-->
अनुभव 
पर्यटकांचे आदरातिथ्य 
प्रसाद केरकर
Published on 27 Mar-2012 EDIT PAGE
ही आठवण आहे जवळपास दीड वर्षापूर्वीची. 'वर्ल्ड ट्रॅव्हल शो 'ला उपस्थित राहण्यासाठी मी लंडनला गेलो होतो. त्या वेळी मी व माझ्या मित्राने लंडन शहर पाहण्यासाठी म्हणून एक दिवसाच्या सिटी टूरचे तिकीट काढले होते. ठरलेल्या वेळेनुसार आम्ही दोघे सिटी टूरची बस जिकडे येणार होती तिकडे पोहोचलो. तेवढय़ात बस आली आणि आम्ही आमचे तिकीट दाखवून घाईघाईने बसमध्ये बसलो. अर्धा तास झाल्यावर बसमधील गाइड आम्हाला शोधत आला. आपण चुकीच्या बसमध्ये बसला आहात. 'आपले बुकिंग असलेली बस पुढे गेली असून आपण ज्या जागेवर बसला आहात, तिकडे आता दुसरे प्रवासी येतील,' असे तो म्हणाला. त्यावर आम्ही त्याला सांगितले, आम्ही बसमध्ये चढत असताना आपण आमचे तिकीट तपासले होते. मग त्या वेळी आम्हाला का नाही सांगितलेत? त्यामुळे चूक तुमची आहे. आम्ही या शहरात नवीन आहोत. विदेशी पर्यटक आहोत. आम्हाला लंडन शहराची विशेष माहितीदेखील नाही. आता आम्ही कसे जावे, असा सवाल आम्ही त्याला केला. त्यावर त्या गाइडने आमचे तिकीट असलेल्या बसमधील गाइडशी संपर्क साधला आणि वस्तुस्थिती सांगितली. दोन्ही बसमधील गाइडचे परस्परांशी बोलणे झाल्यावर आमच्या बसमधील गाइड आम्हाला म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका. यात आपली काही चूक नाही. तो गाइड आमच्याबरोबर बसमधून खाली उतरला आणि त्याने आम्हाला टॅक्सी करून दिली. त्या टॅक्सीवाल्याला योग्य त्या सूचना दिल्या. आम्हाला कोणत्या बसमध्ये सोडावयाचे ते सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टॅक्सीवाल्याला विचारून आमचे भाडे आगाऊ दिले. टॅक्सीवाल्याने आम्हाला योग्य त्या ठिकाणी सोडले, तिकडे उभ्या असलेल्या गाइडच्या हवाली आम्हाला केले आणि मगच आमचा निरोप घेतला. लंडनमधील या आदरातिथ्याने आम्ही भारावून गेलो. अशा प्रकारचे आदरातिथ्य आपल्या देशात पर्यटकांना मिळेल का, असा प्रश्न मात्र माझ्या मनात सतत घोळत होता. 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel