-->
संपादकीय पान सोमवार दि. ०४ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
राजकीय पदयात्रा
जनतेने सत्तेतून खाली उतरविल्यावर कॉँग्रेसमध्ये उसने चैतन्य आणण्याचे काम सध्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व सोनिया गांधींचे वारसदार राहूल गांधी यांनी सुरु केले आहे. पराभवानंतर दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर राजकारणात उतरुन पुन्हा एकदा मरणासन्न अवस्थेत असलेल्या कॉँग्रेसला जीवदान देण्यासाठी राहूल गांधींनी सध्या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर रण माजविण्याचे ठरविलेले दिसते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार सध्या बड्या भांडवलदारांसाठी कायदेकानून करीत असून त्याचाच एक भाग म्हणून भूमीसंपादन कायद्यात सुधारणा केल्या जात आहेत. यामुळे शेतकरी उघड्यावर येणार आहे याची चिंता मोदींना नाही. मात्र या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर आपल्या राजकारणाची पोळी भाजली जाऊ शकते असा विश्‍वास राहूल गांधींना वाटतोय. त्यासाठीच त्यांनी पंजाब व त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या आहेत. पंजाब या हरितक्रांतीने समृध्द झालेल्या या पट्यातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न वेगळे आहेत. तिकडे सरकार गव्हाला योग्य किंमत देत नाही. तसेच अनेक ठिकाणी गहू पडून आहे, या स्थितीत कधी नव्हे त्या पंजाबच्या भूमीतही शेतकर्‍याच्या आत्महत्यांची नोंद होऊ लागली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. तेथे जाऊन राहूल गांधी महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकर्‍यांच्या दु:खाची माहिती घेण्यासाठी तेथे आले. खरेतर राहूल गांधींचा पक्ष सत्तेत असताना तीन-चार वर्षापूर्वी विदर्भातील एका आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभेतही हा प्रश्‍न उपस्थित केला होता. मात्र त्यापुढे काहीच झाले नाही. आता विरोधी पक्षात असताना आल्याने त्यांच्या या दौर्‍याला राजकीयदृष्ट्या वेगळे महत्व होते. उन्हाचा तडाखा ४२ अंशांवर गेला असतानाही त्याची तमा न बाळगता आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या वेदना आपल्या उराशी बाळगून राहुल गांधी झप-झप पावले टाकत चालत होते. निमित्त होते त्यांच्या १२ किलोमीटरच्या पदयात्रेचे. पदयात्रेला गुंजी येथून सुरवात झाली व तब्बल पाच तासांत राहुल गांधी यांनी हे अंतर कापत विदर्भातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचे गांभीर्य ओळखले. ठिकठिकाणी सर्वसामान्यांशी संवाद... आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन... कधी आजीबाईला मिठी; तर कधी ग्रामस्थांना हात दाखवून अभिवादन करीत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तब्बल १२ किलोमीटरची पदयात्रा पार पाडली. कॉँग्रेसमध्ये कधी नव्हे ते चैतन्य यामुळे आले. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला शिवाय यानिमित्ताने शेकडो कार्यकर्ते एकत्रित आल्याने कॉंग्रेसलाही चांगले बळ मिळाले. राहूल गांधींमुळे अनेक कॉँग्रेस नेत्यांनाही पायपीट करावी लागली. कर्जाचा डोंगर, सिंचनाच्या अपुर्‍या सोयी, कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, दुष्काळ यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. राहुल गांधी यांनी गुंजी येथून पदयात्रेला सुरुवात केली. किसानों के सम्मान में राहुल गांधी मैदान में कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या अशा गगनभेदी घोषणांमध्ये त्यांची पदयात्रा शहापूरकडे रवाना झाली. गुंजी ते शहापूर हा चार किलोमीटरचा प्रवास राहुल गांधींनी नॉन स्टॉप पूर्ण केला. शहापूर येथील किशोर नामदेव कांबळे यांच्या घराला त्यांनी भेट दिली. कांबळे यांचा मृतदेह दोन तास तसाच लटकून होता. त्या वेळी कुणीही मदत केली नाही, असे त्यांच्या पत्नीने सांगताच राहुल गांधी व्यथित झाले. त्यांचे डोळे पाणावले. शहापूर येथून ते आठ किलोमीटरवर प्रवासात असलेल्या दोन बुद्धविहारांत जाऊन त्यांनी वंदन केले. ही पदयात्रा धामणगाव रेल्वे येथे पोहोचल्यावर मार्गातच असलेल्या गजानन महाराज संस्थानात गेले. या ठिकाणीदेखील त्यांनी दर्शन घेतले. वाटेत असलेल्या हिरापूर गावातील हनुमान मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. राहुल गांधी या मंदिराच्या प्रांगणात जमिनीवर सतरंजीवर बसले. अशोक चव्हाण, विखे पाटील तसेच कॉंग्रेसचे अन्य नेतेदेखील या वेळी उपस्थित होते. या ठिकाणी काही शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही अत्यंत क्लेशदायी बाब आहे. शेतमालास भाव मिळत नाही. सोबतच बोनस जाहीर होतो; मात्र तोही पदरात पडत नाही. नापिकी आहे. त्यामुळेच कर्जाचा डोंगर वाढतो आहे. त्यातूनच आत्महत्या घडत असल्याचा निष्कर्ष राहुल गांधी यांनी काढला. आत्महत्या थांबवायच्या असतील तर कर्जमुक्ती दिली पाहिजे व या सरकारने तशी घोषणा करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सध्या राहूल गांधींच्या पक्षाकडे आता सत्ता नाही, त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्‍न ते काही सोडवू शकणार नाहीत. ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी त्यांनी काय केले असाही सवाल उपस्थित होतो. कॉँग्रेस जनतेची कामे करण्यात, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यात कुचकामी ठरल्यानेच लोकांनी भाजपाला व नरेंद्र मोदींना सत्तेची संधी दिली. मात्र भाजपाही कॉँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकीत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना हरताळ फासत आहे. नरेंद्र मोदी यांनी तर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर मोठे मोहोळ उठविले होते. शेतकरी असो वा कष्टकरी कामगार यांचे प्रश्‍न आपण चुटकीसरशी सोडविणार आहोत असे सांगत सत्तेच्या पायरीपर्यंत चढले. आता मात्र सरकारला एक वर्ष होणार आहे परंतु जनतेच्या जीवनात फारसा काही फरक पडलेली नाही. महागाई विषयी बोलणारे हेच नरेंद्र मोदी आन्तरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती उतरल्या असल्या तरीही पेट्रोलच्या किंमती चार रुपयाने व डिझेलच्या किंमती अडीज रुपयाने वाढवित आहेत. यामुळे खरे तर महागाईला हातभार लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मोदींची लोकप्रियता घसरणीला लागली असून त्यामुळेच राहूल गांधींचा शेतकर्‍यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही राजकीय पदयात्रा असली तरीही त्यामागची कारणे व मोदी सरकारची धोरणे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
-----------------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel