-->
जगाचे लक्ष ट्रम्प यांच्याकडे

जगाचे लक्ष ट्रम्प यांच्याकडे

संपादकीय पान शुक्रवार दि. 20 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
जगाचे लक्ष ट्रम्प यांच्याकडे
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपली कारकिर्द संपविताना साश्रुनयनांनी निरोप घेतला आहे. अर्थात आपल्या हातातील सत्ता जाते यासाठी हे आश्र्रु नव्हते तर अमेरिकेचे कसे होणार या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. आज 20 जानेवारी रोजी नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या हाती सुत्रे हाती घेतील. अमेरिकेची भांडवलशाही एका नव्या वळणावर आलेले असेल. कारण ज्या अनेक मुद्यावर ट्रम्प यांनी भाष्ये करुन ते निवडून आले त्याची ते पूर्तता करु शकणार आहेत का, असा सवाल केवळ अमेरिकन नागरिकांनाच पडलेला आहे, असे नव्हे तर जगापुढे हा प्रश्‍न आहे. आजवर अमेरिका ही स्थलांतारीतांची भूमी म्हणून ओळखली जाते व हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. हा देश भांडवलशाही असला तरी तेथील भांडवलशाही ही उदार मनोवृत्तीची आहे. जगातील कानाकोपर्‍यातून आलेल्या लोकांना या अमेरिकेने आपल्याकडे सामावून घेतले आहे. तर येथील भांडवलशाहीने नफ्याचे गणित जुळवून गुंतवणूकदारांना नफा जास्त मिळवून देण्यासाठी जगात प्रकल्प टाकले आहेत. त्यामुळे अमेरिकेत बेकारी वाढली असली तरीही जगातील अनेक प्रामुख्याने विकसनशील राष्ट्रातील लोकांना रोजगार मिळाला आहे. अर्थात हे करण्यामागे अमेरिकन अमेरिकन भांडवलशाहीचा विकसनशील देशात रोजगार निर्माण करुन तयंचा विकास साधण्याचे हेतू नव्हता, तर त्यांना आपल्या कंपन्यांच्या नफ्यात वाढ करायची होती. मात्र या दोन्ही मुद्यांना आता ट्रम्प यांनी आव्हान देण्याची भाषा आपल्या निवडणूक प्रचारात केली होती. यासंबंधीचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास वाहन उद्योगातील अमेरिकन कंपनी जनरल मोटार्सचे देता येईल. ही कंपनी आपल्या काही गाड्याचे उत्पादन मेक्सिकोत करते. यातून त्यांच्या नफ्यात भरघोस वाढ झाली आहे. ज्या कंपन्या अमेरिकेऐवजी बाहेरच्या देशांत उत्पादन हलवतील, त्यांच्यावर 35 टक्के कर लावू. कारण त्यांच्यामुळे अमेरिकेतील रोजगारसंधी हिरावून घेतल्या जातात, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. जेथे स्वस्तात उत्पादन होते, तेथेच भांडवल खेचले जाणार, हा सिद्धांत एकेकाळी अमेरिकेनेच प्रचलित केला होता. त्याच अमेरिकेत ट्रम्प यांनी जागतिकीकरणविरोधी सूर आवळला व त्यात त्यांना जनतेचा पाठिंबा मिळाला. अमेरिका, मेक्सिको व कॅनडा यांच्यातील नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ग्रीमेंटलाही ट्रम्प यांनी विरोध केला आहे. केवळ मेक्सिकोच नव्हे तर अनेक अमेरिकन कंपन्यांनी आपली उत्पादने भारत, चीन या देशातून सुरु केल्यामुळे त्यांच्या नफ्यात तर वाढ झालीच आहे. अनेक कंपन्यांची कॉल सेंटर्स ही इंग्रजी येत असेलल्या देशात या अमेरिकन कंपन्यांनी स्थापन केल्यामुळे त्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. अमेरिकेतील 60 लाख रोजगार हा मेक्सिकोवर अवलंबून आहेत. बिल क्लिटंन यांनी 1994 मध्ये केलेल्या अमेरिका-मेक्सिको-कॅनडा या देशातील करारामुळे या तीन देशांतील मालवाहतूक शुल्कविरहित आहे. त्यामुळे अमेरिका-मेक्सिको यांच्यामध्येच दररोज 140 अब्ज डॉलरची मालवाहतूक होते. अमेरिकेतील नोकर्‍या जाऊन कॅनडा व मेक्सिकोत रोजगार स्थलांतरित होत असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे, ते काही प्रमाणात खरेही आहे. गेल्या दशकात आठ लाख रोजगार मेक्सिकोत गेला, अशी अमेरिकेतील अधिकृत आकडेवारी आहे. मात्र, अमेरिकी काँग्रेसच्या 2015च्या अहवालानुसार, अमेरिकेतील रोजगार कमी झाला तो यांत्रिकीकरणामुळे. आता अमेरिकेतील हा रोजगार पुन्हा मिळविण्यासाठी ट्रम्प काय उपायोजना करतात ते पहाणे लक्षणीय ठरेल. त्याचबरोबर ट्रम्प यांचे आन्तरराष्ट्रीय धोरण कसे असेल याचीही उत्सुकता आहे. ओबामा यांनी गेल्या आठ वर्षात जगातील तणाव व युध्दे संपावित यासाठी प्रयत्न जरुर केले. यात त्यांना शंभर टक्के यश आले नाही, हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र त्यांच्या काळात अमेरिका युध्दखोर राहिली नाही हे खरे आहे. भारताबरोबरचे आता अमेरिकेचे संबंध केस राहाणार हे देखील महत्वाचे आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील हिंदूंचे आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांचे आपल्या प्रचाराच्या दरम्यान खूप कौतुक केले होते. त्यामुळेच त्यांना भारतीयांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. ट्रम्प व मोदी हे दोघेही उजव्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात. भारतातील धार्मिक दुहीबद्दल ओबामा यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अर्थात ट्रम्प यांना भारतातील धर्मनिरपेक्षा भूमिकेचे काहीच देणे-घेणेे नाही. मात्र ट्रम्प हे पाकिस्तानच्या संदर्भात कोणती भूमिका घेतात हे पाहाणे आपल्यादृष्टीने तरी महत्वाचे ठरणार आहे. अमेरिका-भारत यांच्यातील व्यापार कसा वाढेल, यासाठी त्यांचा प्रयत्न राहिल का? सीमेपलिकडील दहशतवादाबाबत ते कठोर भूमिका घेतात का? चीनला शह देण्यासाठी ते भारताला जवळ घेणार का? या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला हळूहळू सापडू लागतील. ट्रम्प हे त्यांच्या विचित्रपणाबद्दल प्रसिध्द आहेत. मात्र अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यावर त्यांचा हा स्वभाव कसा राहिल, त्यांनी घेतलेली भूमिका मवाळ होणार का, हे पहावे लागेल. भारतात ट्रम्प यांच्या कंपन्यांनी अनेक रियल इस्टेट प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र आता त्यांनी आपल्या उद्योग साम्राज्याचा राजीनामा दिला असला तरीही भारताबाबत त्यांचा दृष्टीकोन सामंजस्यचाच असू शकतो. जगातील सत्तेची समिकरणे गेल्या पाच वर्षात झपाट्याने बदलली आहेत. ब्रिटनमध्ये गेली सात वर्षे उजव्या पक्षाचे सरकार आहे. युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडला आहे. जर्मनीच्या अँजेला मर्केल यांनी तर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत आहेत. जपानचे उजवे पंतप्रधान शिंजो आबे यांची दुसरी टर्म सुरू आहे. व्हेनेझुएला व पोलंडमध्येही उजव्यांचा जोर आहे आणि स्वीडन व हॉलंडमध्ये वेगळी स्थिती नाही. या जागतिक पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी सुत्रे हाती घेणे याला एक विशेष महत्व आहे.
---------------------------------------------------------

0 Response to "जगाचे लक्ष ट्रम्प यांच्याकडे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel