-->
संपादकीय पान मंगळवार दि. ८ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
बांगला देेशातील बेडगी लोकशाही
------------------------------
आपला शेजारी असलेल्या बांगला देशातील निवडणुकांचा अलीकडेच फार्स संपला. या निवडणुकांना फार्सच म्हणावे लागेल कारण या निवडणुकांवर प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याचे आवाहन जनतेला केले होते. या आवाहनाला जनतेने भरघोस पाठिंबा दिला आणि ३०० जागांपैकी १३० जागांवर सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अनेक ठिकाणी मतदान केंद्रे ओस पडली होती तसेच देशभर अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही झाल्या. यात सुमारे २० जण मरण पावले व अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर कब्जा मिळविला होता. याचा परिणाम म्हणून सत्ताधारी अवामी लिग हा पक्ष तीन चतृर्थ्यांश बहुमताने निवडून येण्याच्या वाटेवर आहे. बांगला देशातील ही सार्वत्रिक दहावी निवडणूक होती. २०११ साली बांगला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हंगामी पध्दत स्थापन करुन निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले होते. बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताचा मोलाचा हातभार लागला होता. या घटनेला आता ४२ वर्षे झाली आहेत तरीही या देशात लोकशाही काही रुजलेली नाही. सद्या देशात असलेल्या प्रमुख दोन पक्षात काही ताळमेळ नाही. हे पक्ष परस्परांची उणीदुणी काढण्यात गर्क असतात. ज्या देशापासून फुटून बांगला देशाची निर्मिती झाली त्या पाकिस्तानातही काही लोकशाही रुजलेली नाही. अगदी अलीकडेच पूर्ण पाच वर्षे एक सरकार टिकले. त्यापूर्वी पाकिस्तानात लोकशाही टिकते असे चित्र तयार होत असतानाच तेथे लष्कर आपल्या ताब्यात सरकार घेत असे. त्याउलट आपल्याकडे आहे. आपल्याकडे गेल्या ६६ वर्षात लोकशाहीची पाळेमुळे चांगलीच रुजली असून जी काही सत्तांतरे झाली ती मतपेट्यांच्या माध्यमातून झाली आहेत. उलट आपल्या या दोन शेजारी देशात सतत रक्तपात होऊन तेथील लोकशाहीला मारक वातावरण निर्माण झाले. या तेथील राज्यकर्त्यांचा दोष आहे. बांगला देशातील पंतप्रधान शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लिग व विरोधी पक्षनेत्या बेगम खलीदा झिया यांच्या बांगला देश नॅशनॅलिसस्ट पार्टी यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या लहान ११ पक्षांच्या समूहांना देशात शांतता नांदावी असे कधी वाटत नाही. निदान त्यादृष्टीने ते पक्ष कधी प्रयत्न करीत नाहीत. बांगला देशाचे माजी पंतप्रधान शेख मुजीब रहमान यांची हत्या झाली त्यावेळी त्यांची कन्या व विद्यमान पंतप्रधान शेख हसिना या भारतात होत्या त्यामुळे त्या बचावल्या. शेख हसीना यांना बांगला देश मुक्ती संग्रामात ज्यांनी पाकिस्तानी लष्कराला मदत केली त्यांना फासावर लटकाविल्याने तेथे तणाव निर्माण झाला होता. आज बांगला देशात असलेल्या पाक समर्थकांचे मत आहे की हसीना या भारताच्या बाजूने झुकलेल्या असतात. परंतु ही वस्तुस्थिती नाही. भारताने बांगला देशाच्या मुक्ती लढ्यात मोलाची भूमिका बजावलेली असल्याने व भारताचा या शेजारी देशावर वरचश्मा राहणे स्वाभाविक आहे. भारताला देखील या शेजार्‍याची चांगले संबंध ठेवावे लागणे यात काही चुकीचे नाही. कारण या दोन देशांमध्ये अनेक प्रश्‍न अद्याप अनिर्णित असल्याने भारताला अनेक प्रश्‍नांचा सामना करावा लागत आहे. यात प्रामुख्याने बांगला देशातील निर्वासितांचा प्रश्‍न तसेच पाणी वाटप हे कळीच प्रश्‍न ठरले आहेत. भारत हा आशिया खंडातील मोठा भाऊ असल्याने बांगला देशासारख्या लहान देशांची भूमिका भारताला पोषक असण्याची गरज आहे. यातूनच या भागात शांतता प्रस्थापित होणार आहे. मात्र त्या अगोदर बांगला देशात लोकशाही मार्गाने सरकार स्थापन झाले पाहिजे.
---------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel