-->
संपादकीय पान सोमवार दि. २१ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
राजकीय धमक्या आणि धमक्यांचे राजकारण
----------------------------------
सध्या निवडणुकीच्या काळात राजकारण आता इरेला पेटले आहे. अनेक राजकीय नेते आपण वेळोवेळी केलेल्या जनहितांच्या कामाचे भांडवल करुन त्याबदल्यात आता मते द्या अशी धमकीची भाषा करीत आहेत. आम्ही तुमची तुम्हाला गरज असताना कामे केली, आता आम्हाला तुमच्या मतांची गरज आहे असे सांगत मतांची मागणी करण्यासाठी, कधी प्रेमाने तर कधी धमकी देत मते मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बारामती जवळील मासाळवाडी गावातील मतदारांना राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जर विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांना मतदान न केल्यास गावचे पाणी कापून टाकेन, अशी गावकर्‍यांना धमकी दिल्याने ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार सुरेश खोपडे यांनी याबाबतचा व्हिडीओ पोलीस ठाण्यात सादर केल्यावर निवडणूक अधिकार्‍यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंबंधीचा अहवाल लवकरच सादर केला जाणार असून त्यानंतर नेमकी कोणती कारवाई होईल ते समजू शकेल. अजित पवार यांनी तर आपला आवाज काढून आपल्याला बदनाम करण्यासाठी हा डाव खेळला गेला असल्याचे सांगून आपण त्यातले नाहीच असे म्हटले आहे. अजितदादांनी जशी ही धमकी दिली त्याच धर्तीवर समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी बुलंदेश्‍वर येथील सरकारी शाळेतील शिक्षकांना आमच्या पक्षांना मत द्यावे व जे मतदान करणार नाहीत त्यांना नोकरी गमवावी लागेल अशी शब्दात धमकाविले आहे. मुलायमसिंग यांना याबद्दल निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी मी माझे विरोधक पी.डी.पी.वर शेकडो हल्ले केले असते. परंतु तसे करायला माझ्याकडे अतिरेकी नाहीत. अब्दुल्लासाहेबांची ही धमकी म्हणजे आपल्या विरोधकांवर हल्ला करण्याची फूस लावण्याची धमकी देणारे हे विधान ठरावे.प्रियांका गांंधी यांच्यासोबत बोलताना कॉँग्रेस कार्यकर्ता विनोद मिश्रा यांनी मी आम आदमीचे उमेदवार कुमार विश्‍वास यांना गोळ्या झाडीन अले म्हटल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले आहे. या सर्व धमक्या पाहता राजकारणाची दिशा गेल्या काही वर्षात बदलली आहे हे स्पष्ट दिसते. गेल्या काही वर्षात आपल्याकडे राजकारण हे स्वत:चे हीत सांभाळात समाजसेवा करण्याचे एक साधन झाले आहे. पूर्वीच्या काळी समाजाचे हीत करण्यासाठी राजकारण केले जाई. हे करीत असताना स्वत:चा स्वार्थ जपणे ही दुय्यम बाब असे. लोकांचे व देशाचे भले करण्यासाठी समाजकारण, राजकारण केले जाई. स्वातंत्र्यानंतरच्या पुढच्या दोन-तीन पिढ्यांनी राजकारण हे जनसवेचे एक व्रत म्हणून केले. त्यात जर मंत्रिपद एखाद्याला मिळाले तर त्याच पुरेपुर फायदा जनतेसाठी कसा करता येईल याचा विचार केला जाई. आता मात्र राजकारणाचा चेहरामोहराच साफ बदलून गेला आहे. सध्याचे राजकारण हे स्वार्थी हेतू डाळ्यापुढे ठेवून केले जाते. आपण ज्या समाजाला, व्यक्तीला समाजसेवेच्या माध्यमातून देतो त्याचा परतावा आपल्याला त्यांनी आपला एक हक्क म्हणून द्यावा अशी मनोवृत्ती राजकारण्यांची झाली आहे. अशा प्रकारे राजकारणाच्या दिशाच पार बदलून गेल्या आहेत. समाजसेवेचे एक व्रत आहे आणि कोणताहा लाभ अथवा परतावा यातून मिळणार नाही असे गृहीत धरुन काम करणार्‍यांची पिढी आता संपली आहे. अजित पवार यांची धमकी म्हणजे गावकर्‍यांना त्यांनी केलेले एक प्रकारचे ब्लॅकमेलिंगच आहे. परंतु अशा प्रकारच्या राजकीय धमक्यांना घाबरुन मतदान करण्याचे दिवस आता संपले आहेत हे अजित पवारसाहेबांनी खरे तर लक्षात घेतले पाहिजे. अशा धमक्यातून धनशक्तीचा वा बळाचा वापर करुन निवडणुका लढविणारे जिंकत नाहीत. जनता त्यांना धूळ चारते हे त्यांनी लक्षात घ्यावे.
----------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel