-->
प्रवासीसेवाचा 'सहकारी वाटसरू' 
Published on 26 Mar-2012 ARTHPRAVA
प्रसाद केरकर, मुंबई
वाहतूक क्षेत्र म्हटले की प्रामुख्याने खासगी उद्योगातील कंपन्या आणि त्यांच्या चकाचक बस डोळ्यांपुढे येतात. प्रवासीदेखील या खासगी क्षेत्रातील बसेसचे नेहमीच गुणगान गात असतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारी क्षेत्रातील बसेसची अतिशय वाईट स्थिती असते आणि त्यांची सेवादेखील प्रवाशांनी नाके मुरडावीत अशीच असते; परंतु खासगी बसना पर्याय ठरेल असा सहकार क्षेत्रातील एक अनोखा प्रयोग कर्नाटकातील दक्षिण भागात राबविला गेला आहे. देशातील अनेक भागांत सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत असताना सहकारातील हा प्रयोग अतिशय चांगला यशस्वी ठरला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बसचालक आणि वाहक यांनी सहकार क्षेत्रात आपण काही चांगले काम करून प्रवाशांना चांगली सेवा देऊ शकतो हे दाखवून दिले आहे. 
शंकर ट्रान्सपोर्ट कंपनीची (प्रा.) लि. या कंपनीची स्थापना 1957 मध्ये एम.एस. देवेगौडा यांनी केली होती. ऐंशीच्या दशकात या कंपनीची मालकी अरूर कुटुंबीयांकडे आली; परंतु ही कंपनी डबघाईला आली आणि ही बस सेवा बंद पडण्याच्या स्थितीत आली. मात्र, येथील कामगारांनी सहकारी संस्था स्थापून 1991 मध्ये ही बस सेवा आपल्या ताब्यात घेतली. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता. यात कितपत यश लाभेल अशी शंका वाटत होती. मात्र, मोठय़ा कार्यक्षमतेने ही कंपनी चालली आहे आणि नफादेखील कमवत आहे. कर्नाटकातील चिकमगळूरसह चार जिल्ह्यांत ही बस सेवा कार्यरत असून त्यांचे मुख्यालय कोप्पा येथे आहे. ट्रान्सपोर्ट को-ऑप. सोसायटी लि. ही देशातील प्रवासी वाहतूक करणारी एकमेव संस्था आहे. आता या सोसायटीची वार्षिक उलाढाल सुमारे 18 कोटी रुपये असून 76 बसचा ताफा त्यांच्याकडे आहे. त्यांचे असलेले 256 कर्मचारी या सोसायटीचे सदस्य आहेत, म्हणजेच वेगळ्या भाषेत बोलायचे तर ते या कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या हिरव्या आणि पांढर्‍या रंगविलेल्या बस आता ग्रामीण भागातील लोकांसाठी प्रवासाचे एक मोठे साधन ठरले आहे. या संस्थेच्या बस सुमारे 63 मार्गांवर चालतात. एखादी बस अचानक बिघडल्यास त्याजागी तातडीने बस पाठविण्यासाठी खास स्वतंत्र बसेस ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना चांगली सेवा देता यावी यासाठी बस नेहमी स्वच्छ ठेवण्याकडे कर्मचार्‍यांचा कल असतो. गेल्या 12 वर्षांत ही संस्था टप्प्याटप्प्याने वाढली. आता एकूण 64 मार्गांवर चालणार्‍या या बसेस दररोज 2594 कि.मी. अंतर चालतात. 97 मध्ये त्यांची उलाढाल केवळ 97 लाख रुपये होती ती आता 18 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सेवेने ग्रामीण भागातून आपली सेवा औद्योगिक पट्टय़ात पुरवली असल्याने येथील लोकांची मोठी सोय होते. या संस्थेच्या संचालकपदी एकूण 15 जण असून येथील कर्मचार्‍यांच्या कामाच्या स्वरूपानुसार चार वर्ग पाडण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना सदस्यत्व मिळते. दर पाच वर्षांनी निवडणूक होऊन नवीन संचालक निवडले जातात. अशा प्रकारे कामगारांच्या सहकारी संस्थेने प्रवासी वाहतुकीसारख्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवणे ही वाखाणण्याजोगी बाब आहे. अशा प्रकारची ही पहिलीच सोसायटी आहे. यापूर्वी कामगारांनी सहकारी संस्था स्थापन करून कंपनीचा कारभार केला. मात्र, त्यात त्यांना फारच कमी यश आले. इकडे मात्र हा प्रयोग पूर्णत: यशस्वी ठरला आहे. 
prasadkerkar73@gmail.com 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel