-->
कोरोना आपल्या दारी

कोरोना आपल्या दारी

बुधवार दि. 04 मार्च 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
कोरोना आपल्या दारी
दिल्ली, हैदराबाद व जयपुरात कोरोना व्हायरसचा (कोव्हिड-19) प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने कोरोना आपल्या दारात आला आहे. दिल्लीतील हा रुग्ण इटलीहून तर हैदराबादचा रुग्ण दुबईहून परतला होता. तर जयपुरात आढळलेला रुग्ण इटलीचा नागरिक आहे. देशात सर्वात आधी केरळात संसर्गाची तीन प्रकरणे आढळली होती. ते तिघेही आता या आजारातून बरे झाले आहेत. चीन व जपानच्या क्रुझहून आणलेल्या भारतीयांना मानेसर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होतेे. सध्या देशातील 21 मोठ्या विमानतळांवर परदेशातून येणार्‍या प्रत्येक प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे. आजवर 5.57 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची चाचणी झाली आहे. तसेच 12 मोठ्या व 65 छोट्या बंदरांवरही नजर ठेवली जात आहे. हा रोग आता 66 देशात पसरला असून कोरोनाच्या बळींचा आकडा तीन हजारांवर गेला आहे. जगभरात 88 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाने ग्रस्त आहेत. मुंबईसारख्या महानगरात विशेष करुन खास हाय अलर्ट देण्यात आला असून विदेशातून आलेल्या प्रत्येकावर नजर ठेवली जात आहे. भारतीय नागरिकांनी चीन, इराण, कोरिया, सिंगापूर, इटली या देशात प्रवास टाळण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या आहेत. कोरोनामुळे जगभरातील व्यापारउदीम संकटात आला आहे. याचा जागतिक अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे. चीनमधून अनेक वस्तूंची निर्यात ठप्प झाली आहे. आता त्यामुळे अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. चीननिर्मित स्मार्टफोनची भारतात आता कमतरता भासत आहे. जगातील अनेक देशांत कोरोना विषाणू संसर्गाचा परिणाम फेब्रुवारीत भारतातील मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन काहीशा घटल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतीय माल उत्पादकांसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. जगातील अनेक देशांत या विषाणूच्या प्रभावामुळे निर्यात आणि पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. फेब्रुवारीमध्ये बेरोजगारी दर वाढून 7.78 टक्क्यावर पोहोचला आहे. हा जानेवारीतील 7.16 टक्क्याच्या तुलनेत 0.62 टक्के जास्त आहे. ऑक्टोबर 2019 नंतर चार महिन्यांत याची सर्वात उच्च पातळी आहे. 2019 च्या अखेरच्या तीन महिन्यांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर सहा वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. अहवालात नमूद केल्यानुसार, फेब्रुवारीमध्ये ग्रामीण क्षेत्रात कमीत कमी रोजगार मिळाले. यामुळे ग्रामीण क्षेत्रात बेरोजगारी दर जानेवारीच्या 5.97 टक्क्याच्या तुलनेत 7.37 टक्क्यावर पोहोचला आहे. असे असले तरी शहरी भागात बेरोजगारी दर घटला आहे. हा 9.70 टक्क्यांच्या तुलनेत 8.65 टक्के राहिला आहे. चीनमध्ये करोना व्हायरस सुरु झाल्याची बातमी 31 डिसेंबरला आली आणि त्याचे गांभीर्य फारसे कोणाला वाटले नाही. यापूर्वी आलेल्या सार्सप्रमाणेच हा संसंर्गजन्य रोग असावा व काही काळात आटोक्यात येईल असा अंदाज होता. परंतु आता दोन महिन्यानंतर हा रोग काही फारसा आटोक्यात येत नाही असेच दिसत आहे. चीनसह अनेक देश या रोगाशी दोन हात करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनशी असलेला जगाचा संपर्क जवळपास तुटल्यात जमा आहे. अनेक कंपन्यांचे उत्पादनाचे कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे चीनच्या अनेक औषध कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे, हे निमित्त काढून चीनवरच अवलंबून असलेल्या भारतीय औषध कंपन्यांनी किमती वाढवल्या. चीनकडून होणारा पुरवठा थांबल्यामुळे भारतात पॅरासिटामॉलच्या किमतींमध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. बॅक्टेरिया इंफेक्शनवर उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या अ‍ॅण्टीबायोटिक अ‍ॅझिथ्रोमायसिनची किंमत तर 70 टक्क्यांनी महागली आहे. हीच गत राहिल्यास येणार्‍या काळात औषधींच्या किमती आणखी वाढण्याची भीती आहे. एकाच देशातून आयात करण्याचे किती धोके आहेत हेच यावरुन आपल्याला स्पष्ट जाणवते. आपले गेल्या तीन वर्षांपासून चीनवर अनेक कच्च्या उत्पानाच्याबाबतीत विसंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. चीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने केवळ आपल्यालाच नाही तर जगाला फटका बसला आहे. कारण चीनची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर उत्पादन करुन जगात निर्यात करणारी आहे. त्यामुळे अगदी लहान मुलांची खेळणी असोत किंवा आयफोन चे उत्पादन असो जगात याचा तुटवडा आता भासू लागला आहे. येत्या महिन्याभरात जर चीनमधून निर्यात होण्यास प्रारंभ झाला नाही तर जगातील अनेक देशात अभूतपूर्व टंचाई होऊ शकते. मुंबईत सध्या सुरु असलेल्या कोस्टल रोडचेही काम रखडणार आहे, कारण त्याच्या बोगद्यांसाठी चीनी मशिनरी आयात होणार होती. आता ही मशिनरी येऊ शकत नाही. त्यामुळे हे काम देखील रखडणार आहे. अशा प्रकारे अनेक कामांना खीळ बसणार आहे. चीनने केवळ दहा दिवसात एक हजार बेडचे व त्यानंतर पुढील दहा दिवसात बाराशे बेडचे हॉस्पिटल उभे करुन चीनी लोक किती राक्षसी प्रकारे काम करु शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे तशाच प्रकारे या संसर्गाला आळा घालण्याचे काम सुरु आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी या कामी कोणत्याही देशाची सक्रिय मदत घेतलेली नाही. त्यामुळे चीन यावर मात करेल यात काही शंका नाही. परंतु ते कधी साध्य करतील हाच यक्ष प्रश्‍न आहे. कोरोनाचे हे अजून तरी जागतिक संकट नाही. परंतु त्याचा फैलाव तातडीने रोखण्याची गरज आहे, अन्यथा जगातील आरोग्य व्यवस्था धोक्यात येऊ शकेल.
-------------------------------------------------------

0 Response to "कोरोना आपल्या दारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel