-->
संपादकीय पान बुधवार दि. १६ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
तळकोकणातील धुमशान
-------------------------
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची कॉँग्रेसबरोबर सत्तेसाठी आघाडी असली तरी त्यांचा मुख्य शत्रू विचाराल तर भाजपाच्या नेतृत्वाखालील युती नव्हे तर कॉँग्रेसच आहे. या विधानामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्काही बसेल परंतु सध्या राष्ट्रवादीच्या ज्या काही राजकीय हालचाली सुरु आहेत ते पाहता हे विधान खरे ठरेल. सध्या तळकोकणात म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जे काही घसामान सुरु आहे ते पाहता तेथील राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पहिला शत्रू हा शिवसेनेचा उमेदवार नसून कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. निलेश राणे हेच आहेत. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र डॉ. निलेश राणे यांना पहिल्या टप्प्यात कॉँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यापासून ही धुसफूस सुरु झाली होती. नारायण राणेंच्या आक्रमक स्वभावाला आवर घालायचा असेल तर हीच वेळ आहे असे गणित आखून जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध सुरु केला. आता मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले असतानाही या परिस्थितीत काहीच फरक न पडल्याने राणे यांची सीट धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांना निवडणुकीच्या तोंडावर राणेंच्या विरोधात बळ येण्याचे कारण काय असा प्रश्‍न उपस्थित होतो. याचा अर्थ स्पष्ट आहे त्यांना शरद पवारांचे आशिर्वाद आतून लाभले आहेत. राणेंची गुंडगिरी जिल्ह्यात आहे असे आपण केसरकरांच्या विधानावर विश्‍वास ठेऊ, परंतु ही गुंडगिरी त्यांनी यापूर्वी का दिसली नाही. एैन निवडणुकीच्या तोंडावर का दिसली, याचे उत्तर केसरकरांकडे नाही. परंतु शरदरावांकडे मात्र आहे. कारण शरद पवारांना कॉँग्रेसचे उमेदवार यावेळी जास्तीत जास्त प्रमाणात पाडायचे आहेत आणि त्यांनी तशी राज्यात व्यूहरचना उभारली आहे. त्याचाच एक अंक सिंधुदुर्गात सुरु आहे. आपण खरोखरीच डॉ. राणेंच्या मागे उभे आहोत व ही पक्षातील बंडखोरी आपल्याला पसंत नाही, हे पटवून देण्यासाठी शरद पवार व अजित पवार हे कणकवलीला येऊन गेले व त्यांनी तेथे सभा घेतल्या. शरद पवारसाहेबांनी कणकवलीच्या जाहीर सभेत आमच्या जिल्ह नेतृत्वाला अवदसा आठवली आहे असे ठणकावून सांगितले. डॉ. निलेश राणे यांच्या मागे आपण सर्वांनी राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले. शरद पवारांची एक ख्याती आहे की, पवार जे काही बोलतात त्याच्या विरोधात नेमके त्यांच्या पोटात असते. सिंधुदर्गाबाबतही असेच झालेले आहे. केसरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचे नाटक केले. जिल्ह्याच्या नेतेपदी नवीन नेता निवडला गेला. परंतु निवडणुका झाल्यावर काही काळाने याच केसरकरांवरील कारवाई मागे घेतली जाईल व त्यांना सन्मानाने पुन्हा पक्षात घेण्याचे काम शरदराव करतील. कारण राणेंच्या चिरंजीवांना पाडणे हे पवारसाहेबांचे सध्याचे उदिष्ट आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या जिल्हा पक्ष कार्यालयाला ताळे लावण्याचीही तयारी दाखविली. निलेश राणे हे जर पडले तर उत्तमच झाले, नाही पडले तर केसरकर बघून घेतील अशी भूमिका पवारांची आहे. केसरकर आपलेच आहेत, पुढे काही काळाने त्यांना पक्षात घेऊच, असे डील पवारसाहेबांचे व केसरकरांचे झाले असण्याची शक्यता जास्त आहे. परंतु तळकोकणातील या धुमशानचे पडसाद शेजारच्या रायगड मतदारसंघात उमटणार आहेत. कारण राष्ट्रवादी जर तळकोकणात आपल्या उमेदवाराला जर मदत करीत नाही तर शेजारच्याच मतदारसंघात कॉँग्रेसने राष्ट्रवादीला मदत का करावी असा प्रश्‍न उपस्थित होतो. रायगड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे हे सुरुवातीपासूनच अडचणीत आले आहेत. एकतर बॅ. अंतुले यांनी जिल्ह्यातील भ्रष्टाचारी तटकरेंना घरी बसविण्यासाठी त्यांच्या उमेदवारीला विरोध करुन शेकापच्या रमेश कदम यांना पाठिंबा दिला. अंतुलेंनी हा पाठिंबा मागे घ्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील अंतुलेंचे उंबरठे झिजवावे लागले. परंतु आपल्या निर्णयावर अंतुले ठाम राहिले आहेत. कारण अंतुले हे शरद पवारांसारखे नाहीत. एकदा अंतुलेसाहेबांनी शब्द दिला की त्याला ते शेवटपर्यंत जागणार्‍यातले आहेत. पवारांसारखे ओठात एक पोटात दुसरे अशी त्यांची भूमिका कधीच नसते. तसेच रायगड मतदारसंघात तटकरे यांनी गेल्या पंधरा वर्षात कॉँग्रेसजनांना मोठ्या प्रमाणात दुखावले आहे. त्याच्या विकास कामांच्या प्रस्तावांना हरताळ फासला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तटकरे यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच सिंधुदुर्गातील आमच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात तुम्ही काम करता तर रायगडात आम्ही त्याचे उट्टे काढू असा कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार योग्यच म्हटला पाहिजे. म्हणजे पवारसाहेब कॉँग्रेसच्या एका उमेदवाराला पाडण्यासाठी आपल्या रायगडातील उमेदवाराचा पराभव सहन करण्याच्या तयारीत आहेत. नाही तरी त्यांनी रायगडच्या जागेसाठी तटकरे यांना उभे करुन एक मोठा जुगार खेळला आहे. कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे की तटकरे हे लोकसभेला पाठविण्यासाठी काही योग्य उमेदवार नाहीत. कॉँग्रसेच्या ताब्यात असलेला व अंतुलेंनी विकसीत केलेला मतदारसंघ आपल्या ताब्यात येत असेल तर चांगलेच आहे. अगदी यावेळी ही सीट लागली नाही तरी आपला या मतदारसंघावरचा दावा तरी यापुढे कायम राहतो, असा विचार पवारांनी केला आहे. त्यामुळे पवारांनाही तटकरे पडणार आहेत याची पूर्ण कल्पना आहे, परंतु कॉँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात आपण प्रवेश केला व आज सीट पडली तरी पुढील काळातही आपल्याच ताब्यात राहाणार, यात समाधान आहे. कारण वर म्हटल्याप्रमाणे पवारांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू हा कॉँग्रेस आहे.
------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel