-->
पारदर्शकता उघड

पारदर्शकता उघड

पारदर्शकता उघड
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना व आत्ताही आपला कारभार कसा पारदर्शक होता याची मोठी टिमकी वाजवली जायची. परंतु आता सिडको या महामंडळाच्या कारभारात फडवीसांच्या काळात अनेक गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगनेच ठेवल्याने भाजपाची पारदर्शकता कशी दिखावू होती ते आता उघड झाले आहे. फडणवीस यातून पळवाट काढू सकत नाहीत कारण सिडकोचे काम थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली होत होते. त्यामुळे या सर्व गैरव्यवहारांना फडणवीसांची मान्यताच होती एवढेच कशाला सिडकोच्या अध्यक्षांनीच त्या काळात कंत्राटे घेऊन एक नवा पायंडा पाडला होता. कॅगने आपल्या आहवालात भाजपाच्या फडणवीस यांच्या शासनातील पारदर्शकतेचे अनेक पुरावेच सादर केले आहेत. नवी मुंबई मेट्रो रेल, नेरुळ उरण रेल्वे, खारघर येथील गृहनिर्माण प्रकल्प यात मोठ्या प्रमाणात अनियमीततता झाली आहे. सिडकोच्या पायाभूत प्रकल्प व विकास कामातील सुमारे 880 कोटी रुपयांची कामे कामाचा अनुभव नसलेल्या सहा कंत्राटदारांना देण्यात आली होती. याव्दारे अनेक नियमच सरकारने धाब्यावर बसविल्याचे उघड झाले आहे. तसेच सुमारे 70 कोटी रुपयांची कामे निविदा न मागविताच देण्याचे धाडस फडणवीस सरकारने केले होते. ही सर्व अनियमीतता पाहता फडणवीस सरकार किती निर्लजपणे व सर्व नियम धाब्याबर बसवून काम करीत होते ते दिसते. कॅगने या अहवालाच्या माध्यमातून फडणवीस सरकारचा बुरखा टराटरा फाडला आहे. नवीन मुंबईत आन्तरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. त्यासाठी जी 2000 कोटी रुपयांची कामे करण्यात आली त्यासाठी अनेक नियम धाब्यावर बसविण्यात आले, ही दुर्दैवी बाब म्हटली पाहिजे. फडणवीस सरकारने पारदर्शकतेचे नाटक करीत जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे, हे यातून उघड झाले आहे. यापूर्वी फडणवीस सरकारमधील 20 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप त्यावेळच्या विरोधी पक्षांकडून केले जात होते. मात्र त्याकडे फडणवीस यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले व विरोधकांची या मंत्र्याची चौकशी करण्याची मागणी फेटाळली होती. परंतु विरोधकांच्या मागणीत काही तर दम होता, केवळ विरोधासाठी विरोध नव्हता असेच कॅगच्या अहवालातून सिध्द होत आहे. काही वेळा तर 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या निविदा राष्ट्रीय वृत्तपत्रात जाहीरात देणे आवश्यक असतानाही त्याकडे काणाडोळा करुन काढण्यात आल्या. अनेक कंत्राटांमध्ये निविदा काढताना जी मार्गदर्शक तत्वे पाळली जातात त्याला हरताळ फासण्यात आला. सिडको हे सर्वात मोठे महामंडळ असून याच्या अध्यक्षांनीच कंत्राट स्वतच आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. याविषयी तत्कालीन विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते, परंतु त्यांचे काहीच सरकारने एकले नाही व आपला मनमानी कारभार सुरुच ठेवला. सध्या अनेक महामंडळे ही सत्ताधाऱ्यांची पैसे कमविण्याची कुरण झाली आहेत. आपल्याला जे सार्वजनिक पद मिळते त्याचा उपयोग जनहितासाठीच केला गेला पाहिजे, हा समजच आता संपला आहे. सिडको हे त्यातील एक मोठे कुरुण ठरले आहे. इथे तर अध्यक्षांनीच कंत्राटे घेऊन एक नवा विक्रम किंवा पायंडा पाडला आहे. भाजपाचे सरकार भ्रष्टाचारात किती आकंठ बुडालेले हेत हे यावरुन समजणे पुरेसे आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करुन यातील लाभार्थिंना शिक्षा घडविण्याचे धाडस महाविकास आघाडीचे सरकार दाखविणार का हाच सवाल आहे. सिडकोतील भ्रष्टाचार हा खरे तर हिमनगावरील एक टोक आहे. येत्या काळात आणखी भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस येतील. अर्थात फडणवीस सरकारच्या विरोधात सत्तेवर असताना अनेक आरोप झाले परंतु सोशल मिडिया व प्रसार माध्यमांना हाताशी धरुन त्याला फारशी प्रसिध्दी देण्यात आली नव्हती. आता मात्र त्यावेळच्या विरोधी पक्षांनीच नाही तर कॅग अहवालावरुन हे सत्य बाहेर आले आहे. आता या कॅगच्या अहवालावर फडणवीस व त्याचे तत्कालीन सहकारी मूग गिळून आहेत. मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणावयाचे असेल तर हेच फडणवीस सरकारवर टीका करण्यासाठी पुढे सरसावतात. किंवा कोणतीही प्रतिक्रीया असेल तर लगेच माईक समोर बाह्या सरसावून प्रतिक्रिया देण्यास सज्ज असतात, मात्र आता हे गप्प का, असा सवाल आहे. भाजपाने आता आपले सरकार हे भ्रष्टाचारमुक्त होते, पारदर्शी होते आपण जनतेचे भले केले असा आव आणणे आता तरी सोडून द्यावे. कारण आता त्यांचे खरे स्वरुप उघड झाले आहे. सत्ता गेल्याने भाजापाची आता हवा तंग होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे 14 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा गौफ्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. नाही तरी भाजपाच्या एकूण आमदारांपैकी 50 टक्क्याहून जास्त आमदार हे आयात झालेले आहेत. यातील निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आलेल्या 35 पैकी 20 आमदारांना जनतेनेच आस्मान दाखविले होते. आता निवडून आलेल्यापैकी बरेच जण पुन्हा आपल्या पक्षात येऊ इच्छितात असे दिसते. तसे झाल्यास भाजपाची पुन्हा दयनीय अवस्था होणार आहे. सत्ता गेल्यावर एकीकडे झाडावरचे कावळे उडू लागले आहेत तर दुसरीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणेही उघड होऊ लागली आहेत. भाजपाला आता सत्ता गेल्यावर कठीण दिवस आले आहेत हेच खरे.   
-----------------------------------------------------------------

0 Response to "पारदर्शकता उघड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel