-->
संपादकीय पान सोमवार दि. ०८ डिसेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
नेमाडेंची नसती उठाठेव
दर वर्षी कुठे ना कुठे भरणारे साहित्य संमेलन हा अलीकडच्या काळात चर्चेचा विषय झाला आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बाबतीत होणारे वाद नेहमीचेच झाले आहेत. अन्य संमेलनांच्या बाबतीत तसे होत नाही. मात्र, आता एकूणच संमेलनांच्या बाबतीत नवा वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलनांवर बोचरी टीका करत साहित्य संमेलन हे ब्राम्हणी शहाण्याचे उंटावरुन शेळ्या हाकणे आहे, असे  विधान केले आहे. त्यांचे हे म्हणणे म्हणजे साहित्य संमेलने कशी टाकाऊ आहेत आणि ती भरवणार्‍यांची बुद्धी कशी लयाला चालली आहे, हे सांगण्यासारखेच आहे. साहित्य संमेलन भरवणे हे काही आजच उदयाला आलेले नाही.  गेल्या अनेक वर्षांपासून अशी संमेलने भरवली जात आहेत. आचार्य अत्रे यांच्यासारख्या व्यासंगी साहित्यकारानेही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. अत्रे यांच्या पंक्तीत अनेक साहित्यिकांची नावे घेता येतील. साहित्य संमेलनांमधून काही साध्य होत नसेल तर अशी साहित्य संमेलने भरवली गेली असती का आणि त्यांचा हेतू पूर्ण होत नसता तर हजारोंच्या संख्येने त्या संमेलनांना रसिक उपस्थित राहिले असते का असे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. या पार्श्‍वभूमीवर नेमाडे यांचे विधान साहित्यविश्वाला धक्का देणारे आहे. कोसला, हिंदू यासारख्या कादंबर्‍या लिहिणारे नेमाडे आपल्या परखड लेखनासाठी त्याचप्रमाणे परखड मतप्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. हा परखडपणा  चांगला आहे. पण, त्या परखडपणाच्या धुंदीत  आपल्या बोलण्याने असंख्य रसिकांच्या भावना दुखावल्या जातात याचे मात्र भान असायला हवे. नेमाडे यांना त्याची तमा वाटत नसावी. आपल्या बोलण्याने, लेखनाने कोणाचे काय होते याची ङ्गिकिर त्यांनी कधी केली नाही. अशा लेखनामुळे त्यांना प्रसिद्धी मात्र मिळते. चाकोरीबाहेर जाऊन विचार करणारा लेखक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण, हा अधिकार गाजवताना कोणाच्या भावनांची ङ्गुले पायदळी तुडवली जाणार नाहीत, याची दखल घेतली जाणे आवश्यक असते. मात्र, काही लोकांना तसा विचार करावा असे वाटत नाही. नेमाडे यांनी साहित्य संमेलनावर ताजी टीका करताना त्यामध्ये ब्राम्हणी शहाण्यांचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ साहित्य संमेलन ही ङ्गक्त ब्राम्हणांचीच मक्तेदारी आहे, असा होतो. धर्मनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष समाजात कोणत्याही वर्गावर, जातीवर, धर्मावर कोरडे ओढणे घातकच ठरते. अशा विधानांनी जातीय, वर्गीय, धार्मिक तेढ निर्माण होते. शिवाय, प्रत्यक्षात पाहिले तर साहित्य संमेलन भरवणे ही ब्राम्हणांची मक्तेदारी नाही. आजवर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ब्राम्हणेतर साहित्यिकांनीही भूषवले आहे. साहित्य हा ज्ञानाचा झरा असतो, तसा तो असायला हवा. ज्याच्याकडे तो आहे, साहित्यविश्वात ज्याने मोठे योगदान निभावले आहे त्याची दखल घेऊन त्याला संमेलनाचे अध्यक्षपद दिले जाते. ते देताना तो कोणत्या जातीचा, धर्माचा हे पाहिले जात नाही. असे असताना साहित्य संमेलनावर आगपाखड करणे नेमाडे यांच्यासारख्या साहित्यिक म्हणवल्या जाणार्‍यांना शोभत नाही. साहित्य संमेलनांमधून काहीच साध्य होत नाही, असा नेमाडे यांचा सूर आहे. त्यांनी हा निष्कर्ष कोणत्या गोष्टींमधून काढला हे कळत नाही. संमेलनातून काहीच मिळत नसते तर त्याला वाचक, रसिकांची अङ्गाट गर्दी झाली असती का? एक वेळ नेमाडे यांच्या म्हणण्याप्रमाणे साहित्य संमेलन हे उंटावरुन शेळ्या हाकणे असते तर त्याला उपस्थित राहणारे हजारो लोक मूर्खांच्या बाजारातून आलेले नाहीत. संमेलनामधून आपल्याला काय मिळते ,काय नाही हे जाणवून घेण्याचा सूज्ञपणा त्यांच्यापैकी बहुतेकांना असतो. मात्र, परखडपणाचे दर्शन घेऊ इच्छिणार्‍या व्यक्ती अशी विधाने करताना त्याची दखल घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवायला हवे. साहित्य संमेलन जसे देशपातळीवर भरवले जाते तसे ते ग्रामीण पातळीवरही भरते. तेथेही लोकांची गर्दी असते. हे लोक बुद्धी गहाण ठेवून त्याला उपस्थित राहत नाहीत. उपस्थित राहणार्‍यांना संमेलनांमधून काही ना काही मिळत असल्यामुळेच ते पुढच्या संमेलनाची वाट पाहत असतात. साहित्यातील नानाविध पैलूंची चर्चा अशा संमेलनांमधून घडते. कथा, काव्य, कादंबरी, ललित अशा विविध वाङमय प्रकारांवर  विश्‍लेषण अशा संमेलनांमधून होत असते. त्याचा लाभ उपस्थितांपैकी अनेकांना होत असतो. अशा वेळी साहित्य संमेलनांमधून काहीच मिळत नाही असे कोणी म्हणत असेल तर ज्यामधून मनोरंजनापलीकडे काही मिळत नाही असे सर्व काही बंद करावे लागेल. चित्रपट,  मालिका, संगीत यामधून मनोरंजन, रसास्वाद  या पलीकडे रसिकांना काय मिळते? मग, हे सारे बंद करुन टाकायचे का? अनेक लोकांना, साहित्यप्रेमींना एकत्र आणून साहित्यावर चर्चा करणे, त्यातून साहित्याचा प्रसार करणे, नवीन लेखक, वाचक घडवणे असे संमेलनाचे अनेक उद्देश असतात. अशा संमेलनांना उपस्थिती लावत साहित्यिकांचे विचार ऐकून साहित्यप्रेमींच्या साहित्यजाणीवांचे विश्व अधिक व्यापक झाले आहे. याद्वारे लेखक-वाचक यांचाही संवाद घडतो. साहित्य संमेलनाने काय दिले हे सांगताना त्याची यादी ङ्गार मोठी होईल. आपल्याला काय मिळाले हे साहित्यप्रेमींना माहित आहे. त्यामुळे एखाद्याच्या विधानामुळे त्यांची मते बदलतील असे नाही. नेमाडे यांच्या विधानाने साहित्यविश्वाला धक्का बसला असला तरी बहुसंख्य साहित्यिक मूग गिळून गप्प आहेत याचे आश्‍चर्य वाटते.
----------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel