-->
संपादकीय पान बुधवार दि. १६ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
वाहन उद्योग रिव्हर्स गीअरमध्ये
------------------------------------
व्यवस्थापनातील हिंसक संघर्ष, स्थानिक बाजारपेठेतील कमी मागणी, वाढते इंधन दर, अखेरच्या क्षणी मिळालेला उत्पादन शुल्क कपातीचा दिलासा आणि अपरिचित जागेवरील आंतरराष्ट्रीय वाहन प्रदर्शन असा घटनाक्रम अनुभवणार्‍या भारतीय वाहन उद्योगाचे सलग दुसरे आर्थिक वर्ष घसरणीत गेले आहे. या कालावधीत ४.६५ टक्के प्रवासी वाहन विक्री रोडावली असतानाच उद्योगाने सुमारे १.५ लाख रोजगारही हातातून जाताना पाहिले आहेत. आर्थिक वर्ष २०१३-१४ मधील वाहन उद्योगाचा घसरता प्रवास अधोरेखित करणारी वाहन विक्रीची आकडेवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सने (सियाम) जाहीर केली. गंभीर बाब म्हणजे या उद्योगातील रोजगाराला तब्बल १.५ लाखांची ओहोटी लागली आहे. ही चिंताजनक बाब बनली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी म्हटले आहे. स्थानिक पातळीवरील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेपोटी वाहन उद्योगाला असलेल्या कमी मागणीने तसेच सतत वाढत्या इंधन दरानेही एकूणच चिंता निर्माण केली. आर्थिक वर्षअखेरच्या टप्प्यात वाहनांवरील उत्पादन शुल्कात सरकारने केलेली कपात आणि नोएडातील आंतरराष्ट्रीय वाहन प्रदर्शनानेही फारसे काही या उद्योगाला तारले नाही. उलट वर्षांच्या सुरुवातीचा मारुती सुझुकीतील हिंसक कामगार - व्यवस्थापन संघर्ष ते अगदी वर्ष संपताना उद्भवलेला टोयोटाच्या दक्षिणेतील प्रकल्पातील कामगार तिढा याची भर पडली. एकूणच २०१३-१४ मध्ये प्रवासी कार विक्री ४.६५ टक्यांनी घसरून १७.८६ लाख झाली. आधीच्या आर्थिक वर्षांतही ती तब्बल ६.६९ टक्यांंनी कमी झाली होती. गेल्या आर्थिक वर्षांत देशातील एकूण वाहन विक्री मात्र किरकोळ, ३.५३ टक्यांंनी वाढून १.८४ कोटी झाली आहे. तर दुचाकींमध्येही ७.३१ टक्के वाढ राखली गेली आहे. यामध्ये मोटरसायकलची विक्री ३.९१ टक्यांनी, तर स्कूटरची विक्री तब्बल २३.२४ टक्यांंनी उंचावली आहे. वाणिज्य वाहन विक्रीदेखील २०.२३ टक्यांंनी घसरली आहे. निर्यात मात्र ७.२१ टक्यांंनी वाढून ३१.०७ लाख झाली आहे. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे गेल्या आर्थिक वर्षांत वाहन उद्योगाला निराशा अनुभवयाला मिळाली. नव्या सरकारकडून उत्पादन शुल्कात आणखी कपात चालू आर्थिक वर्षांतही सुरू ठेवली जाईल, अशी अपेक्षा आहे. विविध वाहन कंपन्यांकडून भविष्यात ३५ नवीन वाहने बाजारात दाखल होत असून, त्यासाठी २० हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक आणि आनुषंगिक रोजगार संधींची शक्यता ही देशाचा आर्थिक विकास दर ७ ते ८ टक्यांंच्या पुढे गेला तरच वास्तवात येईल. हा उद्योग तरण्यासाठी हीच पूर्वअट आहे. नेहमीच मंदीच्या झळा हा वाहन उद्योगाला सर्वात प्रथम बसतात. त्यानुसार आपल्याकडे गेले तीन वर्षे वाहन उद्योग अर्थव्यवस्था मंदावल्याने संकटात आला आहे. आपल्याकडे मात्र वाहन उद्योगाबाबत कसलेही नियोजन झाले नाही. फक्त आपल्याकडे विदेशी वाहन उत्पादन कंपन्या बाजारात आल्या आणि आपण त्याचे स्वागत केले. परंतु देशात त्या प्रमाणात रस्ते व्हायला पाहिजे होते ते काही झाले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर उदंड जाहल्या मोटारी असे चित्र होते. आपल्याकडे गेल्या दहा वर्षात मध्यमवर्गीयांची संख्या झपाट्याने वाढली. मोटारींचा हाच मोठा खरेदीदार होता. आपल्या दारात एक वाहन असावी असे स्वप्न उराशी बाळगणार्‍या या वर्गाने त्याची क्रयशक्ती थोडीशी वाढल्यावर पहिली गोष्ट केली ती म्हणजे वाहन खरेदी केली. त्यासाठी कर्ज द्यायला बँका तयार होत्याच. रस्ते भले त्या प्रमाणात वाढले नाहीत मात्र मध्यमवर्गीयाने आपली हौस भागवून घेण्यासाठी मोटारी घेतल्या आणि हा उद्योग झपाट्याने विस्तारला. आता हा उद्योग मंदीमुळे रिर्व्हस गिअरमध्ये गेला आहे. जोयपर्यंत मंंदीदूर होणार नाही तो पर्यंत हा गिअर कायम असेल.
-----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel