-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ०५ डिसेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
युध्दात आणि तहातही हरले
राज्यात पुन्हा एकदा तब्बल पंधरा वर्षाच्या अंतराने भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेत आले आहे. पंधरा वर्षांपूर्वीपेक्षा यावेळी मात्र परिस्थीती वेगळी आहे. कालपर्यंत विरोध पक्ष नेता म्हणून जे मिरवित होते ते आज अचानक उडी मारुन सत्तेच्या कुंपणावर बसले आहेत. लोकशाहीची ही थट्टा वाटेल परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि या राज्यातील जनतेला हे वास्तव स्वीकारावे लागणार आहे. यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते. त्याप्रमाणे शिवसेना व भाजपा यांनी देखील स्वतंत्रपणे निवडणूक परस्परांची उणी-दुणी काढत लढविली होती. प्रचाराच्या दरम्यान उध्दव ठाकरे यांनी तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला अफजलखानाची फौज असे संबोधिले होते. यावरुन बराच धुराळा उडाला होता. भाजपाच्या मनाला ही गोष्ट झोंबणे योग्यच होते. त्यावेळी शिवसेनेला असे ठामपणे वाटत होते की, आपलीच सत्ता येणार आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार. परंतु या राज्यातील जनतेने भाजपाच्या बाजून कौल दिला असला तरी त्यांना १४५चा जादुई आकडा पार करण्यात संख्या कमीच पडली. मात्र शिवसेना या गणितात बरीचमागे होती. त्यामुळे शिवसेेना निवडणुकीच्या या युध्दात हरली होती. लोकांनी निवडणुकीत उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी नकोच असाच स्पष्ट कौल दिला होता. त्यानंतर सत्तेच्या समिकरणात भाजपा बाजी मारणार हे ओघाने आलेच होते. त्याचवेळी शरद पवार यांनी भाजपाच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा व्यक्त करुन एक धुर्त खेळी केली. भाजपाला संपूर्ण बहुमत मिळालेले नसल्यामुळे पाठिंब्यासाठी ते आपल्याच दारी येणार आणि आपण चांगली मंत्रिपदे मागून घेऊ असा मनसुबा मातोश्री दरबारी होता. मात्र हा मनसुबा पवारसाहेबांच्या खेळीमुळे उधळला गेला. सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेना अटी लादू लागली. आम्हाला अमूकच मंत्रिपद द्या, उपमुख्यमंत्रीपद द्या, या राज्याचे तुकडे करणार नाहीत हे लिहून द्या अशी मागणी शिवसेना करु लागली. अर्थात भाजपाला शिवसेनेच्या या अटी स्वीकारण्यापेक्षा राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे परवडणारे होते. नाही तरी शिवसेना-भाजपा हे निवडणुकीत परस्पर विरोधात लढले होतेच, मग आता कशाला सत्तेत त्यांना आपल्याबरोबर घ्यायचे? असे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे होते. त्यात काही चूकही नव्हते. आता आम्ही लहान नाही, तर मोठे भाऊ आहोत, आम्ही जे देऊ ते निमूटपणे स्वीकारा अन्यथा विरोधी पक्ष म्हणून बसा, असा स्पष्ट संदेश भाजपाने शिवसेनेला दिला. मात्र शिवसेनेला यावेळी काही करुन सत्तेत वाटेकरी व्हायेच होते. यामागे दोन कारणे होती, एक म्हणजे सत्तेत सहभागी झालो नाही तर शिवसेना फुटेल अशी उध्दव ठाकरेंची भीती होती. तर दुसरी बाब म्हणजे, यावेळी जर सत्ता आली नाही तर पुढील पाच वर्षापर्यंत सत्तेची वाट बघणे म्हणजे कठीण जाणार होते. तेवढा धीर शिवसेनेमध्ये नव्हता. त्यामुळे लाचारी पत्करत, कमी महत्वाची खाती स्वीकारत सत्तेत शिरण्याचे शिवसेनेने ठरविले. शेवटी तहातही शिवसेना हरलीच. आता मान खाली घालून, अपमान सहन करीत शेवटी सत्तेच्या कळपात जाण्याची संधी शिवसेनेला लाभली आहे. मात्र त्यामुळे मोठा आपण काही विजय प्राप्त केला अशी जर समजूत असेल तर तो चुकीचा आहे. कारण यामुळे शिवसेनेची मानहानीच झाली आहे. काही करुन अगदी वेळ आली तर भाजपाने केलेला अपमान गिळून सत्ता मिळविल्याने लोकांमध्ये छी थू यापूर्वीच झाली आहे. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य मराठी माणसास त्याचा आत्मसन्मान जागृत करुन त्याला स्वाभीमानाने जगण्यास शिकविले त्याच शिवसेनेने सत्तेसाठी अशा प्रकारे भाजपाचे उंबरठे झिजविणे हे कमीपणाचेच होते. आम्ही लोकांच्या मनाचा आदर करुन ही युती पुन्हा सांधत आहोत असे शिवसेना म्हणत आहे. शिवसेनचा हा दावा खोटाच आहे. कारण लोकांनी यावेळी युतीच्या बाजूने कौल दिलेला नाही. कारण युती म्हणून ही निवडणूक लढविली गेली नव्हतीच. दोघेही स्वतंत्र लढले होते आणि लोकांनी भाजपाला सर्वाधिक उमेदवार देऊन शिवसेनेच्या विरोधात कौल दिला होता. एकेकाळी ज्या शिवसेनेेने मोठा भाऊ म्हणून घेऊन मोठ्या फुशारकीने युती तोडली, शेवटी सत्ता येत नाही असे पाहिल्यावर त्याच भाजपाच्या शरणी जाऊन सत्तेत वाटेकरी झाले. मध्यंतरी भाजपा दाद देत नाही असे दिसत होते त्यावेळी हिंदुत्वाचा नारा देत याच उध्दव ठाकरेंनी राष्ट्रीय संवयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना गळ घातली व आम्हाला सत्तेत वाटेकरी करुन घेण्यासाठी शब्द टाका अशा विनवण्या केल्या. शेवटी भागवतांनी भाजपाच्या नेतृत्वाला सांगून शिवसेनेला सत्त्तेत सहभागी करुन घेण्यास भाग पाडले. भाजपाने आपल्या परिवारातील भागवतांसारख्या पितृदेव असणार्‍या  व्यक्तीचा मान राखण्यासाठी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेतले. परंतु दुय्यम खाती देऊन शेवटी आपणच वरचढ आहोत हे दाखवून दिले आहे. अर्थात शिवसेना सत्तेत आल्यामुळे सरकार आता फार मोठे जोमाने काम करील व या राज्यातील जनतेचे मोठे भले होईल असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण शिवसेनेसारख्या गुंडगिरी करणार्‍यांना सोबत घेऊन भाजपाचीच प्रतिमा मलिन होणार आहे. आज शिवसेनेला दुय्यम खाती दिलेली असली तरी एकदा सत्तेत आल्यावर त्यांच्या मागण्या या वाढतच जाणार आहेत आणि त्या पूर्ण करणे भाजपाला परवडणार आहे का, असा सवाल आहे.
---------------------------------------------------------------  

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel