-->
ग्लोबल विरुध्द लोकल

ग्लोबल विरुध्द लोकल

16 may 2020 अग्रलेख ग्लोबल विरुध्द लोकल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपू
र्वी केलेल्या आपल्या भाषणात 20 लाख कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे जसे जाहीर केले तसेच लोकल उत्पादनांचा वापर करण्याचे आवाहन केले. लोकल विरुध्द ग्लोबलची लढाई कशी आहे व आपली उत्पादने वापरणे कसे देशाच्या गरजेच आहे ते सांगितले. थोडक्यात त्यांनी वेगळ्या भाषेत देशी तयार झालेली उत्पादने वापरा व विदेशातून आलेली उत्पादने वापरु नका असा संदेश दिला. मोदींच्या आदेशानुसार गेल्या दोन दिवसात चक्रे फिरु लागली व देशी उत्पादने कोणती आहेत व विदेशातील कोणती याची यादी समाजमाध्यमांवर फिरु लागली आहे. थोडक्यात ग्लोबल विरुध्द लोकलची लढाई सुरु झाली आहे. आता आपल्याला त्याचबरोबर आत्मनिर्भयही व्हायचे आहे त्यामुळे जर एखादे लोकल तयार झालेले उत्पादन नसले तर त्याबदल्यात विदेशातलेही पर्यायी उत्पादन अजिबात न वापरणे हे ओघाने आलेच. त्यामुळे आपण आता फेसबुक, व्हॉटसअप, जीमेल, टीकटॉक, हॅलो हे वापरणे आजपासून बंद केले पाहिजे. कारण ही सर्व उत्पादने विदेशी आहेत. बरे याला पर्याय म्हणून कोणतीही भारतीय उत्पादने उपलब्ध नाहीत, तो पर्याय उपलब्ध होईल त्यावेळी बघू परंतु आता तातडीने आपण ही उत्पादने वापरणे बंद करणे गरजेचे आहे. आता ही उत्पादने वापरणे बंद करावयाचे झाले तर देशातील लोकांचे किती हाल होतील याचा कुणी विचार केला आहे का? सर्वात महत्वाचे म्हणजे याच समाजमाध्यमांचा वापर करुन हेच मोदी सलग दोन वेळा सत्तेत आले आहेत. आता जर जीमेल, याहू यासारखे मेल बंद केले तर त्याला अन्य भारतीय पर्यायही नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पत्र लिहून पाठविणे आले. परंतु तसे करणे आवश्यक आहे कारण आपल्याला लोकल उत्पादनेच वापरावयाची आहेत. सौंदर्यप्रसादने, टूथपेस्ट, मोटार यासारख्या अनेक वस्तू आहेत की ज्या आपल्या देशात तयार होतात. स्वातंत्र्यपूर्व काळानंतर आपण प्रगती केली म्हणतो ती हीच आहे. आपल्याबरोबर स्वातंत्र झालेल्या पाकिस्तानात आजही साधी पीन उत्पादीत होत नाही, त्यांना सर्व आयात करावे लागते. आपण त्या तुलनेत खूपच स्वयंपूर्ण झालो आहोत. परंतु आजही आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करता आपण मागे आहोत ही वस्तुस्थिती मान्य करावयास पाहिजे. आज अमेरिकेचे मोठेपण त्यांच्यातील संशोधनात आहे, ते त्या जीवावर जगावर अधिराज्य करीत आहेत. आपल्याकडे फेसबुक, जीमेल, औषधे या क्षेत्रात एखादा शोध लावून आपण जगाला आपले मोठेपण दाखवून देत नाही तोपर्यंत आपले महत्वही जगाला समजणार आहे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात ग्लोबल, लोकल या संकल्पना धुसर झाल्या आहेत. जग ही एक मोठी बाजारपेठ आहे. लोकांना उत्कृष्ट उत्पादन वाजवी दरात पाहिजे आहे. मग ते कोणतेही उत्पादन असो. आज आपल्याकडे मारुती गाड्या लोकप्रिय आहेत, कारण त्या वापरण्यास योग्य आहेत, त्याला रिसेल व्हॅल्यू चांगली आहे. त्यातुलनेत टाटांच्या गाड्यांना रिसेल बाजारात फारशी किंमत नाही. असे असले तरीही आपल्याकडील सर्व ग्राहक आता मोदींच्या आवाहनानुसार टाटा, महिंद्रा यांच्या गाड्या खरेदी करतील का? अजिबात नाही कारण ग्राहक आपले हित प्रथम बघतो, त्यात काही गैरदेखील नाही. सध्याच्या काळात स्वदेशी ही संकल्पनाच फिजूल ठरली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी आंदोलने झाली, लोकांनी विदेशी कपड्यांची होळी केली. म्हणून आता आपण तसे करु शकत नाही. कारण आता लोकांच्या गरजा, अपेक्षा बदलल्या आहेत. त्याची जो पूर्तता करेल तो त्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. सध्याच्या काळात जग ही तुमची बाजारपेठ आहे, त्यात तुम्हाला सरस ठरावयाचे आहे. चीनने ही जगाची नाडी बरोबर ओळखली आहे व त्यातून आपल्याकडे रोजगार निर्मीती घडवून आणली. ते स्वदेशीच्या फुका गोष्टी करण्याच्या भानगडीत पडले नाहीत. 91 साली आर्थिक उदारीकरण सुरु झाल्यावर टाटांच्या नेतृत्वाखाली काही उद्योजकांनी या धोरणाला विरोध करण्यासाठी व स्वदेशी धोरणाचा अवलंब करण्यासाठी बॉम्बे क्लबची स्थापना केली होती. परंतु याच भांडवलदारांना उदारीकरणानंतर जगातील संधी खूणवू लागल्या तसे काळाच्या ओघात याच टाटांपासून सर्वांनी जगातील कंपन्या घेतल्या व जागतिकीकरण कसे चांगले आहे हे सांगितले. टाटांनी नंतर स्वदेशीचा हा विषय कधी काढला नाही. टाटांनी टेटली, जग्वार व इतर अनेक जागतिक ब्रँडस आपल्या ताब्यात घेतले व आपल्या विविध कंपन्यांचा जागतिक पातळीवर विस्तार केला ही अभिमानास्पदच बाब आहे. जर आपल्या कंपन्यांना तेथे जगात विरोध झाला तर आपल्याला लगेच राग येतो. त्यामुळे आपणही विदेशी कंपन्यांना विरोध करु शकत नाही. आपल्याकडील लोकल कंपन्यांना जागतिक दर्ज्याचे व्हावे लागेल व आपला माल कमी किंमतीतही द्यावा लागेल. निरमा पासून पातंजली पर्यंत अनेक देशी कंपन्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी टक्कर देत देशात आपले स्थान निर्माण केलेही आहे. त्यामुळे सध्याच्या काळात लोकल किंवा स्वदेशी ही संकल्पना काही लोकांना भावणारी ठरु शकत नाही. बरे हा सल्ला देशातील नागरिकांना कुणी द्यावा, तर आपल्या पंतप्रधानांनी, जे विदेशी वस्तूंचा मोठ्या अभिमानाने वापर करतात. मेबॅकचे गॉगल्स, माऊँट ब्लँकचे पेन, मोव्हाडोचे घड्याळ आणि बी.एम.ड्ब्ल्यू.ची गाडी वापरणारे आपले पंतप्रधान जनतेला मात्र देशी उत्पादने वापरण्याचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे स्वदेशाचा हा भंपकपणा बस करावा.

0 Response to "ग्लोबल विरुध्द लोकल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel