संपूर्ण युरोप एका मोठ्या आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जाईल असे चित्र आहे. त्यामुळे सध्याच्या काळात तेथील कंपन्यांचे मूल्य घसरले आहे. याचा फायदा उठवत भारतीय कंपन्यांनी संकटात सापडलेल्या या कंपन्या आपल्या खिशात घालायला सुरुवात केली आहे. जर्मनीतील कंपन्या ताब्यात घेण्याकडे भारतीय कंपन्यांचा जास्त कल आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी भारताची जर्मनीतील थेट विदेशी गुंतवणूक तब्बल 4.5 अब्ज युरो एवढी झाली आहे. 2008 मधील मंदीपासून भारतीय कंपन्यांनी युरोपातील कंपन्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. मदर्सन सुम्यी सिस्टिम या कंपनीने ‘पिग्युफॉर्म’ ही जर्मन कंपनी गेल्या वर्षी ताब्यात घेतली. औरंगाबादच्या ‘व्हेरॉक’ या कंपनीने ट्रीओम या कंपनीतील 80 टक्के भांडवल आपल्या ताब्यात घेतले. ही कंपनी दुचाकी वाहनांना लागणा-या लाइट्सचे उत्पादन करते. जेबीएम समूहाने इटालियन अभियांत्रिकी सेवा कंपनी ‘टेस्को स्पा’ ताब्यात घेतली. कोलकात्यातील ‘डनलॉप’ समूहाचे प्रवर्तक रुइया यांनी गेल्या तीन वर्षांत बºयाच कंपन्या ताब्यात घेतल्या. गेल्याच वर्षी त्यांनी ब्रिटनमधील मेटझेलर ऑटोमोटिव्ह ही कंपनी ताब्यात घेतली. वाहन उद्योगातील तीन मोठ्या युरोपीय कंपन्या त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. रुइया यांनी आणखी कोणत्या कंपन्या आपल्या समूहाचा भाग करता येतील त्याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. 2008 च्या आर्थिक संकटापूर्वीच बजाज आॅटोने आॅस्ट्रियाच्या केटीएम या स्पोर्ट्स बाइकच्या कंपनीत अल्प भांडवल खरेदी केली होती. नंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी हे भांडवल वाढवून 40 टक्क्यांवर नेले. नजीकच्या काळात बजाज आॅटो या कंपनीतील भांडवल 50 टक्क्यांच्या जवळ नेईल. या कंपनीत भांडवली गुंतवणूक केल्याने बजाज आॅटोला दुचाकीचे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आणि त्याचबरोबर युरोपीय बाजारपेठेचे दरवाजे खुले झाले. 2010 मध्ये भारतीय वाहन कंपन्यांनी विदेशात पाच कंपन्या ताब्यात घेतल्या आणि त्यासाठी त्यांनी 57 दशलक्ष युरो खर्च केले. मात्र त्यापुढच्याच वर्षी सात कंपन्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय कंपन्यांनी 399 दशलक्ष डॉलर खर्च केले. भारतीय कंपन्यांनी युरोपीय कंपन्या ताब्यात घेण्यामागे मुख्य कारण आहे ते तंत्रज्ञान मिळवणे. युरोपातील या कंपन्यांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि या कंपन्यांत भांडवली वाटा मिळाल्याशिवाय हे तंत्रज्ञान उपलब्ध होणे कठीण असते. अनेक उद्योगांसाठी लागणारे तंत्रज्ञान े युरोपात आणि त्यापेक्षाही जर्मनीत अत्याधुनिक असते. भारतीय कंपन्यांनी मागच्या दशकात हे तंत्रज्ञान खरेदी करण्याचा प्रयत्न केला असता तर ते त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडलेही नसते. परंतु आता मंदीच्या वातावरणात हे तंत्रज्ञान त्यांना स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. कोलकात्यातील ‘टिटागढ वॅगन’ या कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवण्यासाठी फ्रान्समधील वाघिणी निर्मिती क्षेत्रातील कंपनी ‘एएफआर’ यामध्ये भांडवली हिस्सा मिळवला.
वाहनांचे सुटे भाग निर्मितीच्या कंपन्या जशा भारतीय कंपन्यांनी टेकओव्हर टार्गेट केल्या आहेत, तशा युरोपातल्या अनेक लहान व मध्यम आकारातील टायर निर्मिती कंपन्या मोठ्या आर्थिक संकटात आहेत. या कंपन्या भारतीय कंपन्याच आपल्या ताब्यात घेतील असे चित्र आहे. ‘अपोलो टायर्स’ने 2009 मध्ये एक डच कंपनी ताब्यात घेतली आहेच. सध्या युरोपातील संकटामुळे अडचणीत आलेल्या कंपन्या भारतीय ताब्यात घेऊन त्यांचा संपूर्ण प्रकल्प व मशिनरी भारतात हलवू शकतात किंवा हे प्रकल्प पूर्व युरोपात हलवू शकतात. कारण पूर्व युरोपात कमी खर्चात कंपनी चालवता येऊ शकते. सध्या युरोपातील लहान व मध्यम आकारातील कंपन्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र सध्या तरी मोठ्या कंपन्या ताब्यात घेतल्या जात नाहीत. परंतु कालांतराने मोठ्याही कंपन्या भारतीय कंपन्यांच्या जाळ्यात येतील हे नक्की. ‘अर्सेनल’ किंवा ‘कोरस’ या अवाढव्य कंपन्यांचे टेकओव्हर नेहमीच शक्य नसते. त्यामुळे सध्या तरी भारतीय कंपन्यांनी छोट्या व मध्यम आकारातील कंपन्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे. भारतीय रुपयांत सुमारे 100 ते 200 कोटी रुपयांच्या किमती असलेल्या कंपन्या जास्त प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. अर्थात, विदेशातल्या कंपन्या ताब्यात घेणे एक वेळ सोपे आहे, मात्र त्या चालवणे सोपे नाही. एक महत्त्वाची बाब म्हणजे युरोपात कामगार संघटना मजबूत आहेत आणि दुसरे म्हणजे तेथील कामगारांचे पगारही मोठे आहेत. याचा ताळमेळ घालून उद्योग करणे ही सोपी बाब नाही. कोलकात्याच्या पवनकुमार गोएंका यांच्या समूहाने फ्रान्समध्ये एक कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कामगार संघटनांनी विरोध केल्याने त्यांना ही कंपनी ताब्यात घेता आली नाही.
युरोपातली कंपनी स्वस्तात मिळते म्हणून घेतली तरी तिच्या आधुनिकीकरणासाठी भविष्यात खर्च करणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे अनेक भारतीय कंपन्यांकडे या कंपन्या खरेदी करण्यासाठी पैसा असला तरीही त्यांचे धारिष्ट होत नाही. मात्र आपल्याकडील मध्यम आकारातील कंपन्यांनी युरोपातील कंपन्या खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. युरोपचे दिवाळे निघण्याची स्थिती असली तरी भारतीय कंपन्यांसाठी मात्र दिवाळी सुरू झाली आहे! prasadkerkar73@gmail.com
0 Response to "युरोपचे दिवाळे, भारतीय कंपन्यांची दिवाळी"
0 Response to "युरोपचे दिवाळे, भारतीय कंपन्यांची दिवाळी"
टिप्पणी पोस्ट करा