-->
संपादकीय पान शनिवार दि. ०२ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे
शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, शिवशाहीर व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या ओजस्वी वाणीने जीवंत करणारे बाबासाहेब पुरंदरे यांना २०१५ सालचा महाराष्ट्रभूषण हा राज्य सरकारचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजप्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन व आरोग्य सेवा या क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या मान्यवराचा यथोचित सन्मान करण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या रूपाने एका अस्सल शिवभक्ताचा गौरव झाला आहे. शिवकाळ आणि  छत्रपती शिवाजी महाराज या दोन शब्दांसाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले आयुष्य वेचले. महाराजांचे अलौकिक व्यक्तित्व जनतेपुढे नेण्याचे त्यांनी आयुष्यभर कार्य केले, त्याची दखल या पुरस्कारामुळे राज्य सरकारने घेतली. बाबासाहेब आता नव्वदी पार केल्यावरही आपल्या खर्ड्या आवाजात शिवाजी महाराजांचे चरित्र्य साकारतात त्यावेळी प्रत्येकाचे रोमांच उभे राहातात. संपूर्ण आयुष्य त्यांनी शिवाजी महाराजांचा अभ्यास व कथाकथन करुन खर्ची घातले. या जनतेला रयतेचा हा राजा कसा होता त्याचे दर्शन घडविले. सह्याद्रीचा एकेक कडा आणि एकेक शिखर हे बाबासाहेबांचे चरित्रनायक आहेत. एकेक किल्ला हा महाकाव्याचा एक-एक अध्याय आहे. इतिहासातून देशाने प्रेरणा घ्यावयाची असते, इतिहास म्हणजे केवळ तहांचा आणि लढायांचा तपशील नव्हे असा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी शिवचरित्र हे एकमेव जीवितध्येय साकार केले अशी विभूती म्हणजेच मराठी इतिहासाचे भाष्यकार, शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे होत. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला. पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. त्यावेळी ते आचार्य अत्रे यांच्या मराठातून लिखाण करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते माणूस मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे महारष्ट्राचे दूतच झाले. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. त्यांच्या तोंडावर जसा शिवाजी महाराजांचा इतिहास असे तसे ते महाराजांच्या वारसांकडेही सतत संपर्क ठेवून असत. हे एक त्यांचे आणखी एक वैशिष्ट. त्यामुळे इतिहास व सध्याची वस्तुस्थिती याची सांगड ते घालीत. पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदर्‍यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत. याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २३ वर्षांत हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत व या प्रयोगांच्या माध्यमातून लाखो रुपयांची मदत बाबासाहेबांनी अनेक संस्थांना केली आहे. हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. सध्या जाणता राजाचे प्रयोग पेणमध्ये चालू आहेत. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात सध्या जाणता राजाचे प्रयोग सुरु असताना पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण हा सन्मान मिळाला हा एक विलक्षण योगायोग म्हटला पाहिजे. इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा -वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्लेषण क्षमता आणि प्रेरक इतिहास अभिव्यक्त करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाचे खास गुणधर्म. या सर्व गुणांमुळेच ते आज संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील शिवभक्तांच्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक अभ्यासकांची शिवचरित्र अभ्यासाची वाटचाल सुरू झाली आहे. आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना नेहमीच लाभत आला. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. मशिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहेफ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले. अशा या महान व्यक्तिमत्वाचा राज्य सरकारने महाराष्ट्रभूषण हा सन्मान देऊन जो गौरव केला आहे त्याबद्दल राज्याची जनता ऋणी राहिल.
-----------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel