. लोक सावधानगिरी बाळगत आहेत, परंतु आपल्याकडे कोरोनाच्या चाचण्या या लक्षण दिसल्यासच होते. सर्वसाधारणपणे सर्वांची कोरोना चाचणी होत नाही. आपल्याकडे तसे करण्याची यंत्रणाही नाही व लोकसंख्येचा विचार करता शक्यही नाही. त्यामुळे आपल्याकडे ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्यातील अनेकांना कोरोना होऊन त्यातून ते बरेही झाले असतील. असा एक अंदाज आहे की, 15 टक्के लोकांचाच कोरोनावर उपचाराची गरज भासते. त्यात पाच टक्के लोक गंभीर आजारी असतात. 95 टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता जवळजवळ नगण्यच आहे. साध्या उपचारानेही कोरोना बरा होऊ शकतो. जगात दोन लाख 30 हजार प्रकारचे व्हायरस आहेत, त्यातील कोरोना हा एक आहे. यात लोकांमध्ये भीती ही जास्त आहे व त्याचा माहोल समाज माध्यमांनी जास्त निर्माण केला आहे. बरे होणाऱ्यापेक्षा मृत्यूच्या बातम्या अधिक ठळकपणे सांगितल्याने लोकांमध्ये आणखी भिती निर्माण होते. पूर्वी देखील देवी, प्लेगसारख्या साथीच्या आजारात भीतीने मेलेल्यांची संख्या मोठी होती असे संशोधन सांगते. कुठल्याही आजाराला सामोरे जाऊन त्याचा प्रतिकार करावयाचा असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्याचा शारीरीक व मानसीक पातळीवर मुकाबला करणे गरजेचे असते. आज कोरोनाची लढाई याच तत्वावर लढली जाणार आहे. इटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावले त्यामागे तेथे जास्त असलेल्या वृध्दांची संख्या हे आहे. मात्र हे वास्तव कुणी सांगताना दिसत नाही. सध्याच्या वातावरणात न घाबरता लढाईला सज्ज होणे महत्वाचे आहे. जगात कितीही संशोधन झाले तरी साथीने हजारो-लाखो लोक मरत असतात हे वास्तव लक्षात ठेवले पाहिजे. जगाच चक्र हे असेच आहे.
0 Response to "साथीचे रोग व कोरोना"
टिप्पणी पोस्ट करा