-->
संपादकीय पान सोमवार दि. ६ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
निरोपाची तयारी
---------------------------
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी तब्बल तीन वर्षांनी पत्रकारांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्यामागचा उद्देश हा आपण आता निरोपाची तयारी सुरु केली आहे, पुन्हा कॉँग्रेस काही सत्तेवर येणार नाही, हे सांगण्याचा केलेला प्रयत्न आहे. डॉ. मनमोहनसिंग हे आपली पंतप्रधानपदाची तब्बल दहा वर्षे पूर्ण करणार आहेत. याहून एवढी प्रदीर्घ कारर्किद फक्त पंडित जवाहरलाल नेहरु व इंदिरा गांंधी यांनाच लाभली आहे. त्यामुळे मनमोहनसिंग यांच्या दृष्टीने वैयक्तीक विचार करता हा एक विक्रमच असेल. बरे मनमोहनसिंग हे काही राजकारणी नाहीत. रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर आणि एक अर्थतज्ज्ञ. त्याहून वेगळ्या भाषेत बोलायचे तर ते जागतिक बँकेत काम केले एक अधिकारी. जागतिक बँकेचा अजेंडा राबविण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. ९१ सालापासून सुरु केलेल्या आर्थिक सुधारणा असोत किंवा त्यानंतर राबविलेले धोरण या सर्वांमागे जागतिक बँकेचे एजंट म्हणून त्यांनी काम केले. देशातील सर्वसामान्य माणूस डोळ्यापुढे ठेवून डॉ. सिंग यांनी काही आर्थिक सुधारणा केल्या नाहीत. म्हणूनच त्यांनी राबविलेल्या धोरणाचे परिणाम म्हणजे आपल्याला श्रीमंत अधिक श्रीमंत झाल्याचे व गरीबांची स्थिती आणखी खालावल्याचे दिसत आहेत. य्ु.पी.ए. दोन मधील म्हणजे गेल्या पाच वर्षात कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. पंतप्रधानांची वैयक्तीक प्रतिमा कितीही स्वच्छ असली तरीही सरकार अनेक घोटाळ्यांना सामोरे जात असताना पंतप्रधान स्वच्छ प्रतिमेचे कसे राहू शकतील. त्यामुळे गेल्या तीन वर्षात स्पेक्ट्रम, कोळसा, जमीनीचे घोटाळे जे झाले त्यांची जबाबदारी सरकारचे नेते म्हणून पंतप्रधान संबंधीत खात्यावर ढकलून स्वत मात्र स्वच्छ असल्याचा आव आणू शकत नाहीत. डॉ. मनमोहनसिंग हे राजकारणी नाहीत असे कितीही वेळा म्हणाले तरी त्यांनी इंडो-अमेरिकन जो अणू उर्जेचा करार केला हा पूर्णपणे राजकीय होता. अर्थात या करारानंतर डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला हे उत्तमच केले. नाही तर मोठा गाजावाजा करुन केलेल्या या काराराचे निष्पन्न काय झाले तर अजूनही पाच वर्षानंतर या क्षेत्रात एकही गुंतवणूक आलेली नाही. हे मनमोहनसिंग यांचे मोठे अपयश आहे. गेले दहा वर्षे सत्तेत राहिल्यावर मनमोहनसिंग यांना आता स्पष्टपणे दिसू लागले आहे की, आता कॉँग्रसेच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता येणार नाही. त्यामुळे त्यांनी आपण पुढील वेळी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही असे जाहीर केले आहे. जर सत्ताच येणार नाही तर कसले पंतप्रधानपद. आता नाही तरी त्यांचे वयही ८०च्या आसपास आल्याने कशाला त्रास घ्या. आपण सन्मानाने निवृत्त व्हावे आणि राहूल गांधींकडे पंतप्रधानपदासाठी बोट दाखवावे व आपण निवांत व्हावे, असा डॉ. सिंग यांचा विचार असावा. त्यादृष्टीनेच त्यांनी निरोपासाठी ही पत्रकारपरिषद घेतली असावी. कॉँग्रेसची सत्ताच येणार नसेल तरी राहूल गांधींचे नाव सुचवून आपण पुन्हा एकदा गांधी-नेहरु घराण्याशी आपली बांधिलकी टिकवू शकतो असा सिंग यांचा छुपा डाव आहे. डॉ. मनमोहनसिंग हे स्वभावाने शांत व संयमी आहेत. त्यांचे त्यांनी गेल्या दहा वर्षात त्यांच्या या स्वभावाचे दर्शन केलेच आहे. पंरतु त्यांच्या संयमी प्रवृत्तीचा गेल्या तीन वर्षात अंत झाला होता. कारण सरकारमधील अनेक भानगडी उघड होत होत्या तरी पंतप्रधान मात्र शांतच होते. कोणतेही विधान न करता चुप बसणे यातच त्यांनी अनेकदा धन्यता मानली. त्यामुळेच त्यांना मौनी बाबा अशी उपादी विरोधकांनी दिली. आज निरोपाच्या वेळी डॉ. सिंग हे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधीत आहेत. खरे तर मोदी यांच्यावरील गुजरात दंगलीचा जो डाग आहे त्यासंबंधी केंद्राने कायद्याची प्रकिया अधिक वेगाने पुढे न्यायला पाहिजे होती. यातून त्यांना ममोदी यांच्यातील धर्मांधपणा उघड करता आला असता. परंतु तसे न करता केवळ मोदींवर टीका करीत राहाणे ही शहाजोगपणा झाला. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रण उठविण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने काय केले असा सवाल उपस्थित होतो. केंद्रात सत्ता असल्याने ते मोदींना उघडे पाडू शकले असते. परंतु कॉँग्रसेने गेल्या वर्षात मोदींविरोधात प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे मोदींचा हा भस्मासूर कॉँग्रेसनेच वाढू दिला आहे हे विसरता येणार नाही. आता हाच भस्मासुर आपल्यावर उलटतो आहे हे नजरेत येताच हल्ला सुरु केला आहे. जनतेला हे सर्व समजून चुकले ाहे. त्यामुळेच जनतेने दिल्लीत आम आदमी पक्षाला मतदान करुन एक नवा पर्याय शोधला आहे. कॉँग्रेसच्या भविष्यातील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची बीजे ही यातच आहेत. गेल्या दहा वर्षात कॉँग्रेसने स्थिर सरकार जरुर दिले, मात्र हे सरकार कुचकामी होते. भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करणारे होते. अनेक घोटळ्यांनी या सरकारला घेरले होते आणि हे सर्व निपटण्यातच पंतप्रधानांची वेळ खर्च झाली. कोणतीही ठोस विकास कामे सरकारने केली नाहीत. जनतेचया स्मरणात राहिल अशा कोणत्याही योजना आखल्या नाहीत. अशा स्थितीत पराभव डोळ्यापुढे दिसत असताना पंतप्रधानांनी निरोपाची सुरुवात पत्रकार परिषदेच्या निमित्ताने केली आहे, असाच त्याचा अर्थ आहे.
-------------------------------------------------------    

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel