-->
उच्च शिक्षणापर्यंत १० टक्केच विद्यार्थी पोहोचतात
आपल्या देशात शिक्षणाची गंगा गावोगावी पोहोचल्याचा दावा आपण करीत असलो तरीही अजूनही आपल्याकडे उच्च शिक्षणापर्यंत केवळ १० टक्केच मुले पोहोचतात. दिल्लीतील एका संस्थेने केलेल्या पाहणीत ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या संस्थेने विविध धर्म, जाती, विभाग यावर आधारित हा अहवाल तयार केला आहे. दक्षिणेतील दलित किंवा मुस्लिम यांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण हे उच्चवर्णीय हिंदूंपेक्षा चांगले आहे. तर बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतील उच्च शिक्षणाची स्थिती अतिशय दयनीय आहे. उच्च शिक्षणाचा विचार करता पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, चंदीगढ, हरियाणा, दिल्ली, जम्मू व काश्मीर या राज्यांतील एकूणच स्थिती अन्य राज्यांचा विचार करता समाधानकारक आहे. २२ ते ३५ वयोगटातील उत्तर भारतातील १५ टक्के, दक्षिण भागातील १३ टक्के विद्यार्थी हे उच्च शिक्षणात चांगली कामगिरी करतात. उत्तर-मध्य भागात १० टक्के मुले व ६ टक्के मुली तर उत्तर भागात ८ टक्के मुले व ४ टक्के मुली उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. दलित, आदिवासी या समाजातील केवळ १.८ टक्के जणच उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. मुस्लिमांमध्ये हेच प्रमाण जेमतेम २.१ टक्के भरते. ग्रामीण भागातील लोकसंख्येचा विचार करता केवळ दोन टक्केच मुले उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. त्या उलट, शहरातील हे प्रमाण १२ टक्के आहे. महाविद्यालयीन शिक्षणाचा विचार करता ६ टक्के मुले व केवळ ३ टक्के मुलीच हे शिक्षण घेऊ शकतात. उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेत मात्र एकूणच शिक्षणाची स्थिती चांगली असल्याने उच्च शिक्षण घेण्याबाबतही चांगले प्रमाण आहे. या विभागात हिंदू मागासवर्गीय विद्यार्थ्याचे तंत्रशिक्षण घेण्याचे प्रमाण २२ टक्के, तर मुस्लिमांमध्ये २५ टक्के आहे. दक्षिणेत अन्य समाज घटकात शिक्षणाचे प्रमाण याहून जास्त आहे. उत्तरपूर्व भारतात उच्च शिक्षण देणार्‍या संस्था फार कमी आहेत. त्यामुळे सर्वांना सरकारी शिक्षणावर अवलंबून राहावे लागते. खासगी शिक्षण संस्थांची फी जास्त असल्यामुळे अनेकांना सरकारी शिक्षणावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर अनेक मर्यादा येतात. आपल्याकडे उच्च शिक्षण हे इंग्रजीतच असल्यामुळे तेथे पोहोचण्यात अनेकदा त्यामुळे अडथळा येतो. त्यामुळे आपल्याकडे उच्च शिक्षणाचे जर प्रमाण वाढवायाचे असेल तर सर्वात प्रथम शाळेपासून इंग्रजी या विषयावर जास्त भर दिला गेला पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण घेत असताना, इंग्रजी ही जगाची भाषा असल्याने त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. जागतिक पातळीवर विचार करता आपल्याकडील उच्च शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. चीनमध्ये हे प्रमाण २२ टक्के तर अमेरिकेत २८ टक्के एवढे आहे. चीनमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण आता झपाट्याने वाढू लागले आहे. आपल्याकडे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढण्यासाठी इंग्रजीचा वापर वाढविण्याची गरज तर आहेच; शिवाय चांगल्या संस्था ग्रामीण भागात उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. सरकारनेदेखील उच्च शिक्षणासाठी खास स्कॉलरशिप मोठ्या संख्येने ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ज्या मुलांना पैशाअभावी शिक्षण घेता येत नाही, त्यांना या स्कॉलरशिपचा उपयोग होऊ शकतो. यासाठी पुढील पाच वर्षांसाठी सरकारला कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याची गरज आहे. आपल्यासारख्या मोठ्या देशात प्रत्येक गोष्ट काही सरकार करु शकत नाही. त्यामुळे काही प्रमाणात प्रामुख्याने उच्च शिक्षणासाठी खासगी शिक्षण संस्थाच उपयोगी पडू शकतात. परंतु हे करण्याची सरकारची इच्छा आहे का, हाच प्रश्‍न आहे.

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel