-->
संपादकीय पान शनिवार दि. १९ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला?
-------------------------------------
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात लोकांनी भरभरून मतदान केले आहे. आतापर्यंतच्या मतदानातील हा सर्वात महत्त्वाचा व मोठा टप्पा होता. यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७९ टक्के मतदान झाले आहे. इतर राज्यांमध्येही २००९च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. या वाढत्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार याचेही कयास लावले जात आहेत. राजस्थान मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. या तिन्ही राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे आणि येथे पहिल्यापासून मोदींची लाट असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे वाढत्या टक्केवारीचा फायदा भाजपला होणार असल्याचे बोलले जात आहे. लोकांनी जास्तीत जास्त व निर्भयपणे मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगासह सर्वच राजकीय पक्षांनी आवाहन केले होते; त्याचा परिणाम दिसून आला, असे म्हणावयास हरकत नाही. यावेळी आपल्याकडे तरुण २० कोटी मतदार आपला हक्क पहिल्यांदा बजावत आहेत. त्यांच्यात उत्साह आहे आणि ते प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत बहुतांश ठिकाणी सरासरी दहा टक्क्यांनी मतदान वाढले आहे. असे म्हटले जाते की, मतदान वाढले की, सत्ताधार्‍यांना पहिली धडकी भरते. कारण लोक आपल्या मनातील रोष व्यक्त करण्यासाठी म्हणजेच सत्ताधार्‍यांना विरोध करण्यासाठी मतदानासाठी बाहेर पडतात. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार  नरेंद्र मोदी यांनी देशभर तुफानी दौरे करून गुजरातचा विकासपुरुष अशी जी प्रतिमा होती त्याला देशव्यापी रूप दिले आहे. त्यांच्या देशभरातील सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. प. बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ अशा ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही तेथील मतदारही भाजप नव्हे तर मोदींना मतदान करेल, असे सांगितले जात आहे. असे असले तरी देशभरातील सामान्य मध्यमवर्गीय, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, मजूर वर्गामध्ये मात्र नरेंद्र मोदींचे आकर्षण फारसे दिसत नाही. शहरी मध्यमवर्गीय व भाडंवलदारांपुरतीच त्यांची लोकप्रियता आहे. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे चॅनेल्सनी त्यांच्या नावाचा गवगवा मोठ्या प्रमाणात केला आहे. जातीच्या समीकरणांचा विचार केला तर मोदींचे लक्ष्य ज्या बिहार व उत्तर प्रदेशावर आहे त्या राज्यांमध्ये मोदींच्या तथाकथित लाटेला रोखण्यासाठी बसपा, सपा, राजद, कॉंग्रेस व अन्य छोटे पक्ष पुन्हा जातीय समीकरणांची मांडणी करू लागले आहेत. खुद्द भाजपमध्ये जे मोदीविरोधक गट आहेत ते तिकिटांवरूनच मोदी व त्यांचे निकटचे सहकारी अमित शहा यांच्यावर नाराज आहेत. भाजपचे पारंपरिक ब्राह्मण व इतर उच्चवर्णीय जातीतले नेते व मतदार मोदींच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. मोदींनी ज्या पद्धतीने जुन्याजाणत्या नेत्यांना पक्षातून मागे सारले, त्याचाही राग पक्षकार्यकर्त्यांमध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशात सुमारे २० टक्के मतदार हा मुस्लिम असून त्याचा कल कसा आहे, हेही महत्त्वाचे ठरणारे आहे. गुरुवारी तिसर्‍या टप्प्याचे मतदान पश्चिम उत्तर प्रदेशातील १० मतदारसंघांत झाले. यापैकी मुझफ्फरपूर, कैराना, सहारनपूर हे गेल्या वर्षी दंगलीत होरपळले होते. या तिन्ही ठिकाणी विक्रमी मतदान झाले. विक्रमी मतदान प्रस्थापितांच्या विरोधात जसे होते तसे ते संभाव्य राजकीय समीकरणाला नाकारण्यासाठीही होते. भारतात असे अनेक संवेदनशील मतदारसंघ आहेत, जेथे आर्थिक विकासापेक्षा सामाजिक सुरक्षितता हा महत्त्वाचा निवडणूक मुद्दा आजच्याही घडीला असतो. पुढील काही दिवसांत मोदी पूर्व उत्तर प्रदेशात डझनभर सभा घेणार आहेत. या सभांच्या माध्यमातून ते आपली विकासपुरुषाची प्रतिमा पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न करतील व तशी नवी जातीय समीकरणेही मांडतील. त्याचा फायदा किती मिळेल ते नंतर कळेलच. हे सर्व अंदाज झाले. एक बाब आहे की, सभेला गर्दी झाली की त्या पक्षाला मतदान होते असे नव्हे. याबाबतच यापूर्वीचे सर्व अंदाज खोटे ठरले आहेत. अगदी आणीबाणी उठल्यावर झालेल्या निवडणुकांत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सभेलाही प्रचंड गर्दी होत असे. मात्र त्यावेळी इंदिरा गांधींही पडल्या व कॉँग्रेस पक्षाचा सफाया झाला, याची आठवण ठेवली पाहिजे. आज जे मतदान वाढले आहे ते पूर्णपणे भाजपाला मिळेल अशी त्यांची समजूत असून तो भ्रमाचा भोपळा फुटणार आहे. सरकार विरुध्द जनतेत नाराजी आहे हे वास्तव कुणीही नाकारणार नाही. प्रामुख्याने बेरोजगार तरुण, शेतकरी व कष्करी हे सत्ताधार्‍यांना पुन्हा मते देणार नाहीत, मात्र ती सर्व मते भाजपाला जाणार नाहीत. तर ती विरोधी पक्षात विभागली जाणार आहेत. प्रसिध्दी माध्यमांना हाताशी घेऊन भाजपाने अशी आपली देशात काही हवा निर्माण केली आहे की, आता फक्त मोदींचा शपथविधी होणेच बाकी आहे. २००४ साली देखील अशी इंडिया शायनिंगच्या जाहीरात कॅम्पेनमुळेे असेच चित्र उभे केले गेले होेते. पंरतु या शाननिंगचा देखील असाच फुगा फुटला होता. यावेळी देखील भाजपाचे याहून काही वेगळे होण्याची शक्यता नाही. अर्थात हे सर्व निकाल लागल्यावर स्पष्ट होईलच. मात्र मतदानाचा टक्का वाढणे ही आपल्याकडील लोकशाहीसाठी चांगली बातमी ठरावी. आपल्याकडील लोकशाहीची पाळेमुळे ही गेल्या सहा दशकात चांगलीच विस्तारली आहेत आणि दिवसेंदिवस आपली लोकशाही प्रगल्भ होत आहे असेच म्हणावे लागेल.
------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel