-->
रविवार दि. ०७ डिसेंबर २०१४ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
कॉँग्रेसचे तीन मोहरे...
कॉँग्रेसचे तीन महत्वाचे मोहरे बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, माजी मंत्री दत्ताजी खानविलकर व मुंबई प्रदेश कॉँग्रेसचे प्रदीर्घ काळ असलेले अध्यक्ष मुरली देवरा हे गेल्या आठवड्याभरात निधन पावल्याने एकेकाळी राजकारण व समाजकारण गाजविलेले हे नेते आता काळाच्या पडद्याआड गेले. या तिघांचेही वय ८५च्या पुढे होते. त्यांच्यातले ज्येष्ठ दत्ताजी खानविलकर ९२ वर्षांचे होते. त्यामुळे या तिघांमध्ये ते सर्वात मोठे. या तिघांनीही स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळी पाहिलेल्या. स्वातंत्र्यानंतरची जी एक पिढी शासनकर्ती झाली आणि कॉँग्रेसशी बांधिलकी मानून ज्यांनी जनसेवा केली त्यातीछल हे तिघे बिनिचे शिलेदार म्हटले पाहिजेत.  आपल्या हाती सत्ता आल्यावर ती जनतेसाठी राबविली पाहिजे यावर त्यांचा भर होता आणि त्यांनी तसे करुनही दाखविले. अंतुले हे मुस्लिम, खानविलकर हे हिंदू तर देवरा हे मारवाडी समाजाचे. कॉँग्रेसचे हे अमर, अकबर, ऍन्थोनी असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. कॉँग्रेस संस्कृतीत वाढलेले हे तिघेही नेते. यातील खानविलकर व अंतुले यांचा रायगडवासियांना परिचय आहे. देवरांचा परिचय असण्याचे कारण नाही. कारण मुरलीभाई हे मुंबईचे आणि त्यांचे कार्यक्षेत्र हे नेहमीच मुंबई आणि नंतरच्या काळात केंद्रीय मंत्री झाल्यावर दिल्ली हे राहिले. एकीकडे दक्षिण मुंबईची पॉश वस्ती व त्या जोडीला भेंडीबाजारची मुस्लिम वसाहत या मतदारसंघातील मराठी मध्यमवर्गीय वस्ती असा संमिश्र भाग असलेल्या मुंबईच्या दक्षिण मुंबईतून त्यांनी खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. दक्षिण मुंबईतील श्रीमंत व्यक्ती त्यांना मते देत ते त्यांच्या भांडवदारधार्जिणे धोरणामुळे, कॉँग्रेसचे उमेदवार असल्याने त्यांना मुस्लिमांची मते पडत तर मुरलीभाईंच्या पत्नी मराठी असल्याने गिरगावातली मराठी माणसे त्यांना मतदान करीत. अशा तिहेरी फायद्यामुळे मुरलीभाई कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत. परंतु ज्यावेळी कॉँग्रेस विरोधी लाट येई त्यावेळी याच मतदारसंघातून त्यांचा पराभव होऊन भाजपाच्या जयवंतीबेन मेहता निवडून येत. मुरलीभाईंकडे पक्षाचेे सर्वात महत्वाचे काम होते ते म्हणजे पक्षासाठी निधी जमा करणे. मुंबईतील उद्योगपतींशी त्यांची चांगलीच उठबस होती आणि त्यांच्याशी चांगले संबंधही ठेवले होते. त्याचा फायदा पक्षाला होत असे. तसेच ते स्वत: मारवाडी समाजाचे असल्याने मारवाडी उद्योगपती त्यांच्या सोबत असत. त्यांच्या माध्यमातून या उद्योगपतींना कॉँग्रेसशी संवाद साधता येत होता. देवरा हे कट्टर कॉँग्रेसचे आणि इंदिरा गांधींचे कट्टर समर्थक. त्याच जीवावर त्यांनी मुंबई प्रदेशचे अध्यक्षपद आपल्याकडे प्रदीर्घ काळ राखून ठेवले होते. त्याच्यांबद्दल अनेकांच्या मनात असंतोष खदखदत असे, अनेक वर्षे मराठी माणूस मुंबई प्रदेश कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावर न बसल्याने मराठी मंडळीही नाराज होती. परंतु इंदिरा गांधींच्या आदेशापुढे ते सर्व हतबल असायचे. इंदिरा गांधीनंतर त्यांनी राजीव व सोनिया यांच्याशीही असेच बेमालूमपणे जुळवून घेतले होते. केंद्रात मंत्री होण्याची त्यांना अलिकडच्या काळात म्हणजे डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात संधी मिळाली. त्यांना पेट्रोलियम खाते देण्यात आले होते. मात्र त्यांना केंद्रात मंत्री होण्यातही फारसा रस नव्हता. त्यांना मुंबई प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्षपद आपल्याकडे राखण्यात स्वारस्य होते. बॅरिस्टर अंतुले आणि देवरा यांचे एकाच पक्षात राहूनही कधीच सूत जमले नाही. त्यांच्या एकदा ऐवढे जबरदस्त भांडण झाले की, देवरा अध्यक्ष असे पर्यंत आपण मुंबई प्रदेश कार्यालयात पाय ठेवणार नाही अशी घोषणा अंतुले यांनी केली होती. देवरा यांना शेवटी २२ वर्षे हे पद उपभोगल्यावर सोडावे लागले. त्यांच्या जागी गुरुदास कामत यांची नियुक्ती झाली आणि अंतुले हे कार्यालयात आले. शेवटी अंतुलेंनी आपला शब्द खरा करुन दाखविला. अंतुले यांचे व देवरांचे हे विळ्याभोपळ्याचे नाते शेवटपर्यंत राहिले. मात्र देवरा आणि अंतुले यांच्यात एक समान धागा होता तो म्हणजे कॉँग्रेसनिष्ठा, म्हणजेच सुरुवातीला इंदिरा गांधी नंतर राहूल गांधी व नंतर सोनिया गांधी यांच्या चरणी त्यांना वाहिलेली निष्ठा. अंतुलेंनी मध्यंतरी एकदा कॉँग्रेस पक्ष सोडून आपला पक्ष स्थापन केला होता. परंतु त्यात त्यांना काही यश लाभले नाही व पुन्हा स्वगृही परतले. अंतुलेंना सिमेंट भ्रष्टाचार मात्र मोठ्या प्रमाणात भोवला. कारण त्यानंतर त्यांना आपल्यावरचा हा भ्रष्टाचाराचा डाग धुवून काढण्यात तब्बल १७ वर्षे लागली. त्यामुळे या काळात त्यांना कोणतेही मंत्रिपद स्वीकारता आले नाही. ऍड. भाऊ खनविलकर हे मात्र अनेक पदे उपभोगूनही स्वच्छच राहिले. त्यांच्यावर कुणालाही साधा आरोपही करता आला नाही. खानविलकर हे सलग ११ वेळा अलिबागचे नगराध्यक्ष होते, त्यांच्याच काळात श्रीबाग वसविले गेले. श्रीबागमध्ये लोकांसाठी त्यांनी जमिनी दिल्या, परंतु आपल्यासाठी काही घेतले नाही. अशा प्रकारे त्यांनी आपली राजकीय कारर्किद स्वच्छ ठेवली. अंतुले आणि खानविलकर यांच्यातला हा एक मोठा फरक होता. अंतुलेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि ते नंतर त्यांनी जरुर धुवून काढले, परंतु आरोप झाल्यामुळे त्यांची राजकीय कारर्किद संकटात आली. देवरा देखील कॉँग्रेसचे निधी व्यवस्थापन करणारे म्हणून प्रसिध्द असले तरी त्यांनी भ्रष्टाचाराचा एक साधा डागही आपल्यावर बसणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली होती. खानविलकरांनी आपल्या राजकीय कारर्किदीच्या शेवटी शरद पवारांची साथ दिली. मात्र त्यांच्या कौशल्याचा पवारांनी फारसा उपयोग करुन घेतला नाही. तसेच अंतुलेंनाही त्यांच्या कुवतीच्या तुलनेत अजून बरेच काही मिळू शकले असते. देवरा यांना जे काही मिळाले त्यात ते बहुतांशी समाधानी होते. कॉँग्रेसचा नुकताच केंद्रात आणि राज्यातही पराभव झाला अशताना हे तिघे नेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. इंदिरा गांधींच्या कठीण काळात त्यांच्या समवेत देवरा व अंतुले हे होते. सोनियांच्याही कठीण काळात हे नेते त्यांच्या बरोबर राहिले. आज कॉँग्रेसला पुन्हा वाईट दिवस आले असताना या ज्येष्ठ नेत्यांवर काळाने झडप घातली आहे. कॉँग्रेसकडे कार्यकर्ते, नेते यांची कधीच कमतरता नव्हती. मात्र निष्ठावान नेते मिळणे कठीण असते. सध्याच्या काठीण काळात राहूल गांधींना हे वास्तव समजेलच. काळाच्या ओघात नेते, कार्यकर्ते हे पक्षातून येतात व जातातही. मात्र काणही नेते पक्षाच्या, सरकारच्या कामात, प्रशासकीय कामात आपली कायम स्वरुपी छाप पाडून जातात. त्यात हे तीन नेते होते. कॉँग्रेसला या तीन नेत्यांची भावी काळात नेहमीच उणीव भासविल्याशिवाय राहाणार नाही...
----------------------------------------------    

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel