-->
संपादकीय पान बुधवार दि. ९ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
आधारची महत्वाकांक्षी योजना सर्वांसाठी फायदेशीर
----------------------------
देशातील प्रत्येक नागरिकाला त्याची ओळख म्हणून एक क्रमांक देण्याची आधार ही योजना सरकारने सुरु केली. आता या योजनेतील पुढील टप्प्यात २०१६ सालापासून प्रत्येक आधार काडर्र्धारकाचे एक बँक खाते उघडून देण्याची योजना आखीत आहे. सध्या देशातील सुमारे ५० कोटी नागरिकांना आधार कार्डचे वाटप करण्यात आले आहे. देशातील सर्व नागरिकांना आधार कार्ड देण्याची प्रक्रिया ही २०१६ सालापर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. एकदा सर्व नागरिकांना आधार कार्डे दिली की ती बँक खात्याशी निगडीत केली जातील. ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की देशातील महत्वाचे वित्तीय खात्यांचे सार्वत्रिकरण पूर्ण होण्यास मदत होईल. अशा प्रकारे एकदा आधार कार्ड प्रत्येकाच्या बँक खात्याशी जोडले गेले की नो युवर कस्टमर ही सध्याची पध्दती त्याला जोडली जाणार आहे. यामुळे बँकेत जमा होणारा प्रत्येक पैसा हा प्राप्तिकर खात्याच्या नजरेत येईल. एखाद्याच्या खात्यात अचानक पैसे वाढले किंवा एखाद्याने पैसे अचानक काढले तर त्याचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाच्या वयाची १६ वर्षे झाल्यावर त्याच्या नावे बँकेत खाते उघडण्यात येईल. त्याचे कितीही उत्पन्न असो त्याचे बँकेत खाते हे असलेच पाहिजे याची दक्षता घेतली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत देशातील एकूणच बँकिंग पध्दतीत आमुलाग्र बदल येऊ घातले आहेत. बँकांचे खाते हे सार्वत्रिक झाल्यामुळे त्याला कोणत्याही बँकेतून पैसे काढण्याची वा भरण्याची सुविधा उपलब्ध होईल. पेमेन्ट बँक अशी बँकांचा एक नवीन प्रकार येऊ घातला आहे. रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार, पेमेन्ट बँका या ग्राहकाकडून पैसे स्वीकारणे, पैसे जमा करणे, मुदत ठेवी स्वीकारणे व अन्य गुंतवणुकीच्या योजना विकणे इत्यादी कामे करतील.सध्याच्या बँकांना या पेमेन्ट बँक स्थापन करण्यास परवानगी दिली जाईल किंवा काही नव्याने बँका यात उतरू शकतील. अशा प्रकारच्या बँक सेवेमुळे ग्रामीण भागातील लोकांची फार मोठी सोय होऊ शकते. त्याचबरोबर मोबाईल बँकींग सेवा ही देखील कशा प्रकारे विस्तारण्यात येईल त्याची आखणी केली जाणार आहे. मोबाईल बँकिंग ही आता काळाची गरज ठरली आहे. ग्रामीण भागातही आता मोबाईलमध्ये इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. अशा वेळी ही सेवा अधिक कार्यक्षमतेने कशी ग्राहकांपर्यंत पोहोचेल याची आखणी रिझर्व्ह बँक करीत आहे. आता बँकांनी एस.एम.एस. सेवेवर चार्ज आकारण्यास सुरुवात केली आहे. ट्रायशी बोलणी करुन या सेवा कमीतकमी मूल्यात ग्राहकांपर्यंत कशा पोहोचतील हे पाहिले जाणार आहे. आधार हे भविष्यात एक महत्वाचा दुवा म्हणून प्रत्येकासाठी काम करणार आहे. कोणतीही गोष्ट मग ती आर्थिक असो किंवा कोणतेही परवाने त्यासाठी आधार कार्ड महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ज्या सबसिडी सरकारतर्फे दिल्या जाणार आहेत त्यादेखील आधार कार्डाशी निगडीत जी बँक खाती आहेत त्यात जमा होतील. सध्या जरी हे सक्तीचे नसले तरी भविष्यात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आधार हाच पाया असेल. आधार खरोखरीच पूर्णपणे ज्यावेळी कार्यान्वित होईल त्यात सर्वांचाच फायदा असेल.
-------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel