-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १८ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची मोहोर
----------------------------------------------
६१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपट व कलाकारांची मोहर उमटली आहे. उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आनंद गांधी यांचा पहिलाच चित्रपट शिप ऑफ थीससला मिळाला आहे, तर भाग मिल्खा भाग या चित्रपटाला उत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट पहिल्या चित्रपटाचा इंदिरा गांधी पुरस्कार फँड्री या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना मिळाला असून, याच चित्रपटातील कलाकार सोमनाथ अवघडे याला उत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला. शिप ऑफ थीसस या चित्रपटात स्वत:ची प्रतिमा, श्रद्धा व मृत्यू यांचे उत्कृष्ट चित्रण करण्यात आले आहे, असे पुरस्कारासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे. अस्तू या मराठी चित्रपटासाठी अमृता सुभाषला उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला असून, शिप ऑफ थीससचे कलाकार आयदा एल. कासेफ यांनाही हा पुरस्कार मिळाला. बाल कलाकाराचा पुरस्कार विभागून देण्यात आला असून, थांगा मिन्गल या तामिळ चित्रपटाची कलाकार साधना हिलाही हा पुरस्कार मिळाला. सामाजिक विषयावरील उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तुहा धर्म कोनचा? या मराठी चित्रपटाला मिळाला. याच चित्रपटातील खरा कुरा या गीतासाठी मराठी गायिका बेला शेंडेला उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला आहे. निशिथा जैन दिग्दर्शित गुलाबी गँगला उत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. मिल्खा सिंग यांच्यावर आधारित असणार्‍या भाग मिल्खा भाग चित्रपटाला उत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, फरहान अख्तर याने प्रमुख भूमिका केली आहे. शहीद चित्रपटाचे दिग्दर्शक हन्सल मेहता यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, तर या चित्रपटाचे नायक राजकुमार राव याना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही विभागून देण्यात आला असून, मल्याळम चित्रपट पेरीयाथावूर चित्रपटाचे कलाकार सूरज वेनजारामुडू हेही पुरस्काराचे मानकरी आहेत. हिंदी चित्रपट लायर्स डाइस चित्रपटाची नायिका गीतांजली थापा यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जॉली एलएलबी चित्रपटाचे कलाकार सौरभ शुक्ला यांना मिळाला असून, उत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कारही जॉली एलएलबीने पटकावला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली ११ सदस्यीय ज्युरींनी पुरस्कारांची निवड केली. गेल्या चार पाच वर्षात मराठी चित्रपट चाकोरीतून बाहेर पडला आणि विविध विषयाचे चित्रपट तयार होऊ लागले आहेत. त्याची दखल आता खर्‍या अर्थाने देशपातळीवर घेण्यात आली आहे. त्यापूर्वी मराठी चित्रपट तमाशा व पाटिलकी यांच्यात गुरफटला गेला होता. परंतु ही चौकट मोडून अनेक विषयाला वाहिलेले मराठी चित्रपट निघू लागले. त्यामुळे पारंपारिक शहरी मराठी प्रेक्षक जो कंटाळला होता तो पुन्हा एका मराठी चित्रपट पाहाण्यासाठी थिएटरमध्ये परतला. प्रेक्षकांनी या बदलत्या मराठी चित्रपटांचे जोरदार स्वागत केले. त्यामुळेच केवळ लाखात खेळणारे मराठी चित्रपट करोडोंची उलाढाल करु लागले. परिणामी मराठी चित्रपट व्यवसायिकदृष्ट्या यशस्वी झाल्याने त्याची दखल आता खर्‍या अर्थाने दक्षिण भारतातील चित्रपटांप्रमाणे देशपातळीवर घेण्यात येऊ लागली आहे. मराठी चित्रपटांच्या व्यवसायिक यशापेक्षा हे यश मोठे ठरावे. दक्षिणेतील चित्रपटांचे अनुकरण हिंदी चित्रपट करतात त्याप्रमाणे मराठी चित्रपटांवरुन हिंदी चित्रपट बेतले जाऊ लागले हे आपल्याला आलेले मोठे यश आहे. मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळल्याच्या घटनेचे स्वागत करीत असताना आपले मराठी चित्रपट देशपातळीवर पोहोचले हा मोठा गौरव ठरावा.
------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel