-->
संपादकीय पान सोमवार दि. ६ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
बॉलीवूडमधील नवीन शोले युग
------------------------
देशातील चित्रपटसृष्टी व्यवसाय म्हणून आकार घेण्याच्या अगोदर ज्या चित्रपटाने खर्‍या अर्थाने पंचवीस वर्षांपूर्वी व्यवसायाचे सर्व विक्रम मोडले त्या शोलेचा आता थ्रीडी अवतार प्रेक्षकांसाठी खुला झाला आहे. अर्थात सर्व चित्रपट हा जशाचा तसाच असेल फक्त त्याचे रुपांतर थ्रीडीमध्ये करण्यात आलेले असल्याने प्रेक्षकांना नवीन तंत्रज्ञानाने हा पहाता येईल. अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे गब्बरसिंगची गोळी तुमच्या अंगाला चाटून जाईल असा भास यात अनुभवता येईल. आता दुसरा प्रश्‍न उपस्थित होतो की, पूर्वी प्रेक्षकांनी शोलेला ज्या प्रेमाने उचलून धरले तसेच प्रेम या शोलेच्या नवीन अवताराला मिळणार आहे का? एकेकाळी मुंबईतील मिनर्व्हा थिएटरमध्ये तब्बल साडेपाच वर्षे (२८६ आठवडे) चाललेला आणि त्या काळी जवळपास १५ कोटी रुपये इतकी भरभक्कम कमाई केलेला, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सर्वार्थाने लोकप्रिय म्हणता येईल, असा रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले त्याकाळी ७० एम.एम.मध्ये होता. म्हणजे त्याकाळी हा चित्रपट अत्याधुनिक तंत्रज्ञानात तयार झाला होता. आता त्याच्याही पुढे जाऊन नवीन तंत्रज्ञानाची सांगड आता घालून प्रदर्शित झाला आहे. शोलेची कथा-पटकथा, पात्रे, दृश्ये, गाणी, संवाद, पार्श्वसंगीत, छायांकन सगळेच अजरामर आहे. अद्भुत चित्रपटानुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, हा बहुधा निर्मात्यांचा उद्देश आहे. तो सफल झाला, तर व्यावसायिक यशही आपसूक पदरात पडणार आहे.
बॉलीवूड हे बोलूनचालून प्रचारावर तगलेले क्षेत्र आहे. बदललेली आर्थिक गणिते, मल्टिप्लेक्स संस्कृतीचा उदय, मीडिया आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव या बाबी जमेस धरता येथे प्रचार केला तर मातीसुद्धा सोन्याच्या भावाने विकली जाते, नाही तर चोवीस कॅरेट सोन्याला मातीचीही किंमत येत नाही. या बदलत्या परिस्थितीत शोले नावाचे रुपेरी पडद्यावरचे अस्सल सोने थ्री-डी रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. तुम्ही नुसते ग्रेट असून चालत नाही; तर तुम्ही ग्रेट आहात, हे जगाला ओरडून सांगावे लागते. या तत्त्वावर विश्वास ठेवणा-यांचा हा काळ आहे. किंबहुना, हे वास्तव ओळखूनच बॉलीवूडने अलीकडच्या काळात आक्रमक प्रचारतंत्र विकसित केले आहे. काळानुरूप बॉलीवूडमध्ये असाही एक वर्ग आता उदयास आल्याचे संकेत मिळत आहेत, जो एकाधिकारशाही आणि दबावतंत्राच्या बळावर यशही विकत घेऊ पाहत आहे. बॉलीवूडची सर्वच गणिते काही वेगळी आहेत. यात यशाचा टप्पा कोण कधी गाठेल तर कधी कोण रस्त्यावर येईल हे सांगणे कठीण असते. येथे प्रत्येक टप्प्यावर अनेक चित्रपट यशस्वी झाले. यातील पहिला टप्पा होता तो शोलेचा. या शोलेपासून ते धूम तीन पर्यंत अनेकांनी आपली नशीने यात आजमावली. काळाच्या ओघात या चित्रपटसृष्टीचे स्वरुप बदलत गेले. एकेकाळी किती आठवडे चित्रपट चालला यावर त्याचे यश मोजले जात होते. आता यशाचा हा टप्पा पैशात गणला जातो. सध्याच्या काळात चित्रपटाचे आयुष्य हे जेमतेम चार ते आठ दिवस. त्यात जो जास्तीत जास्त व्यवसाय करील तो यशस्वी चित्रपट. सलमान खान या अभिनेत्याने तर यशाची एक फॅक्टरीच तयार केली आहे. तशी फॅक्टरी आपल्याकडे मराठीत दादा कोंडकेंची होती. दोन वर्षांपूर्वी पाकिजा हा चित्रपट रंगीत करुन प्रदर्शित झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी याकडे पूर्णपणे पाठ फिरविली होती. कारण पाकिजा हा रंगीत नव्हे तर ब्लॅक अँड व्हाईटमध्येच बघण्याची काही मजा और आहे असे प्रेक्षकांचे मत झाले. आता शोलेच्या बाबतीत काय होते हे पहायचे.
------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel