-->
झायराचे वादळ

झायराचे वादळ

संपादकीय पान गुरुवार दि. 19 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
झायराचे वादळ
आमीर खानच्या नुकत्याच गाजलेल्या दंगलमध्ये कुस्तीगीर गीता फोगट हिची लहानपणीची भूमिका करणारी झायरा वासिम हिने जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर काश्मीरमधील तरुणांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. झायराने या प्रकरणी माफी मागितल्यानंतर तिच्या समर्थनार्थ गीता फोगटने माफी मागण्याची गरजच नव्हती, असे म्हटले आहे. याबाबत आमीरकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात न आल्याने त्याविषयी प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होते. आता आमीरने झायराला पाठिंबा देत ती जगभरात आदर्श असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमीर खानचे विरोधक असलेल्या व हिंदुत्ववाद्यांना एक जबरदस्त चपराक मिळाली आहे. अमीर खानच्या पुरोगामीत्वावर नेहमीच अशा प्रकारे संशय व्यक्त केला जातो. अनेकदा त्यांच्या या वागण्याबदंदल शंकाच नव्हे तर कुत्सिकताही व्य्क्त होते. मात्र त्याची पर्वा न करता अमीर नेहमीच आपल्या गतीने जे काही करता येईल ते करण्याच्या प्रयत्न करतो. दंगलमध्येही त्याने कुस्तीगीर महिलांच्या अडचणी, त्यांना एक स्त्री म्हणून येणार्‍या अडचणी याचे योग्य दर्शन केले आहे. याच अर्थातच सर्वसामान्य जनतेने जोरदार स्वागत केले आहे कारण हा चित्रपट उत्पन्नाचे विक्रम दरदोज मोडत आहे. यातील एक बाल कलाकार झायरा वासिम हिने धाकड अशा छोट्या गीता फोगटचे काम केले आहे. तिची भूमिका विशेष गाजली. प्रेक्षकांबरोबरच समिक्षकांचेही लक्ष या बालकलाकाराने वेधून घेतले. नुकतीच झायरा वासिम हिने जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर काश्मीरमधील तरुणांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या. त्यामुळे सोळा वर्षे वयाची झायरा सध्या सोशल मिडियावरही चर्चेत आहे. काश्मिरमधील कट्टरतावाद्यांनी सोशल मीडियावरून धमक्या दिल्यानंतर झायराने सोशल मीडियावरच माफी मागितली. कट्टरतावाद्यांना युथ आयकॉन म्हणून झायरा नको आहे, तर हातात दगड घेतलेले तरूण हवे आहेत. काश्मिरमधील कट्टरतावाद्यांच्या धमक्यांनंतर अवघा देश झायराच्या बाजूने उभा राहिला आहे, ही सर्वात समाधानाची बाब.
झायराचा हा पहिलाच चित्रपट असल्याने फारशी ती कोणाला ठाऊकही नव्हती. चित्रपटातील तिच्या हरियाणवी लहेजामुळे तर ती नक्की कुठली असा प्रश्‍न अनेकांना पडला. परंतु झायरा ही मुळची श्रीनगरमधील हवल (जम्मू- काश्मिर) येथील आहे व सेंट पॉल सोनवर या मिशनरी शाळेत तिचे शिक्षण झाले. झायराच्या घरचे वातावरणही अगदी साधे आहे. तिचे वडील बँकेत आहेत तर आई शाळेत शिक्षिका आहे. त्यामुळे घरात वातावरण अगदी मध्यमवर्गीयांसारखे आहे. चित्रपटात पदार्पण करण्याआधी झायराने काही जाहिरातींमध्ये भूमिका केल्या होत्या. दहा हजार मुलींमध्ये दंगल चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी छोट्या गीतासाठी झायराची निवड केली. चित्रपटासाठी निवड झाल्यानंतरही झायराला या भूमिकेसाठी चांगलेलच कष्ट घ्यावे लागले. कारण या भूमिकेसाठी तिला खास कुस्तीचे प्रशिक्षण घ्यावे लागले. चित्रपटातील पदार्पण हा देखील एक योगायोगच होता. सुरुवातीला तिच्या घरच्यांना तिने अभिनयाच्या क्षेत्रात यावे असे वाटत नव्हते. तिचे वयही जेमतेम 16 आहे त्यामुळे आयुष्यात नेमके काय करावे याचा तिने फारसा कधी विचार केला नव्हता. चित्रपटात काम करता येईल व ते देखील अमीर खानसारख्या मोठ्या अभिनेत्यासोबत काम करु असे तिच्या स्वप्नी देखील नव्हते. मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतल्यावर एवढे वादळ उठेल याची तिला कल्पनाही नव्हती. त्यामुळे तिने घाईघाईने जनतेच्या भावना नकळत दुखावल्याने तिने सोशल मीडियावरून माफी मागतिली होती. मात्र, नंतर तिने माफीचे ट्विट काढून टाकले. काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता झायराने मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्याने तरुणांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तिने माफी मागितली होती. तसेच दंगलमधील तिच्या भूमिकेविषयीही नाराजी व्यक्त करून याबद्दल आपल्याला अभिमान वाटत नसल्याचे तिने स्पष्ट फेसबुकवरून व्यक्त केले होते. मी सर्वांची माफी मागते. ही कृती आपण जाणीवपूर्वक केलेली नाही. मी केवळ 16 वर्षांची आहे आणि हे लक्षात घेऊन लोक मला समजून घेतील माफ करतील, असेही तिने म्हटले होते. काश्मिरी युवकांसाठी झायराला आदर्श मानले जाते. याबाबत तिने म्हटले आहे, की माझे अनुकरण कुणीही करू नये. तसेच आपला आदर्शही कोणी ठेवू नये, अशी आपली इच्छा होती. झायराबाबत होत असलेल्या असहिष्णुतेवर आमीर गप्प का? तो झायराबाबत काढलेल्या फतव्याला घाबरला का?, असे प्रश्‍नही उपस्थित होत होते. दुसरीकडे गीतकार जावेद अख्तर यांनी झायराला मिळालेल्या यशाबद्दल तिला माफी मागायला लावणे, लाजीरवाणे आहे असे म्हटले होते. आता मात्र अमीरने आपली याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आमीरने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की तुझे भविष्य चांगले असून, तू हुशार, युवा, मेहनती आणि धाडसी मुलगी आहेत. तु भारतातच नाही तर जगभरात सर्वांसाठी आदर्श आहेस. माझ्याकडून तुला शुभेच्छा. माझे सर्वांना सांगणे आहे, की तिला एकटे सोडावे आणि तिचा आदर करावा. ती फक्त 16 वर्षांची असून, ती आयुष्याशी संघर्ष करत आहे. आमीरचा हा संदेश अतिशय बोलका आहे व त्यामुळे झायराचे वादळ त्यामुळे संपायला हरकत नाही. खरे तर आमीरला दोषारोप करण्यापेक्षा तिच्यावर माफी मागण्यासाठी ज्यांनी दबाव टाकला त्यांचा निषेध व्हायला पाहिजे.
-----------------------------------------------------------

0 Response to "झायराचे वादळ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel